Wednesday, August 1, 2012

राखी बांधायला बहीणी आणायच्या कोठून?

     माणूस अश्मयुगाअगोदरपासूनच स्वतः च्या हिताचा विचार करत आला आहे. स्वतः च्या रक्षणासाठी समुहाचा आश्रय त्याने घेतला. स्वतः भोवती एका नात्याची गुंफण केली. यातून भावनिक, मानसिक समाधान मिळवू लागला. ही नाती पुढे विस्तारत गेली. भाऊ, बहीण, पत्नी असा त्याचा वाढविस्तार होत होत चुलत, मावस, सावत्र, दूरचा, जवळचा अशी नाती चिकटत गेली. माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी जशी धडपड चालवली तशी नात्याचीवीण घट्ट करण्यासाठीही त्याची धडपड वाढत गेली. माणूस फिरस्ता बनला. जाईल, तिथे नाती जोडू लागला. माणसे मिळवू लागला. भावनिक, मानसिक गुंतवण करीत राहिला. आज माणूस सातासमुद्र पार  करून आता परग्रहावर विसावायला निघाला आहे. पण हे करीत असताना नवनवीन नाती जोडत राहिला आहे.
     माणूस प्रगती करत राहिला, स्वतःच्या सुखासाठी, नात्याखातर  चंद्र- तारे तोडण्याची भाषा करू लागला.   त्यासाठी जीवही द्यायला तयार झाला. निसर्गाच्या सानिध्यात राहत माणसाने आपल्या मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रांत शेकडो क्रांत्या घडवल्या. पण त्याने आपल्या दैनंदिन जीवनात, सांस्कृतिक जीवनात आणि भावविश्‍वात घडवलेली सर्वश्रेष्ठ क्रांती म्हणजे ही नात्यांची क्रांती  होय. पण आता तो स्त्री भ्रूणहत्येसारखे पाप करून या नात्यालाच संपवायला निघाला आहे, हे मोठे दुर्दैवी होय. या वेडपटापायी तो  आजपर्यंत मिळवलेले सारे गमावू लागला आहे. स्वतः च्या पायावर धोंडा मारून घेऊ लागला आहे. त्याला आई हवी आहे, बायको हवी आहे, बहीण हवी आहे, पण तरीही स्त्री भ्रूणहत्या करून या नात्याच्या मूळावरच घाव घालायला लागला आहे. त्याला ही नाती हवी असतील तर पृथ्वीतलावर स्त्री जगली पाहिजे, याची जाणीवच नाही, असे कसे म्हणता येईल?   खरे तर नाती ही माणसाची सुंदर अशी निर्मिती आहे. माणूसपणाची ही खूण. पण तिलाच तो तडा देऊ लागला आहे. ही माणसाच्या अधः पतनाची सुरुवात म्हणायची का?  
      माणूस समूहजीवनात नाती घेऊन जगत आला आहे.  रक्ताची नाती, मैत्रीची नाती त्यानं जन्मास घातली. त्यावर आपल्या भावविश्‍वातला उजेड टाकण्यासाठी सणावाराचा सारिपाट मांडला. नात्याची विण घट्ट  होण्यासाठी  अनेक सण-उत्सव त्यानं सुरू केले. आज भावा-बहिणीच्या नात्याला राखीच्या धाग्यात गुंफणारा  रक्षाबंधन त्यापैकीच एक सण. या बंधनात  सणाच्या पलीकडचीही एक निराळी दृष्टी आहे. त्यामुळेच  स्त्री श्रेष्ठ की पुरुष, अशा मोजपट्टी घेऊन याकडे  पाहिले जाऊ  नये. कोण सबळ, कोण दुर्बल असे चष्मे घालूनही पाहू नये. माणसं, मनं, नाती जोडण्याचं एक साधन म्हणून त्याकडं पाहायला हवं. रक्षाबंधन हा बहीण-भावाचे नाते सुदृढ करणारा सण आहे. त्यांच्यातील अतूट प्रेम व्यक्त करणारा सण आहे. इतके अतूट, की बहीण-भाऊ परस्परांना आयुष्यही द्यायला तयार होतात. "राखी सजू दे सजू दे, बहीण माझी जगू दे' असा जागर करतात. असं हे मोठं भावविश्व आहे.
