Sunday, March 5, 2017

लज्जतदार भेळ


     सांगलीची चटकदार,लज्जतदार भेळ वेगळीच. एकदा चव चाखली की फक्त झक्कास अशीच प्रतिक्रिया कानावर येते. सांगलीत काही वर्षांपूर्वी केवळ प्रतापसिंह उद्यानाचीच भेळ प्रसिद्ध होती. आता सांगलीच्या भेळेचे गाडे जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही पाहावयास मिळत आहेत. यात्रा-जत्रांचा मोसम असला की, हमखास सांगलीच्या भेळेचे गाडे तिथे आपल्याला पाहावयास मिळतात.
   
  सांगली शहरातील प्रतापसिंह उद्यानाजवळची लक्ष्मणरावांची भेळ,त्रिमूर्ती भेळ, कॉलेज कॉर्नरची श्री हरी भेळ, अमराई चौकातील अंबिका स्पेशल,पटेल चौकातील रामची भेळ, बापट बाल शाळेचा कोपरा न्यू इंडिया भेळ,प्रतापसिंह उद्यानाजवळची नानाची स्पेशल भेळ,लक्ष्मीनगरची क्रांती भेळ आदी भेळेच्या गाड्यांवर सायंकाळी तुफान गर्दीच आपल्याला पाहायला मिळते. वखारभागातील  महाराजा चौक,विश्रामबाग चौक, शंभरफुटीचा विश्रामबाग, गणपती मंदिराजवळचा भाग आणि कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मीनगर परिसरातील गाड्यांवर तर गर्दी फुललेली असते.
     मजुरांपासून उच्चभ्रूपर्यंत आणि आजी- आजोबांपासून बाळगोपाळांपर्यंत सार्यांनाच कोणत्याही ऋतूत ,कोणत्याही वेळेत भेळेचा आस्वाद घेता येऊ शकतो. संध्याकाळी सहानंतर या गाड्यांवर केवळ ऑर्डरी आणि बशांचा खणखणाट ऐकू येतो. पुणे-मुंबईकर कागदात घेऊन कागदाचाच चमचा वापरतात... त्या तुलनेत सांगलीकरांचे खाणे टेचदारच...
     हळदमीठ लावलेले चिरमुरे,फरसाण,पाणीपुरीच्या पुर्यांचा चुरा,थोडेसे लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचे पाणी, कांदा-टोमॅटो आणि चिंचेचा कोळ बस्स एवढ्या सामग्रीवर सांगलीची स्पेशल भेळ तयार होते. ती खवैयांच्या जिभेला चटपटीतपणाची सवय लावते. चिनीमातीच्या पांधर्या बशीतून कोथिंबीर-शेव पेरून दिलेली भेळ समोर आली की, तोंड खवळेच म्हणून समजा. तसेच जोडीला हिरव्या मिरच्या आणि उन्हाळ्यात कैरीची फोड असेल तर मग तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा.
     सांगली परिसरात मिळणारे चवदार आणि ताजे कुरकुरीत चिरमुरे इतरत्र मिळत नाहीत. याचमुळे इथल्या भेळीची चव काही औरच आहे. व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात असलेल्या वखारभागात  रात्री दहा- अकरापर्यंतही भेळींचे गाडे गजबजलेले असतात. नोकरदार,मध्यमवर्गीय आठवड्यातून एकदातरी हमखास भेळीची चव चाखल्याशिवाय राहत नाहीत. या गाड्यांवर रात्री अकरापर्यंत गर्दी असते. तसेच सांगलीतून भेळ पार्सल नेणार्यांची संख्याही अधिक आहे.

     कुणाचा वाढदिवस असो, कुणाची नोकरीची पार्टी असो, कुणाची लग्नाची पार्टी असो सेलिब्रेशन मजा सांगलीच्या भेळ गाड्यांवरच. लज्जतदार भेळेची मागणी मोठ्या प्रमाणात येते. बच्चेकंपनीसाठी भेळ म्हणजे मज्जाच मज्जा. म्हणूनच सांगलीकरांची ही भेळ पुण्या-मुंबईपर्यंत पोहचली आहे.

No comments:

Post a Comment