मेवाडचा महाराणा आपल्या एका नोकरास नेहमी सोबत ठेवत असे. मग ते युद्धाचे मैदान असो अथवा परमेश्वराचे मंदिर. एकदा महाराणा एकलिंगजी देवाच्या दर्शनाला गेले. सोबत नोकर होताच. दर्शन झाल्यावर जरा पाय मोकळे करण्यासाठी दोघे तलावाकाठी फिरायला आले. तिथे त्यांना एका झाडाला खूप आंबे लगडलेले दिसले. त्यांनी त्यातला एक आंबा तोडला. त्याचे चार भाग केले. त्यातला एक भाग नोकराला देत म्हणाले," खाऊन पहा आणि चव कशी आहे ती सांग मला.'
नोकराने आंबा खाल्ला नी म्हणाला, " खूप गोड आहे, महाराज. आपल्याला एक विनंती आहे, महाराज. मला आणखी एक फोड देण्यात यावी." महाराजांनी त्याला आणखी एक आंब्याची फोड दिली. तीही खाऊन नोकर म्हणाला, " व्वा काय स्वाद आहे, अगदी अमृतासमान ! महाराजांनी आणखी एक फोड देणयाची कृपा करावी."
महाराजांनी त्याला तिसरी फोडही दिली. ते खाताच नोकर म्हणाला," काय मधुर आहे. व्वा, मजा आली. महाराज, ही राहिलेलीही फोड देऊन माझ्यावर कृपा करावी." आता मात्र महाराणांना संताप आला. ते म्हणाले," तुला लाज वाटत नाही ? तुला सर्वकाही पहिल्यांदा मिळतं. तरीही तुझा हव्यास संपला नाही. आता ही फोड अजिबात मिळणार नाही." असे म्हणतच राजाने राहिलेली आंब्याची फोड दाताखाली धरली. आणि काय आश्चर्य ! त्यांनी ती लगेच थुंकून टाकली. " बाप रे! इतकी आंबट. आणि तू तर गोड आहे म्हणालास ? आणि अमृततुल्य म्हणत खाऊनही टाकल्यास. असे का म्हणालास ?"
नोकर म्हणाला," महाराज, आयुष्यभर तुम्ही मला गोड गोड आंबेच देत आला आहात. आज आंबट आंबा निघाला म्हणून कसे म्हणू की हा आंबट आहे. असं म्हणणं म्हणजे कृतघ्नपणा नव्हे काय ?" महाराजांनी त्याला गळ्याशी घेतले. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment