Saturday, October 12, 2013

बालकथा कष्टाचे मोल



      गोष्ट फार जुनी आहे. अमृतपूर  नावाच्या छोट्याशा गावात गोरखनाथ नावाचा एक शेतकरी राहात होता. त्याला केदार नावा मुलगा होतात्याच्याकडे एक अवगुण होता, तो म्हणजे वायफट पैसे खर्च करण्याचा. त्याच्या हातात लक्ष्मी ठरतच नव्हती. वडिलांकडून पैसे मागून घ्यायचा आणि उधळायचा. साहजिकच वडिलांना त्याच्या खर्चिकपणाची मोठी चिंता वाटत होती. हा असाच पैसे उधळत राहिला तर याला पैशाची किंमत कळणार नाही   आणि हा  भविष्यात दरिद्री बनून जाईल.
      एक दिवस गोरखनाहाने आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि समजावलं, “बाबा रे, मी एका गरीब घरात जन्माला आलो. माझे बाबा शेळ्या चारवत. दूध, बकर्यांची विक्री यातून चार पैसे मिळत. त्यात कशी-बशी घराची गुजराण होई. मला फार शाळा शिकता आली नाही. मी वडिलांना कामात मदत करू लागलो. वडिलांनी मग अधिक शेळ्या घेतल्या. थोडा फार पैसा येऊ लागला. ते पैसे खर्च न करता साठवून ठेवू लागलो. वडिलांच्या मृत्यूनंतर मी त्या पैशांतून थोडी जमीन घेतली. त्यात भाजीपाला पिकवून विकू लागलो. पैसे वाचवून पुढे त्यातून एक छोट्ंस घर खरेदी केलं. मी तुझ्यासारखे पैसे उधळत राहिलो असतो तर आज मी गरीबच राहिलो असतो.”
      केदारवर  याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. तो पैसे उधळतच राहिला. एकदा गोरखनाथ विचार करीत बसला असताना त्याच्या मित्रानं-मंजूनाथनं कारण  विचारलंगोरखनाथने कारण सांगितलं.मंजूनाथने एक योजना सांगितली. ती गाेरखनाथला विलक्षण  आवडली. त्याने एक दिवस केदारला बोलावून सांगितले, “ मी बाजारला भाजीपाला विकायला जातो आहे. आता रोज मी भाजीपाला विकून आलो की, तुला दहा रुपये देत जाईन. त्यातले पाच रुपये तू खर्च करायचे  आणि पाच रुपये आपल्या शेतातल्या झाडीतल्या  विहिरीत फेकून द्यायचे. ”
      केदारला तेवढेच पाहिजे होते. रोज दोन रुपयाच्या जागी पाच रुपये मिळणार असतील तर कोणाला नको आहे? तो वडील सांगतील तसेच करू लागला. एक दिवस ठरल्यानुसार गोरखनाथने आजारी पडल्याचा बहाणा केला. केदारला जवळ बोलावून म्हणाला, “ बाबा रे, माझ्या अंगात ताप भरला आहे. अशक्तपणाही  आला आहे. उद्यापासून काही दिवस तुलाच बाजारला जावं लागेल. शेताचीही काम करावी लागतील. नाही तर मग  मी तुला पैसे कोठून आणून  देणार? ”
      दुसर्या दिवशी केदार शेतावर गेलाभाजी तोडली. त्याच्या पेंड्या बांधल्या. हे करताना त्याला खूप कष्ट पडलेभाज्याचे गाठोडे  बांधून बाजारात गेला.   संध्याकाळी घरी आला तो फार थकून. एवढे करूनही तो फक्त दहा रुपयेच कमवू शकला होता. त्याने अगोदरच पाच रुपये खर्च केले होते. उरलेले पाच रुपये विहिरीत टाकायला गेला. चालता चालता विचार करू लागला, एवढे कष्ट करून मिळवलेले पैसे विहिरीत कसे टाकायचे? तरीही मन मारून त्याने पाच रुपये विहिरीत टाकले.
      पुढच्या दिवशीही असेच घडले. पण विहिरीत पैसे फेकायला त्याचे मन तयार होईना. बराच वेळ विचार करत उभा राहिला आणि शेवटी मनाचा हिय्या करून पाच रुपये विहिरीत फेकून माघारी परतला. तिसर्या दिवशी मात्र त्याचे धाडस झाले नाही. विहिरीत पैसे न फेकताच तो माघारी फिरला. वडिलांना म्हणाला, “ बाबा, एवढे मोठे कष्ट उपसून पैसे कमावयचे आणि ते विहिरीत फेकायचे? जर हेच पैसे साठवले तर भविष्यात आपल्या कामाला येतील. ”
      गोरखनाथ म्हणाला, “केदारबाळा, मी रोज तुला दहा रुपये देत होतो, त्यावेळेला तू असा  का विचार केला नाहीस? ”
      “  बाबा, माझी चूक झाली. त्यावेळेला मला कष्टाचे मोल माहित नव्हते. पण आता समजून चुकलो आहे. यापुढे असा प्रकार होणार नाही. ”
      गोरखनाथ हसला. म्हणाला, “बाळ  जा, ती विहीर कोरडी आहे. तिला पायर्याही आहेत. त्यात फेकलेले पैसे काढून घेऊन ये. आता तुला पैशाचे मोल कळले ना, हेच मला हवे होते. ”  केदार आनंदला. तो धावतच विहिरीकडे गेला. विहिरीत उतरल्यावर पैशांचा ढीग पाहून चकीत झाला. ते सगळे पैसे गोळा करून घरी परतू लागला. वाटेत विचार करू लागला, आपण उगाचच पैसे खर्च करत होतोे. ते पैसे साठवले असते, तर सायकल घेण्याइतपत पैसे जमले असते. अजूनदेखील वेळ गेली नाही. हे पैसे आणि आणखी थोडे पैसे जमवून उपयोगाच्या काही गोष्टी करता येतील. ही  योजना त्याने आपल्या बाबांना सांगितली. गोरखनाथने त्याला गळ्याशी धरलं आणि म्हणाला, “ आता तुला पैशाची किंमत कळाली, माझ्या मनावरचं फार मोठं ओझं कमी झालं. मी निर्धास्त झालो. मुलं शहाणी  झाली की, मोठ्यांची काही काम उरत नाहीत. आता मी तीर्थयात्रा करून येतो. तू तुझा व्यवसाय सांभाळ. ”
      खरोखरच केदारने   व्यवसाय चांगला सांभाळलावाढविला आणि फुलविला. गोरखनाथ कृतकृत्य झाला.
kilbil.prahaar 2013
kilbil.mahasatta 2017


No comments:

Post a Comment