Saturday, October 15, 2011

यशस्वी स्त्रीच्यामागे पुरुष

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते.पण अशाही काही महिला आहेत, ज्यांना यशाच्या शिखरावर पोहचवण्यात पुरुषांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशाच काही परिचित हस्तींच्या  'हमसफर' प्रवासाची चर्चा करणार आहोत.
डॉ.श्याम लुल्ला हे प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला हिचे पती. पेशाने डोक्टर. मानसशास्त्रतज्ज्ञ डॉ. लुल्ला एक मोकळ्या विचाराचे व्यक्तीमत्त्व. त्यांनी लग्नानंतर नीताला तिची स्वतःची 'आयडेंटी' निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले. वास्तविक नीता १६ वर्षाची होती, तेव्हा शिक्षण सोडण्याच्या विचारात होती. तिच्या वडिलांनी तिला शेवटी लग्न नाहीतर उच्च शिक्षण यापैकी कुठलाही एक पर्याय निवडण्यास सांगितले. नीताने आनंदाने लग्नाचा पर्याय स्वीकारला. पण श्याम आणि त्यांच्या कुटूंबाला तिने 'हाऊस वाइफ'चे जिणे जगावं , असे वाटत नव्हते. त्यांना वाटत होतं की, तिने पारंपारिक शिक्षणापेक्षा कुठला  तरी 'हटके'  प्रोफेशनल कोर्स करावा. नंतर नीताने मुंबईच्या एसएनडीटी युनिवर्सिटीमधून फॅशन डिझायनरचा कोर्स पूर्ण केला. आता ती 'सेलिब्रिटीं'ची डिझायनर म्हणून ओळखली जाते. ऐश्वर्या, अभिषेक, श्रीदेवी, जुही चावला, अमीषा पटेल, करिना कपूर यांच्यासह आलिकडच्या अनेल बॉलीवूड ऍक्ट्रेसशिवाय हॉलीवूडच्या कलाकारांची डिझायनर आहे. फॅशन डिझायनिंगमध्ये राष्ट्रीय ऍवार्ड मिळवलेली नीता या सार्‍या यशाचे श्रेय आपल्या पतीराजाला देते. श्याम मानसतज्ज्ञ आहेत. त्यांनी तिची प्रतिभा वेळीच ओळखली नसती तर ती आज ' हाऊस वाईफ'चं जीणं जगत असती.
राजकिशन आणि इंदिरा नूई यांची पहिली भेट अमेरिकेत झाली. राजकिशन इंजिनिअर होते. तर इंदिरा आपली ओळख बनविण्याच्या प्रयत्नात होती. राजकिशन यांना तिचा लढाऊबाणा भावला. व दोघांनी कुटुंबांच्या  संमतीने लग्न केले. आज इंदिराला 'पेप्सीको' या आंतरराष्ट्रीय शीतपेय कंपनीची सीईओ  म्हणून ओळखले जाते. मॅनेजमेंट कन्सलटंट असलेल्या राजकिशन यांनी एक मित्र बनून तिच्या प्रतिभेला   वाट दाखवण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं.
बृज बेदी देशातल्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी म्हणून नाव कमावलेल्या आणि आज निवृतीनंतर 'भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण' कार्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसोबत स्वतःला झोकून दिलेल्या किरण बेदींचे पती. किरणने आपल्या मोठ्या बहिणीच्या बेजोड लग्नामुळे  निर्माण झालेल्या कलहाचा परिणाम म्हणून स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याचा निर्णय घेतला.  हा शोध बृज बेदींच्याजवळ येऊन थांबला. टेनीसची  खेळाडू असलेल्या किरणवर त्यांनी कुठलीही बंधने घातली नाहीत. " टोम बॉय" प्रमाणे जीवन जगणार्‍या किरणने पोलिस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा बृज बेदींसह घरच्या सार्‍यांनी तिला पाठिंबा दिला. किरणने आपल्या कर्तव्याला अग्रक्रम दिला, कारण मागे सारी कुटुंबाची जबाबदारी साम्भालायला बृज बेदी सक्षम होते. ती कामामुळे नेहमी घरापासून दूर असे, पण तिच्या पती-बृज बेदीं यांनी कुटुंबाची सारी जबाबदारी आपला व्यवसाय सांभाळत चोख पार पाडली. बृज यांनी तिच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. किरण ज्या ज्या गोष्टीची हक्कदार आहे, ते सारं तिला मिळावं, यासाठी त्यांची धडपड असे.
