Monday, November 18, 2013

लेख डॉक्टरांची जीवघेणी लिखणावळ



     डॉक्टरांच्या गिचमिड, घसरड्या आणि घाणेरड्या अक्षरांमुळे दरवर्षी सात हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो, यावर आपला विश्वास बसेल का? नाही ना? पण ही वस्तुस्थिती आहे. एका सरकारी रिपोर्टनुसार डॉक्टरांच्या अशा घसरड्या, न वाचता येणार्या हस्ताक्षरांमुळे दरवर्षी जवळपास सात हजार रुग्णांना आपले प्राण गमवावे  लागतात. इतकी या डॉक्टर मंडळींची लिखणावळ खराब आहे. त्यांच्या या लिखणावळीमुळे लोकांचा जीव जात असेल तर त्यांच्यात आणि जल्लाद यांच्यात काय फरक आहे, असे समजायचे? आपल्या घरातली किंवा खिशातली डॉक्टरांची औषधांची चिठ्ठी  काढून पहातुमच्याही लक्षात ही गोष्ट येईल. शेवटी ही माणसं अशी का करतात बरं?
      अशाच हस्ताक्षरात त्यांनी डॉक्टरकीच्या डिग्रीची परीक्षा दिली असती तर ही मंडळी पास झाली असती का? आणि अशी दुकाने थाटल्यासारखी दवाखाने उघडली असती किंवा सरकारी रुग्णालयात नोकरीला लागली असती का? डॉक्टर झाल्यावरच  त्यांचे हस्ताक्षर का बिघडते? याचा सरळ अर्थ निघतो. तो म्हणजे ते केवळ पैसे कमवायला बसले आहेत. रुग्णांना झिडकारल्यासारखे करत ही माणसे औषधाची चिठ्ठी लिहितात. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा, हे वचन ही मंडळी विसरूनच जातात. कित्येक डॉक्टर तर फक्त पहिले अक्षर तेवढे स्पष्ट लिहितात. बाकी पुढे नुसती आढवी रेघ असते. कित्येकांना त्यांनी काय लिहिलं आहे, असं विचारलं तर सांगून टाकतात, मेडिकलमध्ये जा, तो वाचून गोळ्या-औषध दे ईल. म्हणजे त्यांना पुन्हा विचारायला गेले तर त्यांचे त्यांना लिहिलेले वाचता येत नाही, अशी ही तर्हा. मग मेडिकल दुकानदाराला तर काय कप्पाळ कळणार त्याचे हस्ताक्षर! तो पहिल्या अक्षरावरून अंदाजित गोळ्या लिहून देतो. मग होतात चुका. चुकीचा डोस दिला गेल्याने रुग्णाच्या जीवावर बेततं.
      जग जिंकायला निघालेल्या सिंकदरचे अक्षर फारच वाईट होते. तो स्वारीवर असल्यावर आपल्या बायकोला पत्रं लिहायचा. बिचारी ती पत्रं वाचूच   शकत नव्हती. तो स्वारीवरून परत आल्यावर तिने ती सगळी पत्रं त्याच्यापुढे टाकली आणि म्हणाली, यात काय लिहिलात मला वाचून दाखवा. तो म्हणाला, ही पत्रं  लिहून मला खूप दिवस झाले. आता ही पत्रं मी आता कशी वाचू शकतो? पुढे इतिहासात  सिंकदर महान (?) ठरला. मग त्याच्या समर्थकांनी एक सिद्धांत मांडला, महान लोकांची अक्षरे खराबच असतात. आता या महानतेच्या पलिकडे आपली ही डॉक्टर मंडळी गेली आहेत. कारण यांची हस्ताक्षरे नुसते खराबच नाहीत तर जीवघेणीही आहेत.
      डॉक्टरांचा दवाखान्याचा उंबरा उलांडायचा म्हणजे खिशात भरपूर पैसे असायला हवा. त्यांच्या अशा हस्ताक्षरांचा विचार केला आणि एखाद्याचे ऑपरेशन झाले तर मग त्याने पिशवी भरूनच पैसे न्यायला हवेत. एक तर डॉक्टर वेळेत सापडत नाहीत किंवा जाग्यावर नसतात म्हणून अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यात डॉक्टर लोक जाणूनबोझुन रुग्णांना मारत असतील, हा प्रकार  मोठा चिंताजनक म्हटला पाहिजे. आपल्या मेडिकल कायद्यात अशी काही तरतुद नाही की, त्यांनी स्वच्छ अक्षरात औषधांची चिठ्ठी लिहून द्यावी. मात्र सरकारने किंवा सामाजिक संस्थांकडून याची दखल घेतली जायला हवी. चुकीच्या डोसने जीव गमावणार्यांची ही आकडेवारी मोठी चिंताजनक आहेच, पण त्यातही अशा चुकीच्या औषधांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होणार्यांची संख्याही कमी असणार नाही. त्यामुळे  याची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे. डॉक्टरांनी रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा म्हणून काम करायला हवे. औषधांची चिठ्ठी लिहून देताना औषधांची नवे व डोसेचे प्रमाण स्वच्छ अक्षरात लिहून द्यायला हवेत्यांचे खराब अक्षर हे त्यांच्या असंवेदनशीलता आणि  असामाजिकतेच लक्षण मानले पाहिजे. सुंदर  हस्ताक्षर हाच खरा दागिना आहे, असा एक सुविचार प्रसिद्ध आहेसुंदर अक्षरात त्याचे व्यक्तिमत्त्व डोकावते, म्हणतात. तर मग डॉक्टरांच्या या औषधांच्या चिठ्ठ्यांवर लिहिलेली अक्षरे त्यांच्या कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक म्हणायचे, याचा विचार केला गेला पाहिजेआता कॉम्प्युटरचे युग  आहे, त्याचा लाभ उठवत डॉक्टरांनी औषधांच्या चिठ्ठ्या कॉम्प्युटर प्रिंट द्याव्यात, त्यामुळे असे धोके राहणार नाही. शिवाय त्यांचा  लिहिण्याच्या कंटाळ्यापासून बचावही होईल.

No comments:

Post a Comment