Monday, August 20, 2012

कथा पैज


      शरद ऋतुची ती गडद काळी रात्र. बँकर आपल्या स्टडीरूमसमोर अस्वस्थपणे येरझार्‍या घालीत होता. तो आठवत होता, १५ वर्षांपूर्वीची अशीच एक रात्र. त्या रात्री त्याने पार्टी दिली होती. पार्टीत अनेक  बुद्धीवान, हुशार माणसे सहभागी झाली होती. यावेळी ज्या काही विषयांवर चर्चा झाली होती, त्यात मृत्यूदंडाचाही विषय होता. बहुतांश पाहुण्यांनी मृत्यूदंडाला नकार दिला होता. यात पत्रकार आणि बुद्धिवंतही होते. काहींचं मत होतं की, मृत्यूदंडाच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत केले जावे. पार्टीचा होस्ट बँकर म्हणाला," मी तुमच्याशी सहमत नाही. खरे तर मला या दोन्हीचा अनुभव नाही, परंतु तसा विचार केला तर मला जन्मठेपेपेक्षा मृत्यूदंडच योग्य वाटतो. नैतिकतेच्या आणि मानवतेच्या दृष्टीकोनातूनही मृत्यूदंड सरस आहे. मृत्यूदंड माणसाला, त्याच्या वेदनांना  एका झटक्यात संपवून टाकतो, जन्मठेप त्याला तीळतीळ करीत कित्येक वर्षे मारत राहतो. मग मला सांगा, दोघांमधील अधिक मानवीय काय आहे? जो माणसाला एका झटक्यात संपवतो तो की, जो त्याचे जीवन हिरावून घेऊन कित्येक वर्षे फक्त जगायला भाग पाडतो."
     तिथे उपस्थित असलेला एक पाहुणा म्हणाला," तसं पाहिलं तर दोन्हीही गोष्टी समानरुपानं अनैतिकच आहेत. कारण दोघांचा उद्देश एकच, जीवन संपवणं. देश काही देव नव्हे. जर तो जीवन देऊ शकत नाही तर त्याला ते हिरावून घेण्याचाही अधिकार नाही." पार्टीत एक पंचवीस वर्षे वयाचा  तरुण वकीलसुद्धा होता. जेव्हा त्याला याबाबत त्याचं मत विचारण्यात आलं, तेव्हा तो म्हणाला," मृत्यूदंड आणि जन्मठेप दोन्ही समानरुपानं अनैतिकच आहेत. पण मला या दोन्हीपैकी एकाची निवड करायला सांगितले गेले तर मी दुसर्‍या पर्यायाचा स्वीकार करीन. न जगण्यापेक्षा कशाही पद्धतीने जगणे चांगले." चर्चा रंगतदार अवस्थेत आली होती. बँकर एकाएकी उत्तेजित झाला. टेबलावर जोराची मूठ मारत तो तरुणावर ओरडला," नाही... नाही.. शक्य नाही. मी तुझ्याबरोबर २० लाख रुबल्सची पैज लावायला तयार आहे. पण पाच वर्षेसुद्धा तू एकटा राहू शकणार नाहीस."
     "तू तुझ्या मतावर ठाम असशील तर मी पैज स्वीकारायला तयार आहे. पण मी ५ वर्षे नव्हे तर १५ वर्षे एकांतवासात राहू शकतो." तरुण वकील आत्मविश्वासाने म्हणाला.
     "१५ वर्षे! ठीक आहे. मी तयार आहे." बॅंकर ओरडला," ... मित्रांनो, मी वीस लाखाची पैज लावायला तयार आहे."
     "ठीक आहे, तू तुझे २० लाख रुबल्स पणाला लाव, इकडे मी माझे स्वातंत्र्य पणाला लावतो." तरुण म्हणाला. आणि ती विचित्र आणि निरर्थक पैज लावली गेली. लाडाखोडाने बिघडलेला, चंचल मनोवृत्तीचा आणि लाखात लोळणारा बँकर पैजेने खूश होता. भोजनावेळी त्या तरुणाची टर उडवित बँकर म्हणाला," भला माणसा, अजूनही वेळ गेलेली नाही. मी विचार करायला आणखी एक संधी देतो. बघ. माझ्यासाठी वीस लाख म्हणजे काहीच नाहीत. पण तू मात्र तुझ्या आयुष्यातले किंमतीचे तीन्-चार वर्षे हकनाक गमावून बसशील. मी ३-४ वर्षे एवढ्यासाठी म्हणतोय की, यापेक्षा अधिक काळ एकांतवासात काढूच शकणार नाहीस. आणि हेही विसरू नकोस, की कम्पलसरी कारावासापेक्षा स्वैच्छिक कारावास मोठा भयंकर असतो. तू केव्हाही बाहेर येऊन, तुझे स्वातंत्र्य पुन्हा मिळवू शकतोस, पण तुझा हा कारावासाचा विचार तुझे आयुष्य उद्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. मला तर बाबा, तुझी कीव येतेय."
     आज बँकरला येरझार्‍या घालताना सगळं आठवत होतं. त्याने स्वतःलाच विचारले,' शेवटी त्या पैजेचा उद्देश काय होता? त्याला आयुष्यातली १५ वर्षे आणि मला २० लाख रुबल्स पणाला लावून काय मिळाले? नाही! नाही! ते सगळे बेकार, बकवास आणि निरर्थक होते. ती पैज एका बिघडलेल्या व्यक्तीची क्षणिक इच्छा आणि दुसर्‍याची पैशासाठीची लालसा होती. बँकर आठवत राहिला,' मग निश्चित करण्यात आले. त्या तरुणाने आपली शिक्षा बँकरच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या चौकीदार आणि नोकरांसाठी असलेल्या निवासादरम्यानच्या एका रिकाम्या खोलीत भोगावी. त्याच्यावर सतत पाळत राहिल. तो कुणाला दिसणार नाही. कुणाचा आवाज ऐकणार नाही. त्याला वृत्तपत्रे किंवा पत्रे मिळणार नाहीत. तो एखादे वाद्य आणि पुस्तके ठेऊ शकतो. त्याला पत्रे लिहिण्याचे, सिगरेट- वाईन पिण्याचे स्वातंत्र्य असेल. बाहेरील जगताशी त्याचा संबंध केवळ एका खिडकीच्या माध्यमातून येईल. त्याला वाटले तर तो पाहिजे तेवढी दारू, पुस्तके आणि संगीताची मागणी करू शकेल. एग्रीमेंटमध्ये सगळ्या बाबी विस्ताराने लिहिल्या होत्या. त्याची १५ वर्षाची शिक्षा १४ नोव्हेंबर १८७० ला १२ वाजता सुरू होऊन १४ नोव्हेंबर १८८५ रोजी समाप्त होणार होती. तरुणाकडून यातल्या एखाद्या जरी अटीचे उल्लंघन झाले तरी बँकर त्याला वीस लाख रुबल्स देण्यास बांधील असणार नव्हता.  
     तरुण कारावासाच्या पहिल्या वर्षात एकांतग्रस्त राहिला. त्याच्या खोलीतून रात्रंदिवस पियानोचा आवाज येत होता. तो सिगरेट किंवा दारू प्यायला नाही. त्याने लिहिले,' दारू इच्छांना जागृत करते. आणि इच्छा एखाद्या कैद्यासाठी मोठी शत्रू ठरते. माणूस दारू प्यायला आणि तो कुणाला पाहू शकला नाही तर त्याइतकी बोरिंग गोष्ट कुठली नसेल. आणि हां, तंबाकूमुळे खोलीतली हवा प्रदुषित होते.' त्याच्या छोट्या छोट्या टिपण्यांवरून लक्षात येतं की, पहिल्या वर्षात त्याने हलक्या-फुलक्या रोमांटिक कादंबर्‍या आणि थरकाप उडविणार्‍या कथा वाचल्या असाव्यात. दुसर्‍या वर्षी पियानो गप्प राहिला. या कालावधीत कैद्याने फक्त क्लासिक वाचले. पाचव्या वर्षापासून पुन्हा संगीत ऐकायला येऊ लागले. आणि त्याने वाईनसुद्धा मागितली. खिडकीतून त्याला पाहणार्‍यांनी सांगितले की, त्याने ते पूर्ण वर्ष केवळ खाण्या-पिण्यात आणि ऐशारामात लोळण्यात घालवले. कधी कधी तो रात्री-अपरात्री लिहायला बसे. तासनतास लिहित असे. पण पुन्हा सकाळी रात्रभर लिहिलेले सगळे फाडून टाकत असे. कित्येकदा तो रडतानाही ऐकला गेला. सहाव्या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात कैद्याने मोठ्या उत्साहाने भाषा, तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे सखोल अध्ययन करण्यास प्रारंभ केला. किती तरी वेळा त्याने मागवलेली पुस्तके उपलब्ध करून देताना बँकरला अवघड गेले. चार वर्षात बँकरने त्याला ६०० पुस्तके मागवून दिली.
     अकराव्या वर्षी कैदी केवळ बायबलच वाचत राहिला. ज्या माणसाने चार वर्षात ६०० पुस्तकांचा फडशा पाडला, त्या माणसाने समजायला अत्यंत सोपे असलेले पुस्तक वाचायला मात्र पुरे एक वर्ष लावले, हे ऐकून बँकर मोठा चकीत झाला. त्यानंतर त्याने अन्य धर्माची पुस्तके आणि त्यांचा इतिहास सांगणारी पुस्तकेही वाचली. कधी तो नॅचरल सायन्स वाचत होता, तर कधी वायरन आणि शेक्सपिअर. कधी तो केमिस्ट्रीची पुस्तकेही मागायचा, तर कधी मेडीसीनचे मॅन्युअल, कधी तत्त्वज्ञानावरचे एखादे थिसिस मागत होता.
     म्हातारा बॅंकर हे सगळे आठवून विचार करत होता,' उद्या १२ वाजता तो आपले स्वातंत्र्य पुन्हा मिळवेल आणि आमच्यात झालेल्या करारानुसार मला त्याला वीस लाख रुबल्स द्यावे लागतील. जर मी ही रक्कम दिली तर मी कफल्लक होऊन जाईन. माझे सर्वस्व लुटले जाईल.'
     १५ वर्षांपूर्वी बँकरला त्याच्या  स्वतःच्या संपत्तीची मोजदाद करता येत नव्हती. परंतु, आज मात्र कर्ज अधिक आहे की त्याची संपत्ती, हा प्रश्न स्वतःला विचारायला तो घाबरतो होता. सट्टेबाजीमुळे त्याची संपत्ती हळूहळू घटत चालली होती. एकेकाळचा निडर, आत्मविश्वासी आणि गर्विष्ठ लखपती आज मात्र मध्यमवर्गिय बनला होता. दोन्ही हातांनी घट्ट डोकं धरून तो निराशेने बडबडला,' वाट लावणारी पैज! तो तरुन मरून का गेला नाही? आज तो फक्त चाळीस वर्षाचा आहे. अजून पुरी जिंदगी त्याच्यापुढे पडली आहे. आता तो माझे सर्वस्व हिरावून घेईल. जीवनाचा लुप्त उठवेल. सट्टा लावेल आणि मी मात्र त्याच्याकडे आशाळभूतपणे एखाद्या भिकार्‍यासारखा इर्षेने पाहात राहीन. तो रोज एकच वाक्य उच्चारेल, मी माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षणासाठी तुझा आभारी आहे. मला तुझी कीव येतेय. आता मला तुला मदत करण्याची संधी दे.'
     'हा अपमान आणि दिवाळखोरी यांच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे- त्याचा मृत्यू!'
     रात्रीचे तीन वाजले होते. घरातले सगळे झोपले होते. कसलाही आवाज न करता त्याने सेफमधून चावी काढली, जी १५ वर्षांपासून कपाटात बंदिस्त होती. ओव्हरकोट घातला आणि तो घराबाहेर पडला. बागेत गडद अंधार आणि थंडी होती. पाणी वाहत होतं. त्याने दोनवेळा चौकीदाराला हाक दिली. पण प्रतिसाद मिळाला नाही. नक्कीच तो या भयंकर मौसमात स्वतःचा बचाव करण्यासाठी किचन किंवा ग्रीन हाऊसमध्ये जाऊन झोपला असेल. 
     "जर मी माझ्या निश्चयात यशस्वी झालो तर पहिल्यांदा संशयाची सुई चौकीदारावर रोखली जाईल." त्याने आगकाडी पेटवली. कैदाच्या खोलीकडे जाणारा रस्ता अंधाराने भरला होता. काडीच्या उजेडात तो कसा तरी दरवाज्यापर्यंत गेला. दरवाज्याला सील ठोकले होते. जेव्हा काडी विझली तेव्हा, अचानक त्याचे अंग थरथरून आले. त्याने तशा अवस्थेतच खिडकीतून डोकावले. खोलीत एक मेणबत्ती सावकाशीने जळत होती. कैदी टेबलासमोर बसला होता. त्याच्या पाठीवर, डोक्यावर वाढलेल्या केसांशिवाय आणि हातांशिवाय काहीच दिसत नव्हते. टेबल, दोन्ही आराम खुर्च्या आणि कारपेटवर उघडलेल्या अवस्थेत पुस्तके पडलेली होती.       
     पाच मिनिटे गेली, पण कैद्याने एकदाही हलचाल केली नाही. १५ वर्षाच्या कारावासाने त्याला स्थीर बसायला शिकवलं होतं. बॅंकरने खिडकीवर थाप मारली, तरीही कैदी हलला नाही. बँकरने सावधपणे दरवाज्याचे सील तोडले. आणि चावी गंज चढलेल्या कुलुपाला लावली. त्याला वाटलं होतं की, कुलुपाची आणि दरवाज्याची खडखड ऐकून कैदी उठेल आणि आरडा-ओरडा करेल. पण यातले काहीच घडले नाही. तीन मिनिटे उलटून गेली तरी खोलीत भयाण शांतता होती. त्याने आत जाण्याचा निर्धार केला.
     टेबलासमोर बसलेला माणूस असामान्य असा स्थीर होता. त्याच्यात फक्त हाडाचा सांगाडा उरला होता. त्याचा क्षीण चेहरा पाहिल्यावर कोणीही अंदाज करू शकला नसता की, हा फक्त चाळीस वर्षांचा आहे. तो झोपला होता. त्याची मान झुकलेली होती. समोर टेबलावर कागदाचा एक तुकडा पडला होता. त्यावर सुंदर अक्षरांत काही तरी लिहिलं होतं.
     " बिच्चारा!" बँकरने विचार केला," ... झोपला आहे. कदाचित तो उद्याची लाखोंची स्वप्ने पाहात असेल. मला या अर्धमेल्या माणसाला उचलून अंथरुणावर पटकवावं लागेल. त्याची हत्या झाली आहे, याचा थोडाही संशय येणार नाही, अशा पद्धतीने त्याच्या तोंडावर ऊशी ठेवून मारावं लागेल. पण पहिल्यांदा या कागदावर काय लिहिलं आहे, हे तरी पाहावं?"बँकरने टेबलावरचा कागद उचलला आणि वाचू लागला.
     " उद्या १२ वाजता मला पुन्हा अन्य लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल. पण ही खोली सोडण्या आणि सूर्यप्रकाश पाहण्याअगोदर मला तुला काही सांगणं आवश्यक आहे. मी अगदी स्वच्छ मनाने सांगतो आहे, जसा एखादा भक्त देवासमोर बसून बोलतोय तसा. पुस्तकातल्या स्वास्थ्य, जीवन स्वातंत्र्य आणि विश्व या सगळ्या गोष्टी तुझ्यासारख्यांनी मानल्या आहेत, त्याच सगळ्या गोष्टींचा मला तिटकारा आहे. "
     " १५ वर्षांपासून मी एकाग्रतेने वैश्विक जीवन वाचत आणि तपासत आलो आहे. खरे तर मी जग आणि लोकांना अधिक पाहिलं किंवा जाणलं नाही, पण तुझ्या या पुस्तकांमधील सुगंधीत आणि स्वादिष्ट मदिरा मी प्यालो आहे. जंगलात मी जंगली हरीण आणि रानटी डुकरांची शिकार केलीय. कवी व प्रतिभावंतांनी रचलेल्या साहित्यावर, मेघसमान अलौकिक ललनांवर प्रेम केलं आहे. त्यांनी मला भान विसरून टाकणार्‍या , डोकं चक्रावून सोडणार्‍या कहाण्या ऐकवल्या आहेत."
     "पुस्तकांनी मला विवेक दिला. शतकानुशतके चलायमान माणसाच्या विचाराने जे काही रचलं गेलं आहे, आता ते सगळं माझ्या मस्तकातल्या एका छोट्याशा कंपासात बंद आहे. मला माहित आहे की, मी तुम्हां सगळ्यांपेक्षा अधिक समजूतदार बनलो आहे. आणि आता मी तू दिलेल्या पुस्तकांचा, विवेक, ज्ञान आणि जगातल्या सगळ्या सुखांचा तिटकारा करतो आहे. कारण हे सगळं बेकार, क्षणिक, भ्रामक आणि अर्थहीन आहे. तू कितीही चांगला, समजूतदार आणि आत्मसन्मानी असशील पण मृत्यू तुला पृथ्वीवरून अशाप्रकारे मिटवून टाकील की, तू इथे कधी नव्हतासच."
     "तू खोट्याला खरं आणि कुरुपाला सुंदर मानलं आहेस. जर एखाद्या असाधारण घटनेमुळे सफरचंद किंवा  संत्र्याच्या झाडावर बेडूक आणि पाली लखडल्या तर तुला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. जर गुलाबाच्या सुगंधातून घोड्याच्या घामाचा दुर्गंध यायला लागला तरी तू आश्चर्य करशील. तशाच प्रकारचे मला तुझ्याविषयी नवल वाटते आहे. स्वर्गाऐवजी तू मातीचा स्वीकार केला आहेस. ज्या गोष्टींसाठी तू जगतो आहेसत्यांचा मला किती तिटकारा आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी या वीस लाखाचा त्याग करतो आहे. कधी काळी त्याच्यावरून मी स्वर्गलोकीचे स्वप्न पाहिले होते. या रकमेपासून वंचित राहण्यासाठी मी पैज हरणार आहे. निर्धारित वेळेच्या अगोदर म्हणजे पाच तास आधी मी इथून निघून जाणार आहे."
     बँकरने तो कागद वाचल्यावर पुन्हा जसा होता, तसा टेबलावर ठेवून दिला. त्या माणसाच्या मस्तकाचे चुंबन घेतले आणि हुंदके देत तो खोलीबाहेर आला. आज त्याला स्वतःचीच स्वतःला घृणा वाटू लागली. घरी आल्यावर अंथरुणावर पडून राहिला. परंतु भावना आणि अश्रुंनी त्याला बराच वेळ झोपू दिले नाही.
     दुसर्‍यादिवशी घाबर्‍या चेहर्‍यानं चौकीदार धावतच त्याच्याकडे आला. त्याने बँकरला सांगितलं, कैदी बागेतल्या भिंतीवरून पळाला. पाठलाग केला पण सापडला नाही.'बँकर लगेच उठला. खोलीकडे जाऊ लागला. कैद्याचं पळून जाणं निश्चित होतं. बेकारच्या गोष्टींची झंझट नको म्हणून बँकरने टेबलावरचा कागद उचलला, ज्यात कैद्याने २० लाखाचा त्याग केल्याचे लिहिले होते.  घरी आल्यावर त्याने तो कागद सुरक्षितपणे सेफमध्ये ठेवून दिला आणि अंथरुणावर पडून राहिला.
                                                                                             मूळ रशियन लेखक- एण्टन चेकोव
                                                                                                      भाषांतर- मच्छिंद्र ऐनापुरे    

No comments:

Post a Comment