बालकांच्या मूळ जडणघडणीत महत्त्वाची
भूमिका अंगणवाडी सेविका पार पाडतात.मात्र त्या कामाच्या अतिरेकी
बोझ्याखाली पार दबून गेल्या आहेत. मानधनही तुटपुंजे आहे.त्यापेक्षा इतर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना चांगले मानधन आहे.
मानधन वाढीबाबत नियुक्त केलेल्या समितीने मानधनवाढीची शिफारस केली आहे,तरीही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे वैतागलेल्या
अंगणवाडी सेविकांनी म्हणजे त्यांच्या कर्मचारी संघटनेने 1 एप्रिलपासून
बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना हे संपाचे
हत्यार का उपसावे लागले आहे,याचा इथे ऊहापोह करुया.
मूल 3 वर्षाचे
झाले की, अंगवाडीच्या सेविकेच्या ताब्यात येते. म्हणजे त्या निम्नस्तर वर्गातील मुलांच्या खर्या पालनपोषणकर्त्या
आहेत. मुलांच्या तीन ते सहा वयोगटातील या वाढीच्या महत्त्वाच्या
टप्प्यात शिक्षण देण्याबरोबर, त्यांचे आरोग्य व योग्य आहारपोषणाची
काळजी घेत, सुदृढ व निरोगी बालक घडवण्याचे काम या सेविका निष्ठेने
करत आहेत. मुलांच्या व्यक्तिमत्वाची मूळ पायाभरणी इथे होते.
परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या मूलभूत गरजाही शासन पुरवू शकले
नाही. त्यासाठी सेविकांनी लढा पुकारला आणि शासनाला दखल घेणे भाग
पाडले आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या एकात्मिक बालसेवा योजनांतर्गत
महाराष्ट्राभर 94 हजार अंगणवाड्या आहेत. सद्यस्थिती पाहता अंगणवाडीमध्ये झोपडपट्टी, मजुरी,
घरकाम करणार्यांची मुले असतात. हा वर्ग कमी शिकलेला असल्याने, त्यांच्यामध्ये स्वच्छता,
आरोग्य यांचे महत्त्व, शिक्षण आदी गोष्टींची जागृती
करण्याचे काम या सेविका करतात. आरोग्य, शिक्षण, पोषण सेवेची जबाबदारी या अंगणवाडी सेविका पार
पाडतात. गरोदर माता, नवजात ते सहा वर्षापर्यंतच्या
बालकांचे लसीकरण, तीन महिन्यांपासूनच्या गरोदर महिला ते सहा महिन्यांपर्यंतच्या
स्तनदा माता, एक ते सहा वर्षापर्यंतचे बालक यांना पूरक पोषण आहार
देणे. आपल्या परिसरात गृहभेटी देणे, त्यावेळी
कोणी बालक आजारी असेल तर त्याचा रिपोर्ट देणे. आरोग्य सर्वेक्षण
करणे, किशोरवयीन मुलींमध्ये हिमोग्लोबिन कमतरता आढळल्यास त्यांना
पूरक आहार देणे, महिला व माता समितीच्या मीटिंग्ज घेणे,
त्या अंतर्गत त्यांना आरोग्यशिक्षण देण्याचे काम या कर्मचारी करत आहेत.
अंगणवाडी वर्गातील मुलांना बडबडगीतं शिकविणे, गोष्टी
सांगणे, एबीसीडी, प्राणीपक्ष्यांची ओळख
सांगणे, विविध खेळ घेणे अशा विविध गोष्टी मुलांना शिकवल्या जातात.
मुलांना खाऊ देणे, मुलांची आरोग्य तपासणी,
दर महिन्याला वजन करणे आदी कामे सेविका करतात. तसेच, ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत
पोहचवण्याचे अतिरिक्त काम करावे लागत आहे.
सुमारे दोन लाख अंगणवाडी महिला
कर्मचारी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचत अविरत कार्य करीत आहेत. तरीही शासनदरबारी त्यांची उपेक्षाच होते, अशी भावना सेविकांची
झाली आहे. याची अनेक कारणे आहेत. राज्यात
एकूण एक लाख 80 हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस
व मिनीअंगणवाडीच्या 20 हजार सेविका आहेत. त्यांचे भविष्य शासनाच्या दुर्लक्षामुळे अंधकारमय होत आहे. कामाचा अतिरिक्त बोजा, अत्यल्प व अवेळी मिळणारे वेतन,
सुपरवायझरची दादगिरी व आर्थिक झळ यात सेविका भरडल्या जात आहेत.
शासनाने आजपर्यंत दिलेल्या पोकळ आश्वासनांना कंटाळून
त्यांनी आंदोलन पुराकरले आहे.
या कर्मचार्यांचे मानधन कधीही वेळेत
मिळत नाही. बैठकीसाठी असलेला प्रवासभत्ताही वेळेवर आणि वर्षोंवर्षे
मिळत नाही. अंगणवाडी मुख्य केंद्रामध्ये आलेले विविध साहित्यही
स्वखर्चाने न्यावे लागते. कधीकधी बचत गटांनी नाश्ता, जेवण न दिल्यास या सेविकांनाच तयार करावे लागते. त्यासाठी
कधीकधी खर्चही करावा लागतो. अनेक प्रकारच्या कामाचे ओझे वाहणार्या सेविकांना कधी कधी मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. काही सुपरवायझर दादागिरी करतात, अशी तक्रार सेविकांची
आहे. कामावरून कमी करण्याची धमकी देणे, कधी थोडा उशीर झाला तर गैरहजेरी लावणे, रिपोर्ट खराब
करण्याची धमकी देणे आदी प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः
ग्रामीण भागामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भीतीपोटी
हा सर्व त्रास सेविका व मदतनीस सहन करतात. निवृत्तीनंतर पुढे
काय? हा प्रश्नही सेविकांच्या पुढे मोठा
आहे. निवृत्तीवेतनाचा जीआर निघूनही त्यांची अंमलबजावणी नाही.
इतर राज्यांच्या तुलनेने मानधन अतिशय तुटपंजे आहे. वाढ म्हणून 100 व 250 रुपये वाढवून
जणू क्रूर चेष्टाच केली. मानधनाच्याबाबतीत देशातील अन्य राज्यांच्या
तुलनेत महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना तुटपुंजे मानधन मिळते. पाँडेचरी,गोवा आणि तेलंगणा या राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना
अनुक्रमे 19480,15000 आणि 10500 इतके आहे.केरळ आणि तामिळनाडूमध्ये हेच मानधान अनुक्रमे 10000 आणि
8हजार 500 रुपये इतके आहे.मदतनीसांनाही साडेतीन हजारपासून 13340पर्यंत मानधन आहे.मात्र महाराष्ट्रात फारच कमी मानधन मिळते. या सेविकांना
अंनत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे बेमुदत संपासारखे
हत्यार उपसावे लागले आहे.
No comments:
Post a Comment