Sunday, August 12, 2012

साठ वर्षात आम्ही काय कमावलं, काय गमावलं

      मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि १५ ऑगस्ट १९४७ च्या दिवसाची सुरुवात झाली.  भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला. त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या. आपण एका नव्या स्वतंत्र भारतात पाऊल ठेवले. पण स्वातंत्र्यप्रातीचा हा उत्कट आनंद निर्भळ मात्र नव्हता. देशाची फाळणी आणि त्या वेळी उफाळलेला भयानक हिंसाचार यामुळे एक प्रकारची उदासी पसरली होती. पण तरीही आम्हाला आशा आणि महत्त्वाकांक्षा होती, ती म्हणजे आमचे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक भविष्य स्वतः घडविण्याची. लोकशाही राज्यात ते शक्य वाटत होते. आता आपण याच महत्त्वाकांक्षेसोबत पन्नास साठ  वर्षाचा एक टप्पा पार केला आहे. आज आपण जी प्रगती साधली आहे, त्याची बिजे त्या दशकात रोवली गेली होती. हे लक्षात घ्यायला हवे. या कालावधीत आपल्याला बरेच क्लेशदायक, दु:खदायक घटनांना सामोरे जावे लागले. त्याचबरोबर  काही आनंददायी, यशदायी घटनाही वाट्याला आल्या. याचा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संक्षिप्त लेखाजोखा...
१९४७ ते १९६० 
भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान समितीने १९४७ साली सुरू केले. या समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारखे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते तर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅ. जयकर यांच्यासारखे प्रख्यात कायदेपंडित; तसेच सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता यांसारख्या कर्तबगार महिलाही होत्या. संविधान समितीने तयार केलेले संविधान २६ जानेवारी, १९५० रोजी अमलात आले. आणि अशा प्रकारे आपला भारत देश प्रजासत्ताक बनला.  ब्रिटिश साम्राज्यवादाविरुध्द लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता व लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या. या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनण्याचा मान डॉ. राजेंद्र प्रसाद यांना मिळाला. क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी १९५१ मध्ये दिल्लीत पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा भरविण्यात आल्या. १९५० मध्ये योजना आयोग आणि निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. १९५१ मध्ये पाणी आडविण्यावर भर देणारी आणि सिंचनाला प्राधान्य देणारी पहिली पंचवार्षिक योजना राबवण्याला सुरुवात झाली. याच वर्षी पहिल्यांदा सार्वजनिक निवड्णुका घेण्यात आल्या. भारताला टेक्नॉलॉजी क्षेत्रात पुढे आणण्याच्या उद्देशाने पश्चिम बंगालमधील खडगपूर येथे पहिली इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्था स्थापन करण्यात आली. १९५५ मध्ये भाखरा धरणाच्या कामाला प्रारंभ झाला. ५० च्या दशकात हिंदू विवाह अधिनियम लागू  करण्यात आला. यावरून बराच गदारोळ झाला.
१९६० ते १९७०
या दशकात देशाला अनेक जबरदस्त धक्के मिळाले. भारताचे पहिल्यांदा चीनशी १९६२ मध्ये तर १९६५ मध्ये पाकिस्तानशी युद्ध झाले. पंडित नेहरू ( १९६४) आणि लालबहाद्दूर शास्त्री (१९६६)  या दोन महान नेत्यांना आपल्याला गमवावे लागले. तरीही 'भारत निर्माण' साठी मैलाचा दगड ठरावेत, असे प्रयत्न याच दशकात झाले. १९६३ मध्ये डॉ. नॉर्मन बॉरलॉग  यांनी गव्हाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नव्या हायब्रीड जातीचे वाण उपयोगात आणले. याचबरोबर डॉ. एस. एम. स्वामीनाथन यांनी खताच्या वापरास प्रोत्साहन दिले. या दोघांच्या प्रयत्नाने आणि सिंचन व्यवस्थेमुळे हरित क्रांतिला चालना मिळाली. याच दशकात मन्सूर अली खाँ पतौडी यांनी भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळली. (१९६२) व संघात जिंकण्याची मानसिकता विकसित केली. 'आन' चित्रपटाद्वारा हिंदी सिनेमा रंगीत झाला. आणि 'संगम' 'जंगली' पर्यंत तो ईस्टमन कलर बनला. रिटा फारिया ही १९६५ मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकवणारी पहिली भारतीय महिला ठरली. याच दरम्यान पश्चिम बंगालमधून नक्षलवाद्यांच्या आंदोलनाला ( १९६७) सुरुवात झाली. १९६९ मध्ये भारत सरकारने १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
१९७० ते १९८०
     सत्तरच्या दशकाची सुरुवातीलाच भारताने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानला १९७५ च्या युद्धात पराभूत केले. सिमला करार (१९७२), पोखरण अणू परीक्षण (१९७४), भारताच्या पहिल्या आर्यभट्ट सॅटेलाइट उपग्रहाचे प्रक्षेपण अशा महत्त्वपूर्ण घटना घडल्या. पण १९७५ मध्ये आणीबाणी लादली गेली.   
१९८० ते १९९०
     ऐंशीचे दशक आशियाई खेळ ( १९८२) आणि क्रिकेट विश्वकप (१९८३) यासाठी विशेषत्वाने संस्मरणात राहिले. त्याचबरोबर इंदिरा गांधी यांची हत्या, रंगीत दूरदर्शनवर मालिकांचा प्रारंभ आणि राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी निवड आदी उल्लेखनीय घटना म्हणाव्या लागतील. राकेश शर्माच्या रुपाने पहिल्यांदा एक भारतीय अवकाशात पोहोचला. कॉम्प्युटरसुद्धा कार्यालयांमध्ये दिसू लागले.
१९९० ते २०००
या दशकाची सुरुवात मंडल आयोग व आयोध्या आंदोलनाच्या हिंसेने आणि राजीव गांधी यांच्या हत्येने ( १९९१)  झाली. या दशकात केबल टीव्ही, आर्थिक सुधारणा कार्यक्रम आणि सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. सॅटेलाइट टेलिव्हिजनचा नवा जमाना सुरू झाला. सुष्मिता सेन मिस युनिवर्स तर ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्ड बनली. याच दरम्यान पोखरणमध्ये पुन्हा एकदा अणूस्फोट (१९९८) घडवून आणला गेला. आणि १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानला कारगील युद्धात धूळ चारली.  
२००० ते आतापर्यंत
     २००० ची सुरुवात प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड, लारा दत्ता मिस युनिवर्स, दीया मिर्झा मिस एशिया पॅसेफिक आणि आदीती गोवारीकर मिसेज वर्ल्ड या ग्लॅमर जगतातल्या सौंदर्यवती ललना ठरल्या. पण भारतीय संसदेवरील हल्ला (२००१), गुजरात दंगल (२००२), सुनामी(२००४), मुंबई हल्ला ( २००८) सारख्या काळ्याकुट्ट घटना घडल्या. हे दशक रक्तरंजित दशक म्हणून ओळखले जाईल. मात्र याच दशकात भारताने आयटीसह अन्य क्षेत्रात पुर्‍या विश्वभरात आपला दबदबा निर्मान केला. २०१० मध्ये भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेचे नेटके संयोजन केले. अभिनव बिंद्राने देशासाठी पहिले वैयक्तिक गटात बिजिंगच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. आणि २०११ मध्ये भारताने पुन्हा एकदा क्रिकेट विश्व कपवर आपले नाव कोरले.
     एकूण काय तर या साडेसहा दशकांच्या स्वतंत्र भारताच्या या वाटचालीत आम्हाला बर्‍याच जखमांनी घायाळ केले असले तरी आम्ही बरेच काही मिळवलेही आहे. उतुंग भरारी घेतली आहे.

No comments:

Post a Comment