Saturday, October 1, 2011

बालकथा महाल आणि धर्मशाळा

एक संन्यासी राजाच्या महालाखाली येऊन झोपला. पाहरेकर्‍यांनी त्याला तेथून हटविण्याचा खूप प्रयत्न केला पण, त्याने त्यांना अजिबात जुमानले नाही. पाय पसरून स्वस्थ झोपून राहिला.
पाहरेकर्‍यांनी त्याला सांगितले, ‘हा राजाचा महाल आहे. तुला आराम करायचा असेल तर धर्मशाळेत जा."  संन्यासी म्हणाला," हा महाल नाही. धर्मशाळा आहे. मी इथेच विश्रांती करणार." असाच काही काळ वाद होत राहिला. पण संन्यासी आपल्या मतावर ठाम राहिला. शेवटी संन्यासी  ऐकत नाही म्हटल्यावर त्याची बंदीखान्यात रवानगी करण्यात आली.
दुसर्‍यादिवशी दरबारात त्याला राजासमोर उभे करण्यात आले. राजा म्हणाला, " एका संन्यासानं खोटं बोलणं उचित नाही. तुला माहित नाही काय कि हा माझा महाल आहे तो ? यास तू धर्मशाळा कसे म्हणतोस ?"
" राजा, हा महाल नाही, धर्मशाळा आहे." संन्यासी.
राजा आश्चर्यात बुडाला. राजा काही बोललाच नाही. संन्याशानेच विचारले," महाल आणि धर्मशाळा यात फरक काय?"
" महाल कायमच्या निवासासाठी असतो तर धर्मशाळा काही काळाच्या विश्रांतीसाठी." राजा उत्तरला.
" राजा, तू ज्या महालात राहतोस ,तो कुणी बनवला ?"
" माझ्या वडिलांनी- महाराजांनी"
" ते या महालात किती वर्षे राहिले ?"
 " पाच वर्षे."
"त्यानंतर...?"
" आता मी राहतो आहे."
" तू या महालात कायम राहणार आहेस काय ?"
हे वाक्य ऐकल्यावर मात्र राजाचे डोळे उघडले. त्याने विचार केला, संन्यासी म्हणतो ते बरोबरच आहे. हे जीवन म्हणजे काही दिवसांचा प्रवासच होय. आणि ज्याला मी आजपर्यंत महाल म्हणत होतो, ती तर विश्रांतीची एक धर्मशाळाच आहे.                                        - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment