खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा कुत्रा , मांजर आणि उंदीर यांच्यात दाट मैत्री होती. एकदा कुत्र्याला काही कामानिमित्ताने दुसर्या गावाला जाणे भाग पडले. जाताना त्याने आपल्याजवळील आवश्यक कागदपत्रे देखभालीसाठी मांजराकडे दिली. आणि तो निघून गेला.
काही महिने उलटले. तरीही कुत्रा काही आला नाही. मांजराने विचार केला, आता काही दिवस कागदपत्रे सांभाळण्यास उंदराकडे द्यावीत. शेवटी हो ना करत त्याने मैत्री कर्तव्याखातर कागदपत्रे घेतली. आणखी काही महिने गेले. थंडीचे दिवस आले. कडाक्याची थंडी पडू लागली. उंदराला थंड सहन होईना. थंडीने तो कुडकुडू लागला. त्याने विचार केला, या जिवघेण्या थंडीपासून सुटका करून घेण्यासाठी या कागदांचा चांगला उपयोग होईल. मग काय! उंदराने त्या कागदाचेच घर बनवले. आणि त्या घरात आरामात राहू लागला. त्याची थंडी पळून गेली. शिवाय अन्नासाठी त्याला कुठे बाहेर जावे लागले नाही. घरात स्वस्थ बसून कागद कुरतडून खाऊ लागला.
काही दिवसाने कुत्रा माघारी आला. त्याने मांजराकडे आपल्या कागदपत्रांची मागणी केली. मांजराने त्याला उंदराकडे नेले. तेथे पाहतो तर उंदराने कागदपत्रांची पार दुर्दशा करून टाकली होती. अनेक कागदांचा भुगा करून टाकला होता. कागदपत्रांची ही आवस्था पाहून मांजर संतापले. उंदराची बेफिकीरी त्याला सहन झाली नाही. मागचा पुढचा विचार न करता तो उंदरावर धावून गेला. उंदीर घाबरून पळू लागले. इकडे कुत्र्याला मांजराचा राग आला. कसलाही विचार न करता मांजराने उंदराकडे कागदपत्रे दिलेच कशी , असा सवाल करत कुत्राही मांजराच्या पाठीमागे लागला. तेव्हापासून मांजर उंदराच्या आणि कुत्रा मांजराच्या पाठी धावू लागला.
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment