Friday, August 31, 2012

फिनिक्स 'आर्मस्ट्रांग' ची वाताहत?

      फिनिक्स म्हणजे राखेतून पुन्हा भरारी घेणारा पक्षी. या पक्षाशी ज्याची तुलना केली जात होती, त्या अमेरिकन सायकिलिस्ट लान्स आर्मस्ट्रांग याने त्याच्याविरोधात चाललेली डोपींग संबंधातली न्यायालयीन लढाई लढण्यास नकार देऊन अनेक प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. कॅन्सर या  जीवघेण्या आजाराशी कणखरपणे लढा देऊन नंतर सायक्लिंगमधले प्रतिष्ठेचे  'टुअर डी फ्रान्सहे पदक लागोपाठ सातवेळा पटकावणार्‍या लान्स आर्मस्ट्रांगने ही लांबलेली लढाई लढण्यास नकार दिला आहे. वास्तविक आता शेवटच्याच काही साक्षी राहिल्या असताना त्याने माघार घेऊन सगळ्यांनाच बुचकाळ्यात टाकले आहे. मात्र अमेरिकेच्या एंटी डोपिंग एजन्सी (यूएसएडीए) ने त्याच्यावर केवळ आजीवन बंदी घालून थांबली नाही तर त्याने पटकावलेली 'टुअर डी फ्रान्स' या सात पदकांसह सर्व पदके काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
     आपल्या राखेतून पुन्हा पुन्हा जिवंत हो ऊन मिथकांचा मृत्यूंजय असलेला फिनिक्स पक्षी जसा नव्याने पुर्‍या जोमाने भरारी घेतो. तशीच भरारी अमेरिकन सायकिलिस्ट लान्स आर्मस्ट्रांगने आपल्या आयुष्यात घेतली होती. परंतु, त्याच्या आयुष्याला डोपिंगची काळी किनार लागली. असे असतानाही जगभरातील प्रसारमाध्यमे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्याने ज्या प्रकारे व्यवस्थेविरोधात लढण्यास माघार घेतली, ती मात्र त्यांना रुचलेली नाही. आर्मस्ट्रांग म्हणतो,' खूप झाले! मी माझी बाजू कुठेवर मांडत राहू?' ऑस्टिनच्या एका न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने धीर सोडलेल्या आर्मस्ट्रांगने अचानक हा निर्णय घेतला. अमेरिकन डिस्ट्रिक्ट न्यायालयाच्या स्पॅम स्पार्क्स या न्यायाधीशांनी युएसएडीएच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उभे केले असताना आर्मस्ट्रांगचा निर्णय दुर्दैवी म्हणावा लागेल. आता हे प्रकरण जनतेच्या दरबारात पोहचले आहे. तेथील जनता त्याच्याशी कसा व्यवहार करते, ते पाहावे लागणार आहे.
     फ्रान्सची 'टुअर डी फ्रान्स' ही सायकिलिंग विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. ही स्पर्धा 23 दिवसाच्या आत तीन हजार 200 किलोमीटरचे अंतर अनंत अडथळे पार करून कापायचे असते. ही स्पर्धा अमेरिकन सायकिलिस्ट लान्स आर्मस्ट्रांगने 1999 ते 2005 पर्यंत लागोपाठ सात वेळा जिंकून विजेतेपद पटकावले आहे. केवळ ही स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे नाही, तर कॅन्सरच्या आजारातून उठल्यानंतर त्याने केलेली ही अतुलनीय कामगिरी महत्त्वाची आहे. 1996 मध्ये त्याला टेस्टिकल कॅन्सर झाला होता. फुफ्फुस आणि मेंदूवर प्रभाव टाकलेल्या या आजारातूनशक्यता डॉक्टरांनी कमीच वर्तवली होती. सर्जरी आणि कीमोथिरेपीच्या जीवघेण्या त्रासातून जाताना त्याने केवळ कॅन्सरलाच हरवले नाही तर लागोपाठ सात वेळा 'टुअर डी फ्रान्स' चा किताब पटकावला. शिवाय ऑलिम्पिकमध्ये कास्यपदकही पटकावले आहे. आजारातून बाहेर पडून इतकी मोठी कामगिरी तशी अशक्य कोटीतील गोष्ट आहे.
