Wednesday, August 15, 2012

खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याची गरज

     लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदकांची कमाई करून आम्ही आजपर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी केली असली तरी खेळांच्या पदकांची तालिका आपल्याला आपल्या कमकुवतपणाची जाणीव करून देते. त्यामुळे या स्पर्धेत  डावाला लागलेल्या तीनशेपेक्षा अधिक सुवर्ण पदकांपैकी एकही सुवर्ण पदक आपल्याला मिळू शकले नाही, याची शरम वाटल्याशिवाय राहत नाही. एकशे एकवीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला एकही सुवर्ण पदक जिंकता येत नाही, यावरून आपल्या देशात क्रीडा क्षेत्र किती गांभिर्याने घेतले जाते, याचीच साक्ष पटते. भारताला रुपेरी पदक जिंकून देणारा सुशिलकुमार असो अथवा विजयकुमार किंवा कास्यपदक मिळवून देणारे गगन नारंग, सायना नेहवाल, योगेश्वर दत्त व मेरीकोम या सगळ्यांनी आपल्या स्वतः च्या हिंमतीवर ही पदके जिंकली आहेत. यात आपल्या सरकारचा किंवा क्रीडा संघांचा काडीमात्र संबंध नाही. आणि जो काही असेल, तो कागदी संबंधापुरता मर्यादित असेल.
     प्रत्येक ऑलिम्पिकच्या समारोपाला हमखास आश्वासन दिले जाते की, पुढच्या खेपेला आम्ही चांगले प्रदर्शन करू. आणि ही आश्वासने केवळ प्रसारमाध्यमांपुरते मर्यादित असतात आणि पुढे राहतातही. ऑलिम्पिक खेळात आठ वेळा सुवर्णपदक मिळवून देणार्‍या हॉकीने या खेपेला कमालीची निराशा केली. या खेपेला त्यांनी एकही सामना न जिंकण्याचा विक्रम आपल्या खात्यावर नोंदवला आहे. कालपरवापर्यंत आपण याच हॉकीला 'राष्ट्रीय खेळ' या नावाने संबोधत होतो आणि त्याच्या सुवर्णकाळाच्या गप्पा मारताना आजच्या दुर्दशेविषयी गळा काढत होतो, परंतु, केंद्र सरकार या हॉकी खेळाला आपला 'राष्ट्रीय खेळ'च मानायला तयार  नाहीत्यामुळे या खेळाची उरलीसुरली आत्मियताही संपली आहे. ऑलिम्पिकच्या लंडनवारीत हॉकी संघाने भारताच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली असताना केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने हॉकी हा खेळ आमचा 'राष्ट्रीय खेळ' नाही, असे एका माहिती अधिकाराखाली मागवण्यात आलेल्या अर्जाला उत्तर देऊन या खेळाला दूर कुठे तरी उचलून फेकून दिल्यासारखे करून टाकले आहे. भारताच्यादृष्टीने हा खेळ आता अस्पृश्य वाटायला लागला आहे. एकशे सोळा वर्षाच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात  एक हॉकी सोडला आणि मागील खेपेचा अभिनव बिंद्राचा वैयक्तिक सुवर्ण पदकाचा विषय सोडला तर एवढ्या वर्षात आणि एवढ्या खेळांमध्ये  आपण सुवर्णमय कामगिरी करू शकलेलो नाही, हे आपल्या देशाच्यादृष्टीने किती दुर्दैवी म्हणावे लागेल.  मात्र याच वेळेला दुसर्‍या बाजूला अमेरिकेचा मायकल फेल्पससारख्या खेळाडू आपल्या देशासाठी तब्बल अठरा सुवर्ण पदकांची कमाई करतो आहे. तर जमैका आणि क्यूबासारख्या छोट्या छोट्या देशांतील खेळाडूंनी चार चार सुवर्णपदके जिंकून  सव्वा अब्ज लोकसंख्येच्या भारताला आपली लायकी कळवून देण्याचाच हा प्रकार आहे.
      जगात लोकसंख्येच्यादृष्टीने दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेत पंचावन्नाव्या क्रमांकावर नाव यावेहा भारताच्यादृष्टीने खरे तर चिंतेचा विषय आहे. दीर्घकाळ ऑलिम्पिक खेळापासून दूर राहिलेल्या चीनने गेल्या काही ऑलिम्पिकमधून धूमधडाक्यात सुरुवात करत अमेरिकेलाही जबरदस्त धक्का दिला आहे. चीनच्या आश्चर्यकारक कामगिरीमुळे अमेरिकेची काळजी वाढली आहे. गेल्या खेपेला अमेरिकेला दुसर्‍या क्रमांकावर फेकणार्‍या चीनने यावेळेलाही अमेरिकेशी चांगलीच टक्कर दिली आहे. जगातले छोटे छोटे देश सहज चार-पाच सुवर्ण पदकाची कमाई करून जातात. मात्र सव्वाशे कोटीचा भारत देश केवळ सहा रजत आणि ब्रांझ पदकांवर समाधान मानतो, याचा कुठे तरी विचार झाला पाहिजे. याचा अर्थ सरळ आहे, आपण खेळाला सन्मानाचे स्थान कधी दिलेच नाही. ना खेळाला प्रोत्साहन दिले ना खेळाडूंना चांगली वागणूक. एक क्रिकेट सोडला तर अन्य खेळाला आपण तुच्छतेचीच वागणूक दिली आहे. 
 खरे तर आपल्या देशाची सभ्यता जितकी प्राचीन आहे, तितकी आपली क्रीडा परंपरा आहे. तीरंदाजी, तलवारबाजी, कब्बड्डी, खो खो सारखे खेळ आपल्या ऐतिहासिक, प्राचीन  खेळाची साक्ष देतात. हॉकी तर एक असा खेळ होता की, ज्यात ऑलिम्पिकच्या इतिहासात आमचा बोलबाला आणि दबदबा होता. पण खेळाकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिलेच नाही. जीवन जगण्याचे साधन म्हणून खेळाचा कधी विचार केला नाही, हेही तितकेच खरे आहे. 'शिकला-सवरलास तर होशील नवाब...हाच कित्ता आम्ही गिरवत आलो आहोत.  त्यामुळे घराघरात 'कुठे चाललास खेळायला, चल मुकाट्याने अभ्यास करत बस' असा मुलांना दरडवण्याचा आवाज येत राहिला. मात्र अलिकडच्या काळात थोडी फार परिस्थिती बदलली आहे. खेळाविषयीचा पालकांचा दृष्टीकोण बदलला आहे. शालेय स्तरावरही  खेळाची दखल घेतली जाऊ लागली आहे. पण अजूनही म्हणावे असे लक्ष अथवा प्रोत्साहन मिळत नाही. सरकार द्यायला हवे, तितके लक्ष देत नाही. खेळाला जगण्याचा हिस्सा बनवायला हवा. तरच परिस्थिती बदलणार आहे.  
     स्थानिक स्तरावरसुद्धा राज्य सरकारे, स्थानिक संस्था, विविध संघटना यांनीही खेळाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे खेळ मशहूर आहेत. गोवा आणि कोलकाता येथे फुटबॉलची धूम आहे. तर हरियाणा, पंजाब, केरळसारख्या राज्यात ऍथलेटिक्सवर भर दिला जातो. क्रिकेटची तर जादू पुर्‍या भारत वर्षात आहे. पण आपण आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे काम करतो का? हा प्रश्न आहे. एक क्रिकेट सोडला तर अन्य खेळाच्याबाबतीत नकारात्मकताच आढळून येत आहे. त्यामुळेच लंडन ऑलिम्पिकमध्ये आमच्या खेळांडूंनी या खेपेला सगळ्यात जास्त पदकांची कमाई केली, तरीही फटाक्यांचा आवाज, क्रिकेटसारखा गुंजला नाही. आपल्या देशी खेळांना जितका वाव द्यायला हवा, जितके कौतुक व्हायला हवे, तितके आपण करत नाही. शाळा, गल्लीत खेळ वाढला पाहिजे, रुजला पाहिजे, तरच तो राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचेल. आपण आपल्या खेळांना प्रोत्साहन दिल्याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व येणार नाही. चीनसारख्या देशाने पाठपुरावा करून आपले देशी खेळ ऑलिम्पिकमध्ये पाठविले. आपण मात्र आहे तिथेच आहोत. ही उदासिनता टाळायला हवी.
      आणखी एक गोष्ट अशी की, अलिकडे झालेल्या एका सर्व्हेक्षणानुसार आम्ही खेळाच्याबाबतीत किती गंभीर आहोत आणि आपल्या खेळाडूंचा हौसला वाढवण्याबाबतीत किती मागे आहोत, याची कल्पना  स्पष्ट होते. आपण भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करायला का कचरतो, कळायला मार्ग नाही. जोपर्यंत विजय मिळत असतो, तोपर्यंत टाळ्या मिळतात. पराभव झाला की आपण त्यांच्यावर लागलीच तोंडसुख घ्यायला लागतात. त्यामुळेच २००३ मध्ये एका पराभवानंतर मोहम्मद कैफच्या घरासमोर केवळ निदर्शने झाली नाही तर घरावर हल्लाही झाला. आपल्या देशात क्रिकेटला धर्माप्रमाणे मानलं जातं. मात्र तिथेच दुसर्‍या खेळाच्या खेळाडूचे नावही घेतले जात नाही, नव्हे अशा खेळाडूंची नावेसुद्धा लोकांना माहित नसतातअशी विचित्र परिस्थिती आहे. हा असा आपला इतर खेळांविषयीचा उदासी दृष्टीकोण असेल तर आपला देश कसा बरे विश्व चॅम्पियन होणार?
     खेळ हा शेवटी खेळ मानला पाहिजे. कारण त्यात जयपराजय ठरलेला असतो. यात आपली भूमिका फक्त एकच राहणार आहे, ती म्हणजे खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची! एक देश, एक आवाज आणि एक आत्मा बनून आपण खेळाला आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. खेळाडूंना जिंकण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करूनही  पराभव स्वीकारावा लागतो, असे झाले तरी आपण  त्यांना साथ द्यायला हवी. आपल्याला प्रत्येक खेळात विश्व चॅम्पियन बनयचं आहे.  प्रयत्नांना यशाची जोड द्यायची आहे. त्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, हौसला वाढविला पाहिजे. आपले प्रोत्साहन त्यांना प्रेरणा देईल आणि नक्की आपला देश क्रीडा क्षेत्रात विश्व चॅम्पियन बनेल.
     भारताला क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करायचा असेल खेळनीती अवलंबली गेली पाहिजे.  त्यासाठी पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे. देशी खेळांना वाव देण्याच्या, त्याच्या प्रसार वाढीच्यादृष्टीकोनातून प्रयत्न करायला हवेत. केवळ अधिकार्‍यांना किंवा खेळ संघटनांच्या प्रमुखांना पुढे आणण्यापेक्षा खेळाडूंना  पुढे आणून सुधारणेवर भर दिला गेला पाहिजे. तरच पुढच्या येणार्‍या काही वर्षात आपण पहिल्या दहात पोहचू शकू.  

1 comment:

  1. महत्त्व खेळाला हवे, केवळ खेळाडूलाच नको.ऑलिंपिक पात्रतेचा एक खेळाडू निर्माण करण्यापेक्षा सामान्य दर्जाचे दहा हजार खेळाडू निर्माण करण्यावर भर हवा.

    ReplyDelete