Thursday, August 16, 2012

बालकथा अस्वलाचे पिलू

"बाबा, मी बागेत झोपाळा खेळायला जाऊ?" अस्वलाचे पिलू अस्वलाला म्हणाले.
" नको रे, बघ अजून किती ऊन पडलं आहे आणि बागेत कुणी आलंही नसेल्.कुणी आलं की जा." अस्वल म्हणाले. पिलू हिरमुसले.
इतक्यात त्याला बागेच्या भिंतीवर बछडे दिसले. त्याला अत्यानंद झाला. त्या आनंदाच ओरडला. " बाबा, ते बघा बागेच्या भींतीवर !" अस्वलाच्या पिलाने अस्वलाला तिकडे पाहायला सांगितले.
"ठिकाय, जा" अस्वल म्हणाले.
तसा तो उड्या मारतच पळाला. त्याला पळत जाऊन झोपाळा पकडायचा होता. कारण बछड्यांनी झोपाळे पटकावले की त्याला लवकर खेळायला संधी मिळणार नव्हती. तो धावतच बागेत गेला. आणि पटकन एका झोपाळ्यावर जाऊन बसला. तो मजेत झोके घेऊ लागला, तोच तिथे वाघाचे चार बछडे आले. त्यातला सगळ्यात मोठा बछडा म्हणाला," आम्हाला झोके घ्यायचे आहेत."
" मग त्यावर घ्या की" अस्वलाच्या पिलाने दुसर्‍या झोपाळ्याकडे इशारा करत म्हटले. बागेत दोन झोपाळे होते.
" दिसत नाही का, आम्ही चौघेजण आहोत ते!" मधला बछडा रागात गुरगुरला.
" तुम्ही चार असा नाही तर पाच. मला काय त्याचे! त्यावर बारी बारीने खेळा" अस्वलाचे पिलू झोका घेत बेफिकिरीने म्हणाले.
" आम्ही चौघांनी एका झोपाळ्यावर आणि तू मात्र एकटा एका झोपाळ्यावर मजेत खेळणार. ते काही नाही. खाली उतर आधी." असे म्हणत सगळ्यात बारक्या बछड्याने जमिनीवरची माती उचलली आणि अस्वलाच्या पिलावर फेकली.
"ए... ए... माती  का फेकतोयस माझ्यावर..?" पिलू रागाने म्हणाले.
इतक्यात वाघाच्या एका बछडयाने दगड उचलून पिलावर फेकत म्हटले," तू तर इथे सारखा खेळायला येतोस, आम्ही मात्र फक्त सुट्टीच्या दिवशी येतो. उतर बघू आधी."
"मीही काही सारखा इथे येत नाही. सुट्टी असल्यावरच येतो." पिलू म्हणाले.
तू असा ऐकणार नाहीस." असे म्हणत चौघेही त्याच्याभोवती गोळा झाले. अस्वलाच्या पिलाने पटकन झोपाळ्यावरून उडी मारली व  त्यांच्या कोंडाळ्यातून बाहेर आला. आणि आपल्या वडिलांना हाक मारू लागला." बाबा, बाबा"
तिकडे लांब एका इमारतीच्या गच्चीवर पिलाचे बाबा काही तरी शोधत होते. ते त्याच्याकडे पाहात म्हणाले, " काय रे, काय झाले? ये बघू इकडे."
चारही बछड्यांनी पाहिलं. तिथे खरोखरच एक अस्वल उभे होते. त्यांना वेगळंच ऐकू आलं." काय रे काय झालं? थांब! आत्ता आलो."
ऐकल्यावर झोपाळ्याजवळ गेलेला छोटा बछडा पटकन बाजूला जाऊन उभा राहिला.
अस्वलाचे पिलू पुन्हा म्हणाले," बाबा, जरा इकडे या."
अस्वल म्हणाले,' अरे, मी इथे कामात आहे. तूच इकडे ये."
वाघाच्या बछड्यांनी ऐकलं," तू तिथेच थांब, मी तिकडे आलोच."
आता तिघे बछडे छोट्या बछड्याजवळ जाऊन उभे राहिले.तिथे अस्वल अजून उभे होते. पण इकडे या चौघांनी धूम ठोकली. पडत्-झडत कसे तरी ते भींतीवर चढले. आणि उडी मारून पसार झाले.
अस्वलाचे पिलू आता एकटेच झोपाळ्यावर बसून झोके घेऊ लागले. एकदा या झोक्यावर तर एकदा त्या झोक्यावर. एकदम त्याच्या डोक्यात आले, वाघाच्या बछड्यांनी आपल्या आई- वडिलांना बोलावून आणले तर...!'
आता त्याला खेळायचा कंटाळा आला. 'दोन्ही झोपाळ्यावर मी एकटा तरी किती झोके घेणार? 'असे म्हणत  तेही तेथून पळत सुटले. त्याने मागे वळून पाहिलेच नाही. 
          

No comments:

Post a Comment