आकाशवाणीचे हे
सांगली केंद्र आहे.1251 किलोहर्टझवरील कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे पाच वाजून
50 मिनिटे झाली आहेत. आता सादर करीत आहोत.चिंतन... या सुश्राव्य आवाजाने पहाटे जाग येते.
जिल्ह्याच्या कानाकोपर्यात हा आवाज पोहचला आहे.
नव्हे अनेकांच्या घरचा अविभाज्य घटक बनला आहे. सांगली आकाशवाणी केंद्र पंचावन्न वर्षाचा पल्ला गाठत आहे. दूरदर्शन,विविध वाहिन्या, रेडिओमधीलच
एक प्रकार असलेल्या एफएम यांच्या आक्रमणांना ठमपणे तोंड देत आकाशवाणी उभी आहे.
तरुणपिढीच्या बदलेल्या आवडी-निवडीचा वेध घेत हवे
ते बदल करून घेताना येथील संस्कृतीला तसूभरही धक्का न लागण्याची काळजी घेणारी सांगली
आकाशवाणी कौतुकास पात्र आहे. ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकांपर्यंत
मनोरंजनाबरोबरच ज्ञानप्रसाराचे काम करण्याची किमया आकाशवाणीने केली आहे.
संस्थानांच्या
विलिनीकरणानंतर वसंतदादा पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली सांगलीची जडणघडण सुरू झाली. उद्योग,व्यापार,शेती या क्षेत्रात सांगलीच्या प्रगतीला सुरुवात झाली होती. परंतु थकलेल्या माणसाचे रंजन करण्यासाठी चित्रपट -नाटकाशिवाय
दुसरे साधन उपलब्ध नव्हते. त्यावेळी वसंतदादांनी आकाशवाणी केंद्र
सांगलीत आणायचे ठरवले. 6 ऑक्टोबर 1963 रोजी
सांगली जवळच्या तुंग येथे या केंद्राची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. सुरुवातीला पुणे येथील केंद्रावरून कार्यक्रम सहक्षेपित होत होते. परंतु सांगलीला केंद्र आल्यानंतर मात्र प्रत्येक खेड्यांपर्यंत कार्यक्रमांचे
प्रसारण होऊ लागले.
चित्रपट गीतांबरोबरच
लोककला,सुगम संगीत, आरोग्य सल्ला, ग्रंथ परिचय,दिनविशेष,ग्राहक जागर, विज्ञान परिचय,कायद्याचा
सल्ला,प्रतिबिंब,सप्रेम नमस्कार,प्रगतीचे रंग,शेतीविषयक सल्ला, हवामान वृत्त, बाजारभाव असे कितीतरी कार्यक्रम आकाशवाणीने
तयार केले आणि ते प्ररसारित करीत आले.ज्येष्ठ निवेदक वामन काळे,
चित्रा हंचनाळकर यांच्या आवाजातील प्रगतीचे रंग या घटना, माहितीवर आधारित कार्यक्रमातून ज्ञानाचा खजिना उघडला जायचा. ताई,दादांच्या रुपाने जो काही संवाद घडायचा, तो जणू काही आपल्याच घरामध्ये असल्याचा भास व्हायचा.श्रोतूवर्ग
अगदी तल्लीन होऊन कार्यक्रम ऐकायचा.
1985 मध्ये सांगली-कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणीची इमारत उभी राहिली. त्यानंतर
मात्र सांगली जिल्ह्याबरोबर सातारा,कोल्हापूर,सोलापूर आदी जिल्ह्यातही सांगली आकाशवाणीचे प्रसारण होऊ लागले. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ समीक्षक प्रा. म.द. हातकणंगलेकर,कवी सुधांशु,डॉ. तारा भावाळकर,कवलापूरचे लोक
कलावंत काळू-बाळू आदींना श्रोत्यांपर्यंत पोहचवण्यात सांगली आकाशवाणीचा
मोठा वाटा आहे. प्रा.हातकणंगलेकर चिंतन
मालिकेतून भेट होते. तर कवी सुधांशु रविवारच्या मुलाखतीतून श्रोत्यांशी
गप्पा मारत कथाकार शंकर पाटील यांच्या अस्सल ग्रामेण ढंगातल्या कथांचे सादरीकरण ऐकताना
श्रोते हास्यरसात बुडून जायचे. कधी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू,
निळू फुले, अशोक सराफ यांच्यासारखे दिग्गज कलाकार
श्रोत्यांच्या भेटीला यायचे. तर कधी संपूर्ण नाटकाचे सादरीकरण
व्हायचे. बाळगोपाळांना सामावून घेण्यासाठी त्यांच्यासाठी छान
छान गोष्टींची आखणी करण्यात येत होती. पंतप्रधान इंदिरा गांधी,
वसंतदादा पाटील, ज्येष्ठ नेते, अभिनेते यांच्या मृत्यूची वार्ता थेट आकाशवाणीवरूनच तात्काळ मिळाली होती.सांगलीच्या आकाशवाणी केंद्राने अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
आज सांस्कृतिक,साहित्यिक माहिती असणारी मंडळी येथे
काम करत आहेत. आजही प्रत्यक्ष घटना स्थळावरून प्रसारण करण्याची
सुविधा राबवण्यात येते. निवडणुकीच्या काळात निकाल ऐकताना श्रोत्यांच्या
कानापासून रेडिओ हलत नाही. 1963 पासून सुरू झालेला आकाशवाणीचा
हा प्रवास आज पंचावन्न वर्षे पूर्ण होत आली तरी अखंड सुरूच आहे. दूरदर्शन , विविध चॅनेल्स,एफएमसारखी
आक्रमणे आली,परंतु सांगली आकाशवाणीचा बाज कुणालाही आला नाही.
व्यवसायात कोणताही उथळपणा न आणता संस्कृतीचा मान राखत सांगलीची आकाशवाणी
अजूनही डौलाने उभी आहे.
No comments:
Post a Comment