     नात्याचं भावविश्व मोठं असलं तरी त्यात स्वार्थसुद्धा खचाखच भरला आहे. वंशाच्या दिव्याचा हव्यास ठेऊन गर्भजल चिकित्सा करत गर्भाशयातच मुली मारण्याचा निर्दयी, अमानवी उद्योगही सुरू आहे. पैसा-अडका, घरदार, सुखवाद्च्या पाठीमागे लागताना मूल्यांची पायमल्ली केली, विज्ञानाचा गैरवापर केला, पण यात स्त्रीला कमी लेखण्यात आले. तिला दुय्यमत्व दिले. त्यामुळे मानवी विकासातल्या एका चाकावर घाला घातला जाऊ लागला. या मागे कित्येक कारणे असले तरी पुरुषप्रधान संस्कृतीला धक्का देण्यात स्त्रीला शक्य झाले नाही. त्यामुळे पुरुष सांगतो तसे किंवा समाज भीती बाळगून स्त्री वागत आली. पण यात मानवाचेच नुकसान आहे, याचा विचार केला नाही. स्त्री नष्ट झाली तर सगळी नाती नष्ट होणार आहेत. भावा-बहीणीचं नातं राहणार नाही. पती-पत्नीचं नातं राहणार नाही. आईची ममता कळणार नाही. कुठलीच नाती राहणार नाहीत. आणि नाती नसतील तर माणूस थोडाच राहणार आहे?
     पैशाच्या मोहापायी  मूल्यहीन झालेले व्यवसाय आणि मुलीविषयी तयार झालेली दुराव्याची, दुय्यमत्वाची भावना, रक्षाबंधनाला बहीण आणायची कोठून असा मोठा गहन प्रश्न वेडावून टाकतो.  पृथ्वीच्या पाठीवरून मुलगीच नाहीशी झाली की नव्या जगाचा पाळणाच हलणं बंद होईल. जग थांबेल. हा अराजकतेचा धोका टाळायला हवा. स्त्री भ्रूण हत्या रोखायला हवी.  मुलीच्या आयुष्यावर पसरणारा मृत्यूचा काळोख संपवण्यासाठी अशा सणावारालाही निर्धार करायला हवा. राखी हवी असेल तर ती बांधणारी बहीण नको का जीवंत राहायलाआपल्याला आई, बहीण, मावशी, मैत्रीण, पत्नी अशी सारी रूपं हवी आहेत. नव्हे ती  जगरहाटीची गरज आहे. कुठलीही नाती एकतर्फी जपली जात नाहीत, तर त्यासाठी नाण्याच्या दोन्ही बाजू खणखणीत असायला हव्यात. पण एक बाजू पुसणार असू तर नाणे कसे चालणार? त्यामुळे दोन्ही बाजू सक्षम असायला हव्यात.
     जग म्हणजे केवळ दगड-धोंडा, प्राणी- वनस्पती किंवा खाऱ्या पाण्याचे समुद्र नव्हे. या साऱ्यांना माणसाचा स्पर्श होतो किंवा या साऱ्यांच्या सावलीत  मानवी जीवन बहरते, फुलते, तेव्हा जग ही कल्पना सुंदर नि आशयपूर्ण वाटते. मात्र तिला सुरुंग लावण्याचा प्रयत्न म्हणजे भ्रूणहत्या. अशा हत्येखोरांना समाजानं मान्यता देऊ नये. मुलगी जन्माला घालणं ही जगातील सुंदर गोष्ट असते. मुलगी एकाच वेळी व्यक्तीही असते आणि नव्या जगाची, नाना नात्यांची निर्मितीही. निर्मितीलाच जर खलास केलं, तर जगाच्या झोळीत काय हो उरेल? राखी बांधून घेणाऱ्या सर्व मनगटांनी आणि बांधणाऱ्या सर्व मनांनी याचा विचारही करायला हवा. सणाचा अर्थ काय? सांस्कृतिक जीवन समृद्ध बनवणं, नाती गच्च करणं, मनाचं आवरण त्यावर टाकणं, मनाचा पिसारा घेऊन त्यांना स्पर्श करत राहणं होय. तर मग ही नाती, ही सांस्कृतिक समृद्धी टिकवायची असेल तर स्त्री भ्रूण्हत्येच्या पापापासून दूर राहायला हवं.
punya_nagari, ( sangli/ kolhapur) 2/8/2012

No comments:

Post a Comment