हजारो वर्षांपूर्वी एका जंगलात एक साधू राहत होते. त्याचा बराचसा वेळ ध्यानधारणा करण्यात जात असे. त्यांनी आपल्या झोपडी परिसरात खुपसे पशू-पक्षी सांभाळले होते. ते त्यांची खूप काळजी घेत. पशू-पक्षीसुद्धा तितकेच त्यांच्यावर प्रेम करत. त्यांची सेवा करत. मदत करत. कोण त्यांच्यासाठी ताजीताजी फळे तोडून आणत असे. कोण अन्नाचे दाणे आणत तर कोण कंदमुळे. सगळेच जे जे काही आणत, ते साधूबाबांसमोर ठेवत. बाबा त्यातले थोडेसे आपल्यासाठी ठेवत आणि बाकीचे सगळे त्यांच्यात वाटून टाकत. प्राणी त्यांना प्रेमाने साधूबाबा म्हणत. अशाप्रकारे काही वर्षे गेली.
एक दिवस साधूबाबांनी पाहिले की, पशू-पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. बाब मोठी गंभीर होती. त्यांनी प्राण्यांना रात्रीची गस्त घालण्यास सांगितले. हलकू घोड्याला पूर्व भागाचा पहारा देण्यास सांगितले. झबरु कुत्र्याला पश्चिम, गदू अस्वलाला उत्तर आणि दक्षिण भागाची जबाबदारी जंबो हत्तीवर सोपवली.
दुसर्याचदिवशी पशू-पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी साधूबाबा स्वतः जंगलात फेरफटका मारायला निघाले. साधूबाबा पूर्व दिशेला आले, तेव्हा त्यांना हलकू घोडा मऊशार गवतावर आरामात झोपला असल्याचे दिसले. साधूबाबांना खूप वाईट वाटले. जवळूनच शिकार्यांच्या पावलांचा ठसे गेल्याचे साधूबाबांनी पाहिले. त्यांनी त्याला उठवले. हलकू खडबडून जागा झाला. बाबा म्हणाले, " काय हलकू, पहारा दिलास नाहीस वाटत ?" हलकू अडखळत बोलला," नाही... नाही साधूबाबा, रात्रभर जागलो होतो. बस्स ! आता जरा डोळा लागला होता."
साधूबाबा म्हणाले," मला खोटे बोलू नकोस. तू रात्रीचा पहारा दिला नाहीस. " अशाप्रकारे साधूबाबांनी त्याला खरे बोलण्यास सांगितले. पण हलकू त्यांच्यापुढे खोटेच बोलत राहिला. साधूबाबांना राग अनावर झाला. ते म्हणाले, " एका साधूपुढे तू खोटे बोलतोस.जा, निघून जा इथून. माझ्या डोळ्यांसमोर अजिबात थांबू नकोस. इथून पुढे असा आडवा होऊन कधीच आरामात झोपणार नाहीस. झोप आली तरी तू उभ्या उभ्याच झोप घेशील. हा माझा शाप आहे तुला." हलकू घाबरला. रडला. गडगडला, " बाबा, मला माफ करा. यापुढे अशी चूक कदापि होणार नाही. मला माफ करा..." पण हलकूवर साधूबाबा इतके रागावले होते की, त्याला त्यांनी अजिबात माफ केलं नाही. त्यादिवसांपासून घोडा कधी आडवा होऊन झोपला नाही. _ मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment