Friday, August 3, 2012

... मग आपला राष्ट्रीय खेळ कोणता?


     हॉकी या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिला नसल्याची माहिती खुद्द क्रीडा मंत्रालयाने दिल्याने सर्वसामान्यांची, शिक्षकांची आणि क्रीडाप्रेमींची मोठी गोची झाली आहे. महितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना क्रीडा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या भारताच्या सरकारी वेबसाईटवर 'राष्ट्रीय खेळ' या मथळ्याखाली हॉकीच्या भारतीय कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांमध्ये खेळ गटात हॉकीला स्थान देऊन त्याविषयीची माहिती प्रसृत केली जाते. अगदी शाळांमध्येसुद्धा हीच माहिती विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली जाते. त्यामुळे विद्यार्थी आपल्या पुढील आयुष्यात याच माहितीच्या आधारे आपले ज्ञान पाजळत असतो. हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिला गेला नसेल तर त्याची माहिती शासकीय पातळीवरून सर्वसामान्य, शाळांना पोहचवली पाहिजे. केवळ आकरा वर्षाच्या एका मुलीला हा प्रश्न पडल्याने तिने उत्सुकतेपोटी ही माहिती क्रीडा मंत्रालयाकडे मागितली आणि हा खुलासा मिळाला. आम्ही मात्र हॉकीला राष्ट्रीय खेळाचे महत्त्व देऊन त्याच्या अधःपतनाच्या नावाने शिमगा मारत बसलो आहोत. देशाला ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्ण व एक विश्वविजेतेपद मिळवून देणारा हॉकीच काय पण इतर कोणत्याही खेळास राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळालेला नाही. असेही खुद्द क्रीडा मंत्रालयानेच  माहिती दिली आहे.  'राष्ट्रीय' म्हणवल्या जाणार्‍या गोष्टींना हा दर्जा प्राप्त कसा झाला असा प्रश्न लखनऊच्या 10 वर्षांच्या ऐश्वर्या पराशरला पडला. तिने माहितीच्या अधिकारांतर्गत पंतप्रधान कार्यालयातून राष्ट्रगीत, खेळ, पशू, पक्षी, फूल प्रतीकांच्या घोषणेची आदेशाची प्रत मिळवण्याची मागणी केली. क्रीडा मंत्रालयाचे अवर सचिव शिवप्रतापसिंह तोमर यांनी ऐश्वर्याला पाठवलेल्या उत्तरात कोणत्याही खेळास राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिलेला नसल्याची माहिती दिली. या माहितीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी जी स्पर्धा लागली आहे, त्यात हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या नावाची चर्चाही आघाडीवर आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या माहितीने हे नाव आपोआप मागे पडणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने एकदा भारतीची राष्ट्रीय प्रतिके जाहीर करावी, जेणेकरून तमाम भारतीयांना त्याची माहिती होईल. शाळांमध्येसुद्धा चुकीचे काही शिकवले जाणार नाही.   

No comments:

Post a Comment