जगात गुन्हेगार निर्माण होत नाहीत अथवा गुन्हेगारी सापडत नाही, असा देश पृथ्वीच्या पाठीवर सापडणे अशक्य. ही गुन्हेगारी विशेषतः पैशासाठी अथवा अथवा आपली हौसमौज भागविण्यासाठी केली जाते. भ्रष्टाचार, शेतीवाडी प्लॉट अशी स्थावर मालमत्ता हडपणे, लाच खाणे, खून- बलात्कार अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारीने सगळीकडे थैमान घातले आहे. अशा गुन्हेगारांना शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात असते. गुन्ह्याच्या आवाक्यानुसार गुन्हेगाराला कमी- अधिक शिक्षा होत असते. पण त्यासाठी साक्षी-पुरावे गोळा करावे लागतात. अर्थात इथेही भ्रष्टाचार फोफावला आहे. पैशासाठी साक्षी फिरवण्याच्या घटना आता नव्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे पैसा हा सर्वश्रेष्ठ बनला असल्याने ही दुनिया पैशाच्यामागे धावताना दिसत आहे. गुन्हेगारी संपवायची भाषा बोलायला सोपी आहे, परंतु प्रत्यक्षात अंमलात आणणे, महाकठीण आहे. आजकाल गुन्हेगारीचे यामुळेच उदात्तीकरण होत आहे. संघटीत गुन्हेगारीचे म्होरके छुप्या पद्धतीने गुन्ह्यांची सूत्रे हालवत आहेत. गुन्हेगारांना कायद्याची भिती राहिलेली नाही. त्यांना जात, धर्म, पंथ नसतो. त्यांची मानसिकताच पहिल्या गुन्ह्यापासून धीट बनलेली असते. शिक्षणाने गुन्हेगारांची विकृती बरी होत नाही. कठोर शिक्षा आणि संस्कार यासाठी महत्त्वाचे आहेत. शिक्षा ही चुकातून बोध घेण्यासाठी असते. शिक्षा विकृती घालवण्याचे काम करते. त्यासाठी गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान आवश्यक आहे. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, पण सुसंस्कृत होत नाही. विचार आणि संस्कार यातून माणूस घडतो. संस्कारातून नीतीमत्ता निर्माण होते. जी माणसे प्रामाणिक असतात. त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ त्यांच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी मिळतेच.
No comments:
Post a Comment