राजा शिवशक्तीला एकुलता एक राजपुत्र होता. त्याच्या पोटात एक साप वास करीत होता. यामुळे तो अत्यंत कमजोर बनला होता. अनेक वैद्यांनी त्याच्यावर उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. निराश होऊन त्याने घर सोडले. इकडे-तिकडे भटकत भटकत तो दुसर्या राज्यात पोहचला. तिथे तो भिक मागून आपले पोट भरू लागला आनि एका मंदिरात दिवस काढू लागला.
या राज्याच्या राजाचे नाव बली होते. त्याला दोन राजकन्या होत्या. त्या रोज सकाळी राजाच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायच्या. पहिली नमस्कार करून म्हणायची," महाराजांचा विजय असो, आपला आशीर्वाद असावा. आपल्या आशीर्वादाने सुख-वैभव मिळू दे." धाकटी म्हणायची," महाराज, आपल्याला आपल्या कर्माची फळे मिळू देत."
राजा म्हणायचा," माझ्या कर्मामुळेच तुम्ही इतक्या सुखात राहता आहात." धाकटी राजकन्या म्हणायची, " नाही महाराज, हे माझ्या कर्माचे फळ आहे." राजा धाकटीच्या बोलण्याने नाराज व्हायचा.
एक दिवस राजाने प्रधानाला आदेश दिला, " कडवे बोल बोलणार्या ह्या माझ्या धा़कट्या राजकन्येचा विवाह एखाद्या भिकार्याशी लावून द्या. भोगू देत तिला तिच्या कर्माची फळे !"
प्रधानाने तिचा विवाह मंदिरात राहणार्या भिकारी राजपुत्राशी लावून दिला. राजकन्या अगदी प्रसन्न मनाने आपल्या पतीची सेवा करू लागली. काही दिवसांनी ती आपल्या पतीसह परराज्यात निघून गेली. तिथे एका सरोवराच्या काठाला झोपडी बांधून राहू लागली.
एक दिवस राजपुत्र-पतीस घराची राखण करण्यास सांगून घरसामान आणण्यासाठी स्वतः नगरात गेली. इकडे राजपुत्र एका दगडावर डोके ठेऊन स्वस्थ झोपला होता. त्याच्या पोटातला साप बाहेर आला. इतक्यात तिथे असणार्या बिळातला एक सापही बाहेर आला. तो पोटात वास करणार्या सापाला म्हणाला," किती दृष्ट आहेस तू? त्या बिचार्या राजपुत्राला किती छळतोस. त्याला जुन्या राईची कांजी पाजल्यास तू तात्काळ मरशील. हे कुणाला ठाऊक नाही असं तुला वाटतं का ?"
पोटातल्या सापाला राग आला. " तू काय स्वतःला साळसूद समजतोस? स्वतःच बघ. बिळात सोन्याच्या नाण्यांची दोन हंडे लपवून ठेवला आहेस आणि मला शहाणपणा शिकवतोस. बिळात उखळते तेल किंवा पाणी ओतल्यास भाजून मरून जाशील." राजकन्या परतली होती. ती लपून त्यांचे बोलणे ऐकत होती. तिने त्यांनीच सुचवलेल्या उपायांचा अंमल करून दोघांचाही वध केला. बिळातले हंडे काढून घेऊन ती आपल्या राज्यात आली आणि पतीसोबत सुखा-समाधानात राहू लागली.
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment