संपूर्ण बॉलिवूड व्यापलेलं एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अमिताभ बच्चन. १९७० पासून हिंदी चित्रपटांत अमिताभरूपी सुरू झालेला झंझावात आजही कायम आहे. कलाकार कितीही मोठा असला, तरी वयाचं बंधन त्याला झुगारणं ही असाध्य गोष्ट असते. मात्र बच्चन यांनी आपल्या करिष्म्याने हा असाध्य प्रकार जवळपास साध्य केला आहे. यामुळेच चैतन्याचा टवटवीत झरा असलेलं हे व्यक्तिमत्त्व जिवंतपणीच दंतकथा बनलं आहे, असं म्हणण्यात अजिबात अतिशयोक्ती नाही.
महान पित्याच्या घरी जन्माला आलेला मितभाषी आणि आत्ममग्न असणारा अमिताभ नोकरी असतानाही मनातून अस्वस्थ असायचा. आपल्या स्वप्नांना मोकळी वाट करून देण्यास संकोचायचा. पण चित्रपटाची हाक त्याला स्वस्थ बसू द्यायची नाही. शेवटी सुरक्षित नोकरीला लाथ मारून चित्रपट क्षेत्रातला जुगार खेळायला मुंबईला आला. के. ए. अब्बास यांनी 'सात हिंदुस्थानी' चित्रपटातल्या एका व्यक्तिरेखेसाठी अमिताभची निवड केली. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातल्या अमिताभच्या अभिनयाने अनेकजण प्रभावित झाले. या चित्रपटामुळे चांगल्या संधी येतील या अपेक्षा मात्र फोल ठरल्या. महिनाभरानंतर स्वप्नाचं भयानक वास्तव समोर आलं. चित्रपटातला जुगार महागात पडणार अशीच सारी परिस्थिती दिसत होती. स्टुडिओ ते स्टुडिओ फिरून, प्रत्येक निर्मात्याचे उंबरठे झिजवूनही अमिताभला भूमिका मिळत नव्हत्या. शेवटी चित्रपटनिर्माता हृषीकेश मुखर्जी यांनी त्याला राजेश खन्नाच्या 'आनंद' मध्ये संधी दिली.
' आनंद' मधल्या अमिताभच्या दमदार अभिनयामुळे खरं तर " टेक ऑफ पॉईंट' ठरला असता, मात्र त्याच्या नशिबी यश इतक्या लवकर लिहिलं नव्हतं. त्यानंतर आलेले जवळजवळ अकरा चित्रपट अपयशी ठरले. परवाना, बॉम्बे टू गोवा, प्यार की कहानी, रेश्मा और शेरा, बन्सी बिरजू, एक नजर, रास्ते का पत्थर, संजोग, गरम मसाला, बंधे हाथ असे एकामागे एक चित्रपट आले आणि गेले. शेवटी ही अपयशाची गाथा प्रकाश मेहरा यां च्या 'जंजीर' ने खंडीत केली. १९७३ चा हा चित्रपट अमिताभच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. मात्र या चित्रपटाचा किस्साही मोठा रंजक आहे. जंजीरमध्ये खरंतर सुरुवातीला होती मुमताज. पण राजकुमार आणि त्यानंतर देवआनंदने या सिनेमाला नकार दिल्यानंतर तिच्यासमोर अमिताभ आला. तेव्हा तिने या ताडमाड उंचीच्या हिरोसमोर उभं राहायलाही नकार दिला. तेव्हा जया भादुरी पुढे आली. प्रत्यक्ष जीवनातही उत्तम ट्युनिंग जुळलेली ही जोडी त्या सिनेमात पडद्यावरही हीट ठरली.
अँग्री यंग मॅनची प्रतिमा दशकभर कायम राहिली. अमिताभसोबत काम केलेल्या चित्रपट निर्मात्यांनी त्याला अनेक प्रतिमा दिल्या हृषीकेश मुखर्जींच्या चित्रपटातला अस्वस्थ, यश चोप्रा यांचा रोमांटिक, प्रकाश मेहरांचा गंभीर आणि मनमोहन देसाईंचा मनोरंजक अमिताभ प्रेक्षकांना दिसला. या व्यक्तिरेखांमध्ये विविध रंग भरन्याची चढाओढ सुरू झाली. काही वेळेस ती प्रेक्षकांच्या पसंदीस उतरली, काही वेळेला नुकसान झाले. हा नवा सुपरस्टार राजेश खन्नाच्या स्थानाला धक्के देऊ लागला. आणि एक वेळ अशी आली की, या स्थानासाठी अमिताभला पसम्दी देण्यात आली. अमिताभने राजेश खन्नाला मागे टाकले.
