Saturday, October 12, 2013

बालकथा अंधश्रद्धाळू आकाश




       संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आल्या आल्या आकाशानं विचारलं, “बाबा, माझा पेन आणलात?”
 “हो, आणलाय,” असे म्हणत त्यांनी आपल्या बॅगेतून एक पेन काढला आणि आकाशच्या हातात टेकवला.
 पेन पाहताच आकाशचा चेहरा उतरला.तो म्हणाला, “ हे काय हो बाबा, मी तुम्हाला निळ्या रंगाचा पेन आणायला सांगितला होता, तुम्ही हिरव्या रंगाचा आणलात. निळा रंग यश देतो, माहित नाही का तुम्हाला? ”
 “हे  कुणी सांगितलं तुला? ” बाबांनी चकित हो ऊन विचारलं.
 “नितीन म्हणाला असं!”आकाश म्हणाला.
 “कोण नितीन? ”बाबा
 “माझ्या वर्गात आहे तो! ”आकाश
 “असं काही नसतं! परीक्षेची तयारी कर. ” बाबा म्हणाले.
 “नाही बाबा, हिरव्या रंगाच्या पेनने परीक्षा दिली तर चांगले मार्क पडत नाहीत. ”आकाश म्हणाला.
 “आकाश, या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. हिरव्या-निळ्या रंगानं काही घडत नसतं. तू परीक्षेची चांगली तयारी केली असशील तर चांगले मार्क मिळतीलच. ” बाबांनी समजावलं.
 पण आकाश ऐकायला तयार नव्हताच. तो बाबांकडे निळ्या रंगासाठी हट्ट धरून बसला. तेव्हा बाबा म्हणाले, “आता सगळी दुकानं बंद झाली असतील.आता कोठून निळ्या रंगाचा पेन आणणार? ”
 पेन शोधता शोधता  बरीच रात्र झाली. शेवटी एकदाचा निळ्या रंगाचा पेन मिळाला. अजून त्याला परीक्षेची तयारी करायची होती. पण त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने आईला पहाटे पाच वाजता उठवायला सांगून झोपी गेला.
 पहाटे आईने त्याला उठवले. तो बेडवरून खाली उतरत होता, तोच आईला शिंक आली. तो पुन्हा बेडवर जाऊन पडला.
 आईने तो परत फिरून झोपल्याचे पाहून त्याला उठायला सांगून ती आपल्या कामाला निघून गेली. बाबांना तर त्याचा रागच आला. ते आकाशला म्हणाले, “आकाश, काल तू निळ्या पेनच्या भानगडीत अभ्यास केला नाहीस. आता उठतोस की नाही? साडेसहापर्यंतच तुला वेळ आहे. ”
 तेव्हा आकाश म्हणाला, “बाबा, नितीनने सांगितलंय की, कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी कुणी शिंकलं तर लगेच कामाला सुरूवात करायची नाही. ”
 बाबा म्हणाले, “अरे व्वा! आमचा आकाश तर चक्क अंधश्रद्धाळू बनला आहे. पण याच्याने तुझं नुकसानच होणार आहे. ” तरीही आकाश टाळत राहिला. दहा मिनिटांनंतरच तो अंथरुणातून उठला.
 परीक्षेच्या तयारीसाठी त्याच्याकडे फक्त साडेसहापर्यंतच वेळ होता.सातला तर त्याची स्कूलबस यायची. काल रात्री निळ्या पेनच्या शोधात आणि आज सकाळी शिंकेच्या भानगडीत  त्याची परीक्षेची तयारी काही म्हणावी अशी झाली नाही. त्यामुळे त्याला शालेला जाण्यासाठी तयार व्हायलाही वेळ झाला. बाबा आणि आकाश रस्त्यावर येताच त्यांना एक मांजर आडवं गेलं. आकाशने बाबांना थांबवले. एक मोटरसायकल पुढे गेल्यावर मग तो निघाला. स्कूलबस कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर येऊन थांबायची. पण तिथे गाडी होती ना मुलं! म्हणजे स्कूलबस निघून गेली होती. आकाशला शाळेत पोहचणं आवश्यक होतं, कारण आज परीक्षा होती.
 एक रिक्षा आली. बाबांनी त्याला हाक दिली. दोघेही रिक्षात बसायला पुढे निघाले, तोच आकाश जागच्या जागी थांबला. बाबांनी विचारल्यावर आकाश म्हणाला, “बाबा, गाडीचा नंबर 1301 आहे. तेरा हा अंक अशुभ असतो. या रिक्षाने गेलो तर परीक्षा चांगली जाणार नाही. आपण दुसर्या रिक्षाने जाऊ.”
 आकाशची गोष्ट ऐकून बाबांना भलताच राग आला. ते म्हणाले, “तुझे डोके-बिके फिरलेय का काय? कुठल्या अंधश्रद्धेच्या बाता मारतोयस तू? या घडीला तुला शाळेत पोहचणं, महत्त्वाचं आहे. चल, रिक्षात बस बघू.आधीच उशीर झाला आहे. ”
 पण आकाश आपल्या गोष्टीवर अडून राहिला. रिक्षावाल्याला दुसरे भाडे मिळाले. तो निघून गेला. बर्याच उशीराने एक रिक्षा आली.
 दोघे शाळेत पोहचले. परीक्षा सुरू होऊन अर्धा तास झाला होता. आकाश वर्गात गेला. त्याचे बाबा घरी आले. दुसरा शनिवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती.
 दुपारी आकाश शाळेतून घरी आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. आई-बाबांनी त्याला विचारल्यावर त्याने पेपर खूपच कठीण गेल्याचे सांगितले. तेव्हा बाबा म्हणाले, “बघितलसं,अंधश्रद्धेच्या आहारी गेलं की काय होतं ते! मी तुला अगोदरच सांगितलं होतं, असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस म्हणून! ”
 बहुतेक ही गोष्ट आकाशच्या लक्षात आली असावी.त्याने हो म्हणत मान हलवली होती.तेवढ्यात आई म्हणाली,असू दे, आता हात-पाय धुवून घे. काही तरी खा. आणि पुढच्या पेपरच्या तयारीला लाग. ”
 आईची गोष्ट ऐकून आकाश हात-पाय धुवायला उठणार तोच, बाबांना शिंक आली. बाबा म्हणाले, “आकाश, मला शिंक आली. आता तू दहा मिनिटे असाच बसणार का? हात-पाय धुवायला जाणार नाहीस काय?”
 “नाही बाबा, आता या भानगडीत पडणार नाही. मला सगळं काही समजून चुकलं आहे. या सगळ्या गोष्टी बेकार आहेत. ” असे म्हणून आकाश हात-पाय धुवायला बाथरुममध्ये गेला.

  

No comments:

Post a Comment