     आर्मस्ट्रांगच्या निमित्ताने आपल्या युवराजसिंहची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अलिकडेच त्यानेही कॅन्सरवर विजय मिळवला आहे. युवराज आजारी होता, तेव्हा आर्मस्ट्रांगने त्याला लवकर बरा होण्याचा संदेश दिला होता. अमेरिकत उपचार घेत असताना युवराजने ट्वीटद्वारे  ही माहिती दिली होती.  युवराजने आर्मस्ट्रांगची 'इटस नॉत अबाऊट द बाईक' ही आत्मकथा वाचली होती. आणि त्यातून त्याला प्रेरणा मिळाली होती, मनोबल वाढले होते. डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूंची पुढे वाताहत झाली आहे. त्यांचे करिअर बरबाद झाले आहे. पण आर्मस्ट्रांगची पदके माघारी घेण्याची घोषणा झाली, तेव्हा त्याला उलट अनुभव आला. त्याने ट्वीट करताना म्हटले,' लिवस्ट्रांग समर्थकांचा मी आभारी आहे. ... रोजच्या आर्थिक मदतीपेक्षा आज 25 पटीने त्यात वाढ झाली आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.' अचानक त्याची लोकप्रियता वाढली. जनता त्याच्याबरोबर आहे. आंतरराष्त्रीय सायकिलिंग युनुयन ( युसीआय) त्याच्या पाठीशी आहे. खेळ-साहित्य बनवणारी अग्रगण्य कम्पनी नाइकेसुद्धा त्याच्यासोबत आहे.
     युएसएडीएचे म्हणणे असे की, आर्मस्ट्रांग 1996 पासून प्रतिबंधित औषधे घेत होता, ज्यात रक्ताचा प्रवाह वाढविणारे स्टेरॉयड्स होते. शिवाय त्याच्यावर दुसर्‍या खेळाडूला डोपिंगची सवय लावण्याचा आरोपही आहे.' यावर  आर्मस्ट्रांगचे म्हणतो,' डोपिंगच्या सार्‍या टेस्टमध्ये मी निर्दोष ठरलो आहे. नियमानुसार आठ वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणांची चौकशी करता येत नाही. युएसएडीए तर 17 वर्षांपूर्वीचे जुने मढे उखरून काढत आहे. हे  'विच हंटिंग' आहे.' वास्तविक आतापर्यंत ज्या काही टेस्ट, चौकशा करण्यात आल्या, त्यात आरोप सिद्ध झाले नाहीत. काही खेळाडूंच्या साक्षी आणि ई-मेल्ससारखे परिस्थितीजन्य पुरावे त्याच्याविरोधात आहेत. पण आर्मस्ट्रांगच्या म्हणण्यानुसार,' कॅन्सर आणि कीमोथेरेपीने पिडीत असलेले त्याचे शरीर स्टेरॉयड आणि अन्य नशेची औषधे झेलण्यास सक्षम नाही."
      त्याने गेल्यावर्षीच खेळातून निवृत्ती पत्करली आहे. दोन वर्षांपर्यंत अमेरिकन संघीय सरकारने त्याच्याविरोधात असलेल्या गुन्ह्यांचा तपास केला, त्यातून तो सहिसलामत सुटला. युएसएडीएचे म्हणणे आहे की, त्यांच्याजवळ 2009- 10 च्या काळातले आर्मस्ट्रांगच्या रक्ताचे नमुने आहेत, ज्यात नशिली औषधे आढळून आली आहेत. पण ही नमुने तर त्याच्या चॅम्पियन बनल्यानंतरच्या 4-5 वर्षांनंतरचे आहेत.
     डोप डोपिंगने मोठमोठ्या खेळाडूंची कारकिर्द बरबाद झाली आहे. बेज जॉन्सन आणि मेरियन जोन्स यांच्यासारख्या खेळाडूंची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सायकिलिंग रेस मूळी नशिल्या औषधांसाठी बदनाम झाली आहे. आर्मस्ट्रांगवरसुद्धा सुरुवातीपासून आरोप होत आला आहे. पण तो लघवी व रक्ताच्या तपासणीतून निदोर्ष सुटला आहे. आता फक्त काही व्यक्तींच्या साक्षी उरल्या आहेत. आर्मस्ट्रांगला त्यांचा सामना का करावासा वाटला नाही, हाच मोठा प्रश्न आहे. कदाचित त्याला वाटत असेल, कटकारस्थानाने आपल्याला अडकविले जाण्याची शक्यता आहे. युएसएडीए त्याच्यामागे हात धुवून लागली आहे, म्हटल्यावर त्याचा भरवसा तुटला असणार. मात्र तो म्हणतो," मी स्वतः ला कधी दोषी मानले नाही. पण आता मी कॅन्सरपिडीत रुग्णांसाठी लढाई लढत राहीन." तरीही एक प्रश्न उरतोच. त्याने जिंकलेली पदके माघारी घेतल्यानंतर ती दुसर्‍या क्रमांकाच्या खेळाडूंना दिली जातील का?"  का सायकिलिंग रेसच्या विश्वातले त्याचे ध्रुवपद अढळ राहील?

No comments:

Post a Comment