अमिताभच्या लोकप्रियतेने कळस गाठला. त्याच्या सिनेमाची तिकिटे ब्लॅकने विकली जाऊ लागली. थिएटरवर तिकिटांचा ब्लॅक बाजारसुद्धा त्याच्याच कारकिर्दीत फोफावला. अशातच त्याला 'कुली'च्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला. तो लवकर बरा व्हावा म्हणून सारा देश प्रार्थना करू लागला. देशभरातून पवित्र धागे पाठवण्याचा, उपास-तापास , यात्रा करण्याचा अशा अनेक मार्गाचा अवलंब चाहत्यांनी तो बरा व्हावा म्हणून केला. शेवटी पुन्हा अमिताभ पडद्यावर परतला. सगळ्यांना हायसे वाटले.
अमिताभचा राजकारण प्रवेशही गाजला. अर्थात हा निर्णय भावनाशीलतेतून घेण्यात आला होता. आई इंदिरा गांधी यांच्या निधनानंतार राजकारणात आलेल्या राजीव गांधींना आपल्या आजूबाजूला विश्वासातील माणसे हवी होती. मित्र अमिताभ त्यासाठी परिपूर्ण होता. अमिताभ अलाहाबाद मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाला. पण महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्यांनी त्याची आवस्था अभिमन्यूप्रमाणे केली. राजकारण सोडण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय राहिला नाही. राजकारणातला घोडेबाजार कवीच्या मुलाला मानवला नाही आणि तो पुन्हा 'शहेनशा' च्या रुपाने कलात्मक क्षेत्राकडे वळला. १९८६ साली के. भाग्यराजचा संस्मरणीय 'आखरी रास्ता' प्रदर्शित झाला. कथा अतिशय सुरेख होती. पुढे चुका होत गेल्या अर्थात या सगळ्या चुकांना एकटा अमिताभ जबाबदार नव्हता.त्याचे जुने दिरग्दर्शक अमिताभसोबत यशाला ग्राह्य धरून बसले. 'गंगा जमुना सरस्वती' ही त्याची सुरुवात. 'जादुगार', तुफान' असल्या ठुकार कथानकाच्या चित्रपटांमुळे त्याचे चित्रपट चालेनासे झाले.
मुकुल आनंदसारख्या दिग्दर्शकाने त्याला पुन्हा स्टारपदावर नेण्याचे ठरवले. १९९० मध्ये 'अग्निपथ', १९९१ मध्ये 'हम' आणि १९९२ मध्ये 'खुदा गवाह' आला. पण अंडरवर्ल्ड, गुन्हेगारी पार्श्वभूमीने उदवस्त झालेले कुटुंब, कॉस्चुम ड्रामा असा विविध प्रयत्न असूनही चित्रपट चालले नाहीत. 'अजुबा', इंद्रजीत, अकेला, इन्सानियत असले चित्रपट त्याच्या कारकिर्दीला आणखी खोलात नेत गेले. मात्र त्याची धडपद सुरूच होती. याच कालावधीत टीव्ही एशिया काढला. एबी कॉर्पोरेशनची घोषणा झाली. ही त्याच्यासाठी सर्वात मोठी आनि वाईट घटना होती. यामुळे त्याच्या गुणावगुणांवर प्रसारमाध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. अनिवाशी भारतीयचा मुद्दाही गाजला. मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन गाजले. परंतु या सगळ्या गोष्टी सुरू असताना अमिताभ शिकतच होता. चुका सुधारण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचबरोबर त्याच्या अंतर्मनातही बदल होत होता. वय आणि अनुभव यामुळे त्याच्या स्वभावात बदल घडत गेला. शिवाय त्याच्या अभिनयातही निहार येत राहिला.
या दरम्यान त्याचे चित्रपटही पडद्यावर येत होते. 'मृत्युदाता' , 'लाल बादशहा' , ' सूर्यवंशम', 'मेजरसाब' सारखे चित्रपट आले आणि गेले. पण त्याने संकटांना आणि अपयशाला धीराने तोंड दिले. २००० मध्ये या सुपरस्टारने ' कौन बनेगा करोडपती' द्वारे या सुपरस्टारने छोट्या पदद्यावर पर्दापण केले. त्याचवेळी ' मोहबतें' आला. यामुळे त्याच्या कारकिर्दीला नवी आणि नव्याने सुरूवात झाली. मुख्य प्रवाहातल्या चरित्र भूमिकांना त्याने प्राधान्य दिले. आज सत्तरी ओलांडली तरी तो नव्या दमाने काम करीत आहे. उलट वय वाढत जाईल तसतसे त्याच्यात तारुण्याचा पुनश्च: शिरकाव होत आहे काय असे वाटत असल्यासारखा त्याचा जोश दिसत आहे. आजच्या घडीला त्याच्यासारखा तोच, एकमेवाद्वितीय असा चित्रसृष्टी व्यापून राहिला आहे.
२५ वर्षांपूर्वी अमिताभने जेव्हा त्याच्या स्वतःच्या व्यक्तिरेखेच्या वडिलांची भूमिका केली होती तेव्हा त्याने साकारलेली वृद्ध व्यक्तिरेखा ही त्याच्या आजच्या रुपापेक्षा तुलनेने शांत आणि शरीराने दमछाक झालेली होती. वास्तवात अमिताभ अधिकच जोशपूर्ण आणि उत्साही दिसत आहे. अमिताभला 'बागबान' मधून या वयातही नायिकेसोबत प्रेमदृश्यं करायला मिळतील किंवा ' कजरा रे...' या गाण्यात तरुण पिढीला स्वतःच्या तालावर नाचवता येईल असं भाकित कोणाला करता आलं नसत? धमाकेदार नृत्य, जबरदस्त अभिनय, अनेक कंपन्यांचा राजदूत, स्टेज शो.... किती तरी ठिकाणी अमिताभ एकाचवेळी काम करताना दिसतो.त्याने नायकाकडून चरित्रकलाकारापर्यंतचा प्रवास सहजतेने केलाच, शिवाय चरित्र भूमिकेत मध्यवर्ती स्थानी राहून या वयातही सेक्स सिंबॉल बनला. 'ब्लऍक', 'सरकार' , ' विरुद्ध'
कभी अलविदा न कहना (समर जीत सिंह तलवार), बाबुल (बलराज कपूर), 2007- नि:शब्द (विजय) एकलव्य (एकलव्य), चीनी कम (बुद्धदेव गुप्ता), शूट आऊट एंड लोखंडवाला (डींगरा), झूम बराबर झूम (सूत्रधार), रामगोपाल वर्मा की आग (बब्बन सिंह), गंगा (भोजपुरी), 2008- भूतनाथ (कैलाशनाथ/भूतनाथ), सरकार राज (सुभाष नागरे), दि लास्टलियर (हरीश मिश्रा), गॉड तुसी गेट्र हो (गॉड अलमाइटी), 2009- अलादीन (जीनियस), पा (औरो), 2010- रण (विजय हर्षवर्धन मलिक), तीन पत्ती (वैंकट सुब्रमण्यम), कंधार (मलयालम) (लोकनाथन शर्मा), 2011- बुड्ढा होगा तेरा बाप (विजू), आरक्षण (प्रभाकर आनंद) ने त्याची कीर्ती कायम राखली.
आज चित्रपटसृष्टीत सगळ्यात व्यस्त कोण असेल तर अमिताभ बच्चन शाहरुख खान, अमिर खान, हृतिक रोशन याम्च्यासारखे आघाडीचे कलाकार वर्शाला एखाद-दुसरा चित्रपट काढतात. मात्र हा कलाकार मात्र दोन-दोन, तीन तीन चित्रपटही करीत आहे. वय वाढेल तसे त्याने कामात अधिक गुंतवून घेतल्याचे दिसते. रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत तो कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतो. पहाटे पाच वाजता त्याचा दिवस सुरू होतो. शेवटी त्याच्यासारखा तोच. या वाढदिवसाच्यानिमित्ताने त्याला लाख लाख शुभेच्छा ! - मच्छिंद्र ऐनापुरे
No comments:
Post a Comment