राजेश त्यागी वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरीचे पती. स्वतः वेटलिफ्टिंगमध्ये अनेक पदके पटकावली आहेत. महाविद्यालयीन स्तरावर  त्यांनी राष्ट्रीय चॅम्पियनचा किताब पटकावला आहे. कर्णमने त्यांच्याकडूनच वेटलिफ्टिंगचे धडे गिरवले. याच दरम्यान दोघांनी एकमेकाला जोडीदार निवडले आणि लग्न करण्याचे ठरवले. घरचा प्रखर विरोध असूनही राजेश यांनी कर्णमशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी तिच्या करिअरकडे अधिक लक्ष देण्याला प्राधान्य दिले. सिडनीत कास्यपदक पटकावून कर्णमने देशात नाव कमावले. शिवाय आपल्या पतीचा विश्वासही सार्थ ठरवला.
प्रसिद्ध वायलिनिस्ट आणि पेशाने डॉक्टर असलेले डॉ. एल सुब्रम्हण्यम विख्यात गायिका कविता कृष्णमूर्ती हिचे हमसफर आहेत. काव्य आणि संगीत यांनी त्यांना एकमेकांजवळ आणलं. सुब्रम्हण्यम यांच्यासाठी कविताला हरिहरनसोबत एक गीत गायचे होते. समोर प्रसिद्ध वायलिनिस्ट असल्यानं कविताला मोठं टेन्शन आलं होतं. त्यांच्या मनासारखं गाणं होईल का, याची चिंता तिला सतावत होती. पण स्टुडिओत गेल्यावर त्यांचा विनम्र आणि शांत स्वभाव पाहून तिचे टेन्शन कुठच्या कुठे दूर पळाले. याचवेळी तिने आपला जोडीदार असावा तर असा, असे मनोमन ठरवून टाकले. योग जुळून आला आणि दोघे विवाह बद्ध झाले. संगीत दोघांचाही आत्मा. त्यामुळे लग्नानंतरही कविताला गायला मोकळीक मिळाली.  
विश्वविख्यात सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसेनचे पती नासीर हुसेन आयएएस अधिकारी होते. स्टेट टेनिंग कॉर्पोरेशनमध्ये चीफ जनरल मॅनेजर पदावर काम केल्यानंतर ते शहनाजची कंपनी सांभाळत आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न आणि सोळाव्या वर्षी आई बनलेल्या शहनाजला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते की आपण एक दिवस सौंदर्य उद्योगातली एक जानी-मानी शख्सियत होऊ. तेहरानच्या पोस्टींगदरम्यान ऑफिसर नासीर हुसेन कामावरून घरी परतायचे तेव्हा ती नेहमी त्यांची वाट पाहात उभी राहिलेली पाहायला मिळायचे. तिने वाट पाहण्यातच सारे आयुष्य घालवू नये, असे त्यांना वाटत असे. शेवटी त्यांनी तिला कॉस्मेटीकलॉजीच्या अभ्यासासाठी घराबाहेर काढले. लंडन, पॅरीस, न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांमध्ये आणि हेलेना रुबीन्स्टीन आणि क्रिस्टीन वाल्मेसारख्या विश्व प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन केंद्रांमधून या विषयाचे शिक्षण घेऊन भारतात परतल्यावर नासीरच्या मदतीने पहिले सौंदर्य उपचार क्लिनिक उघडले. आणि बघता बघता तिने लोकप्रियतेचे सारे विक्रम मोडले. तिच्या क्लिनिकचा विस्तार विश्वभर झाला आहे. आज शहनाज हुसेन एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एक ब्रँडमध्ये म्हणून जगतविख्यात बनली आहे.
केवळ यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, असे नव्हे तर यशस्वी महिलेमागेसुद्धा पुरुष खंबीरपणे उभे असतो, याचीही काही ही वानगी दाखल नावे आहेत, जी कौतुकास पात्र आहेत.
                                                      - मच्छिंद्र ऐनापुरे, सांगली
                                                

No comments:

Post a Comment