Monday, March 13, 2017

हिजड्यांच्या दुनियेत...

     पूर्ण स्त्री किंवा पुरुष नसलेल्यांना आज समाजात तृतीयपंथी असे म्हटले जाते. यालाही एक इतिहास आहे. वेगवेगळ्या काळात या तृतीयपंथांना विविध नावाने ओळखले जात असे. रामायण काळात तृतीयपंथांना किन्नर म्हटले जायचे. पुराण काळात इंद्राच्या दरबारातील गायकांनाही किन्नरच म्हणण्यात येई. मुस्लीम राजवटीत किन्नर किंवा हिजरा असे म्हटले जाऊ लागले. या हिजराचा आजचा हिजडा हा शब्द अपभ्रंश आहे. विविध काळात तृतीय पंथीयांचे विविध उल्लेख सापडले असले तरी पुराण काळातील माहित असलेला पहिला तृतीयपंथी हा महाभारतातील शिखंडीच आहे. शिखंडीच्या मागे लपूनच अर्जुनाने भीष्मावर शरसंधान केले. विशेष म्हणजे तृतीय पंथी व्यक्तीचा दुसरा महत्त्वाचा उल्लेख महाभारतातच आहे. पांडव एक वर्ष अज्ञातवासात असताना अर्जुनाने विराट राज्याच्या कन्येला उत्तराला शिकवण्यासाठी नर्तकीचं रूप घेतलं होतं. ही बृहन्नडा नावाची नर्तकी म्हणजे हिजडाच होती. पुरुष असलेल्या अर्जुनाला हे स्त्री रुप एका शापामुळे घ्यावं लागलं होतं.

     आजही हिजडा आपल्या समाजात आहेत. भीक मागून जगतात.त्यांची एक मोठी शोकांतिकाच आहे. स्त्री आणि पुरुषही नसल्याने समाजाने ते आपल्यापेक्षा भिन्न म्हणून त्यांना समाजबाह्य ठरवलं आहे. साहजिकच त्यांना कुठल्याच पातळीवर सामावून घेण्यात आलेले नाही. त्यांना कुठलीच प्रतिष्ठा किंवा सन्मान बहाल करण्यात आलेला नाही. उलट समाजाचं एक बिघडलेलं अंग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. समाजाच्या या दृष्टिकोनामुळे हिजड्यांच्या वाट्याला कायम घृणाच आली. रस्त्यात,ट्रेनमध्ये किंवा कुठेही ते समोर आले की, त्यांना चुकवण्याकडेच सगळ्यांचा कल सतो. एक्यतो आपलं अंग त्यांना आणि त्यांचं अंग आपल्याला लागणार नाही,याची काळजी घेतली जाते.जणू त्यांचं आयुष्य अस्तित्वच किळसवाणं असावं.
     या हिजड्यांचा जन्म सर्वसामान्य स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधातूनच होतो. परंतु, त्यांना जन्माला घालताना निसर्गाचं गणित थोडं चुकतं. निसर्ग त्यांना धड पुरुषही करत नाही आणि धड स्त्रीही. अधेमधेच लटकत ठेवतो. लहानपणी हे व्यंग कुणाच्या लक्षात येत नाही. पण वयात येत गेल्यावर शरीर आणि भावनेतला फरक जाणवायला लागतो. त्यांचं शरीर पुरुषासारखं असतं, मात्र लिंगाची पूर्ण वाढ झालेली नसते. छातीला मात्र स्त्रीप्रमाणे उभार असतो. असं स्त्री-पुरुषाच्या सीमेवर असलेल्या त्यांच्या भावना मात्र पूर्णपणे स्त्रीच्या असतात. म्हणजे बाह्यदेह पुरुषाचा आणि मन मात्र स्त्रीचं. स्वत: च्या देह आणि भावनेत फसलेल्या या हिजड्यांचा स्वत:शी झगडा सुरू असतोच. पण स्वत:बरोबरच ते समाजाशीही झगडत असतात. कारण समाज त्यांना स्वीकारायला तयार नसतो. यातूनच एक विचित्र गुंता निर्माण झाला आहे. आजही समाज त्यांना स्वीकारायला तयार आहे. आपल्याला अव्हेरणार्या समाजाच्या मुद्दाम जवळ जाण्याचा प्रयत्न हा समाज करत आहे. भीक मागताना आक्रस्ताळेपणा,चित्रविचित्र हावभाव ही समाजाने त्यांना नाकारल्याची प्रतिक्रिया आहे.
     आपल्या देशात आजच्या घडीला जवळपास 35 लाखाच्या आसपास हिजडे असल्याचे सांगितले जाते. यात सगळ्यात मोठी संख्या मुंबईत आहे. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या समुहाला आज केवळ ते हिजडे आहेत म्हणून समाजबाह्य ठरवलं गेलं आहे. मात्र आज समाजाच्या बाहेर असलेल्या, उपेक्षितांचं आयुष्य जगणार्या या समाजाला ऐतिहासिक काळात समाजात मान आणि प्रतिष्ठा दोन्ही होती.बुद्धकाळात ज्याप्रमाणे गणिका राज्याची शोभा वाढवायच्या,त्याचप्रमाणे नंतरच्या काळात अनेक हिजड्यांनी राजदरबारात मुत्सद्याची भूमिका निभावली आहे. संघराज्याच्या काळात सामंतराजे,जहागिरदार हिजड्यांना आपले सल्लागार म्हणून नेमत असत. त्यानंतर भारतात आलेल्या भारतात आलेल्या मुस्लीम राजवटीत अनेक मुस्लीम बादशहांनी हिजड्यांची खोजे म्हणून आपल्या जनानखान्यावर देखरेख करण्यासाठी नेमणूक केली. एवढंच नाही तर कामक्रीडेवर ग्रंथ लिहिणार्या वात्सायनासारख्या अनेक पंडितांनी हिजड्यांचा समावेश नायिकांमध्ये केला आहे. तसेच एखादा राजपुत्र किंवा सरदारपुत्र कामक्रीडेत वाकबगारनसेल किंवा त्या कलेत कमकुवत असेल तर त्याला शिकवण्यासाठी पूर्वीच्या काळी हिजड्यांची नेमणूक केली जायची.
     ऐतिहासिक काळात हिजड्यांना समाजमान्यता होती, मात्र अलिकडच्या काळात त्यांची घृणा केली जाते. हे असे राजेशाही संपुष्टात आल्यामुळे झाले असे समजले जाते. पूर्वीच्या काळी राजेरजवाड्यांनी हिजड्यांना वेगवेगळ्या कामात सामावून घेतले होते. त्यामुळे समाजाने त्यांना आपल्यात सामावून घेतले. त्यांना कुणाकडे उपजीविकेसाठी हात पसरावा लागत नव्हता. पण आठराव्या शतकात राजेशाही संपली आणि त्यांचे जगण्याचे मार्ग बंद झाले.पोटापाण्याचे व्यवसायच नसल्यामुळे मग हिजड्यांनी भीक मागायला सुरुवात केली. अंगच्या स्त्रीत्वामुळे गाणं-नाचणं तर त्यांचा छंदच होता. मग तोच व्यवसाय म्हणून स्वीकारला गेला. पण यामुळे हिजड्यांना प्रथमच रस्त्यावर यावं लागलं. हे रस्त्यावर येणं तेव्हांच्या प्रतिष्ठांना रुचलं नाही. आणि त्यांनी बंधनं आणायला सुरुवात केली. या बंधनातूनच त्यांना समाजबाह्य ठरवले गेले.
     अर्थात भीक मागण्याची किंवा नाचगाण्याची हिजड्यांना हौस नाही. कारण त्यांना फिरस्त्याऐवजी शांततेत जीवन जगणं आवड्तं. पण त्यासाठी त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. मात्र ते द्यायला समाज तयार नाही. मुंबई अथवा भारतातल्या हिजड्यांविषयी समाजात दुराव्याची भावना आहे. त्यांना कुणीही आपलं मानायला तयार नाही. अगदी त्यांचे आई-वडील,बहीण-भाऊही त्यांना आपलं मानत नाहीत. अर्थात सगळेच पालक असे नाहीत. काही पालकांनी आपल्या अशा पाल्याला समजून घेतलं आहे. त्यांचा सांभाळ करतात. त्यांना भावनिक आणि आर्थिक आधार देतात. मात्र बरीच अशी मुले हिजड्यांच्या ट्ोळक्यात सामिल होतात. ही टोळी किंवा सगळे हिजडेच त्याचे मायबाप होतात.
     हिजड्यांच्या टोळी आल्यावर त्याच्यावर सगळ्यात पहिला संस्कार होतो,तो कपडे बदलाचा. कालपर्यंत शर्ट-पँट घालून फिरणारा मुलगा चापूनचोपून साडी नेसतो. आणि मुलींसारखं वागू-बोलू लागतो. पण हे दुसरं रुप लगेच त्याच्या अंगवळणी पडत नाही. त्यासाठी त्याला त्याच्या गुरूची मदत होते. हिजड्याने कसं वागावं-बोलावं आणि नाचावं-गावं याची तालीम गुरू त्याला देतो. हिजडा समाजातील हे गुरू चेला प्रकरण शास्त्रीय संगीतातल्या गुरू-शिष्य परंपरेला खूप महत्त्व आहे. गुरुबरोबर राहून हिजड्यांचे सर्व रितीरिवाज शिकताना शिष्याला गुरुची सर्वप्रकारची सेवा करावी लागते. गुरुची उष्टी-खरकटी काढावी लागतात. त्याची सगळी कामे करावी लागतात.
     भारतीय समाजाने समाजबाह्य ठरवल्यामुळे आज हिजड्यांचा स्वत:चा असा वेगळा समाज तयार झाला आहे. त्यांचे कायदेकानून अन्य समाजापेक्षा सर्वस्वी भिन्न आहेत. देशात कायद्याचे राज्य असले तरी हिजड्यांच्या समाजात मात्र गुरु, नायकाचे कायदे असतात. या कायद्याचे म्हणून विधी आहेत. तशीच भाषा असते. पण हिजड्यांचे विधी किंवा भाषा गुप्त असते. आपल्या समाजातील काहीही कुणालाही समजता कामा नये, अशी सक्त ताकीदच सर्व हिजड्यांना नायकांनी दिलेली असते.जो कोणी याचे उल्लंघन करेल,त्याला वर्षातून दोनदा भरणार्या हिजड्यांच्या जात पंचायतीत जबर दंड ठोठवला जातो. या दंडाची रक्कम अकराशे रुपयांपासून 11 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत असू शकते.सगळ्यात  जास्त दंड एका हिजड्याने जर दुसर्या हिजड्याशी शरीरसंबंध ठेवले तर ठोठावला जातो. कारण हिजडा समाजात सगळ्यांचं नातं एकमेकांशी आई-बाप व मूल किंवा बहीण-भावाचं मानलं जातं. त्यामुळे त्यांना आपापसात शरीरसंबंध ठेवता येत नाहीत.
या हिजड्यांचे बायकांप्रमाणेच पुरुषांशी संबंध असतात. त्यांच्या भावना स्त्रीच्या असल्यामुळे त्या पुरुषांशी सेक्स करतात. बहुतेक हिजड्यांचे कुणी ना कुणी प्रियकर वगैरे असतात. काहीजण लपूनछपून त्यांचेकडे जातात,तर काहीजण उजळ माथ्यानेही त्यांच्याकडे जात-येत असतात. मात्र हिजड्यांना जाहीररित्या कुणी स्वीकारत नाही. अलिकडच्या काळात मात्र एकाद-दोन अशा घटना घडल्या आहेत. उत्तरप्रदेशातील एका तरुणाने व त्याच्या घरच्यानी हिजड्याला स्वीकारल्याचे वाचनात आले आहे.

     हिजडा व्हायला आलेल्या पुरुषाला मोठ्या दिव्यातून जावे लागते. समाजात नव्याने आलेल्या पुरुषाचं खच्चीकरण करणं, हा सगळ्यात मोठा विधी आहे.याला ते लिंगदान विधी म्हणतात. हा विधी म्हणजे हिजडा होणार्याची खर्या अर्थाने परीक्षाच असते. या विधीत हिजडा होणार्याला अंघोळ घालून गुरू व मुख्य पुजारी आधी सर्व सोपस्कार पूर्ण करतात. सोपस्कार झाल्यावर त्याचे हात-पाय बांधून गुरूसमोर पुजारी तीक्ष्ण हत्याराने त्या मुलाचे लिंग कापून टाकतो. लिंग छाटल्यावर तिथे झालेल्या जखमेवर तेल,भंडारा, बाभळीच्या सालीची राख यांचा लेप लावला जातो. लिंग कापल्यामुळे झालेली जखम भरून यायला साधारणपणे 40 दिवसांचा कालावधी लागतो. जखम भरून आल्यावर लिंगाच्या जागी योनीसारखा खळगा तयार होतो. अजूनहीही याच पद्धतीने मुलीचं खच्चीकरण केलं जातं.मात्र याबाबतची माहिती कुणीही हिजडा उघडपणे सांगत नाही. खच्चीकरण झाल्यावरच त्या मुलाला हिजडा म्हणून मिरवता येते. त्याला मान्यता दिली जाते. हिजडा भिक मागतात किंवा लग्न-समारंभात बधाईसाठी जातात. असं विचित्र पण भन्नाट आयुष्य त्यांच्या वाटेला आलेलं असतं. आमदार झालेल्या शबनम मौसी यांच्यावर हिंदी चित्रपट निघाला. त्यामुळे आपल्याला काही प्रमाणात त्यांच्या आयुष्याची माहिती मिळाली. किंवा चित्रपटात काम करणारी लक्ष्मी हिने आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्यातूनही या समाजाचा उलगडा आपल्याला होत जातो.

No comments:

Post a Comment