विज्ञान
हा विषय पुस्तक वाचून शिकविता येत नसून तो अनुभवाने शिकविणे गरजेचे आहे.
यासाठी आपल्या देशातील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे.
विज्ञान हा विषयाला अनुभवांपासून दुरावता येणार नाही. हा विषय पूर्णपणे अनुभवांशी निगडीत आहे. वर्गात शिक्षकाने
किंवा पालकांनी अधोरेखित करुन दिलेले एखादे उत्तर पाठ करुन परीक्षेत ते उतरविणे ही
आपल्याकडची रूढ पद्धत अत्यंत चुकीची आहे. परीक्षांना देण्यात
येणार्या अवाजवी महत्त्वाचा हा परिणाम आहे, असे म्हणावे लागेल.
शाळांमध्ये
विज्ञानाचा अभ्यास हा प्रत्यक्ष प्रयोग करुन शिकविला गेला पाहिजे.
त्याशिवाय विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षणात आवड निर्माण होणार नाही.
यासर्वासाठी आपल्या शिक्षण पद्धतीचा साचा बदलणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठ, राज्य शासन, शिक्षण मंडळे, शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा बोर्डाने
पुढाकार घेणे आवश्यक आहे. परीक्षा मंडळांनी केवळ ठराविक साच्यातच
परीक्षा घेणे चुकीचे आहे. त्यात काळानुरुप बदल करणे गरजेचे आहे.
शाळेत
शिकविताना शिक्षकांनी सर्वप्रथम ‘मी माझ्या समोर असलेल्या
विद्यार्थ्यांपेक्षा हुशार आहे. त्यांना काय कळतं, माझा अनुभव जास्त आहे.’ हा अहंभाव मनातून काढून टाकला
पाहिजे. तरच तो शिक्षक विद्यार्थ्यांना हा विषय व्यवस्थित शिकवू
शकतो. विज्ञान हा विषय सैधांतिक आहे. यामुळे
यातील सिद्धांत समजणे गरजेचे आहे, आणि हे सिद्धांत समजण्यासाठी
प्रयोगाद्वारे शिक्षण देणे गरजेचे आहे. शाळांनी, शैक्षणिक संस्थांनी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. देशात विज्ञान शिक्षण पद्धतीवर अनेक प्रयोग सुरु असून ते अत्यंत लहान स्वरुपात
आहेत. शाळा, महाविद्यालयातील काही शिक्षक
शिकविण्याच्या पद्धतीत निरनिराळे प्रयोग करत असतात. मात्र त्या
प्रयोगांना व्यापक स्वरुप येण्याची गरज आहे. यामध्ये विज्ञानसंस्थांबरोबर
शासकीय हातभार तसेच विद्यापीठांनी पुढे येणे आवश्यक आहे.
बर्याचदा विद्यार्थी प्रश्न वा एखादी समस्या सोडविताना
गोंधळतात यामागचे कारण म्हणजे त्यांच्या डोक्यात असलेली सूत्रे वापरण्याची पद्धत.
मग जर विद्यार्थ्यांनाच प्रश्न तयार करायला सांगून
तो सोडविण्यास सांगितला तर विद्यार्थ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. हा विचार एका शिक्षकाने केला आणि
त्या शिक्षकाने एक महिना विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या व्यतिरिक्त
अशाप्रकारचे प्रशिक्षण दिले. त्याचा परिणाम इतका चांगला झाला
की विद्यार्थ्यांचे भौतिकशास्त्राचा पाया पक्का झाला व त्यांच्या मनातील त्या विषया
संदर्भातील भीती पूर्णत: दूर झाली. अशाप्रकारचे
प्रयोग विविध ठिकाणी झाले पाहिजे तरच आपली शिक्षण पद्धती सुधारेल आणि आपला देश खर्या अर्थाने विज्ञानाधिष्ठ होईल.
शाळेतील
शिक्षण पद्धतीच्याबाबतीत नेमके कोणते पाऊल उचलण्यासाठी काही गोष्टींचा अंगिकार केला
गेला पाहिजे. परदेशात नव्याने रुढ झालेल्या रचनावादाचा आपण
पुरस्कार केला पाहिजे, असे काही तज्ञांना वाटते. विद्यार्थ्यांच्या स्वयंकल्पनांना
वाव दिला पाहिजे. शिक्षक वारंवार मी सांगतो तेच बरोबर आहे असे
म्हणत जर विद्यार्थ्यांची कल्पकता मारत असेल तर, विज्ञानाच्या
अभ्यासात विद्यार्थ्यांना रुची वाटणे कठीण आहे. रचनावादाच्या
सिद्धांतामध्ये प्रत्येकाच्या कल्पनेला वाव देण्यात येतो. त्यानुसार
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अथवा त्यांच्या कल्पनेला शिक्षकांनी वाव दिला पाहिजे.
विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळू शकते. आपल्याकडे रचनावाद रुजलेलाच नाही, विशेष म्हणजे तो अनेकांना
माहितीदेखील नाही. विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या
चुका समजून घेणे आवश्यक आहे. मुलं त्यांच्यापाशी असलेल्या अनुभवातून
अंदाज बांधत असतात आणि त्यातून त्यांची कृती होत असते. त्यांच्या
चुकीचे मूळ शोधून जर त्यांना त्याचे स्पष्टीकरण दिले तर त्यांची खर्या अर्थाने प्रगती होईल.
विज्ञानाचा अभ्यास बदलण्यासाठी विज्ञानाच्या
पुस्तकांचा साचा बदलणे आवश्यक आहे. पुस्तकांमध्ये प्रात्यक्षिकांवर
भर देण्यात आला पाहिले. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे
1 ली ते 5 वीच्या पाठयपुस्तकांमध्ये बदल करण्याचे
काम सुरु आहे. त्याचबरोबर येथे होणार्या
ऑलिम्पियाडसचाही विज्ञान शिक्षणात बदल घडविण्यात वाटा आहे. प्रयोगाच्या
आधारे पाठयपुस्तके लिहिली गेली पाहिजेत. याचे प्रयत्न
काही ठिकाणी सुरु आहेतच. नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च
अॅण्ड ट्रेनिंग सेंटरने काढलेली नवीन पाठयपुस्तके विज्ञानाच्या
अभ्यासासाठी अनुकुल असून त्या आधारावर महाराष्ट्र शासनाने पाठयपुस्तकांची निर्मिती
करावी असा सल्लाही काही संशोधक प्राध्यापकांनी दिला आहे. पाठ्यपुस्तक
निर्मिती मंडळाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांचा
शिकविण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काही पावले उचलण्याची आवश्यकता आहे. यासाठीही बरेच प्रयत्न सुरु आहेत. होमी भाभा विज्ञान
शिक्षण केंद्रातर्फे टिचर्स ट्रेनिंग देण्यात येते. यासाठी सर्व
स्तरातील शिक्षकांनी पुढे येणे गरजेचे आहे. प्रत्येक स्तरावर
शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे प्रयत्नही करण्यात आले. पण काही
तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा या प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या होमी भाभा केंद्र आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांसाठी विविध
कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. याचा फायदा नक्कीच होत आहे,मात्र यात व्यापकता यायला हवी.
माणसाच्या
दैनंदिन जिवनातील विज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जात असल्याने विज्ञान साक्षरता
निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्याला देशाची बौद्धिक, सांस्कृतिक प्रगती करायची असेल तर शिक्षणाचे संयोजन करणे अपरिहार्य आहे.
आज विज्ञान व तंत्रज्ञान हे प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले
आहे. त्याचबरोबर या माध्यमातून फसवाफसवीचे प्रमाणही वाढले आहेत.
त्यामुळे विज्ञान साक्षरता पसरणे गरजेचे आहे. येत्या
काही वर्षांमध्ये विज्ञान आयुष्यातील अविभाज्य घटक बनणार आहे. त्यामुळे विज्ञान शिक्षण क्रमप्राप्त होणार आहे. याचे
गांभीर्य जाणून 1968 मध्येच कोठारी कमिशनने विज्ञान शिक्षणाचे
महत्त्व पटवून दिले आहे. सर्वाची बुद्धिमत्ता समान स्तरावर मानून
अभ्यासक्रम बनविण्यात येतो याचा अर्थ असा आहे की, प्रत्येकाला
विज्ञान येऊ शकते. त्यामुळे शिक्षक, पालक
यांच्याकडून होणारा विज्ञानाचा बागुलबुवा कमी झाला पाहिजे.
No comments:
Post a Comment