Saturday, October 12, 2013

विषकन्या


      प्राचीन काळापासून आपल्या देशात शत्रूचा नायनाट करण्यासाठी, त्याची हत्या करण्यासाठी विषकन्यांचा विशिष्ट पद्धतीने वापर केला जायचा. अपार रुप आणि सौंदर्याच्या स्वामिनी म्हणून ओळखल्या जाणार्या या बालांना अगदी लहानपणापासून विषाची थोडी थोडी मात्रा सेवन करण्यासाठी दिली जात असे. कालांतराने वयात आल्यावर आपल्या सौंदर्याची भुरळ घालून  ती कोणत्याही व्यक्तीला केवळ आपल्या श्वासाच्या गंधाने, स्पर्शाने किंवा अन्य संपर्काच्या माध्यमातून  यमसदनाला पाठवू शकत होती. शत्रूला आपल्या प्रेमपाशात ओढून आणि आपले सर्व काही डावावर लावून आपल्या देशासाठी, राजासाठी अथवा  आपल्या  स्वामीसाठी शत्रूला संपवायची. विषकन्यांचे शरीर लहानवयापासून विषयुक्त करण्याची पद्धत फारच वैज्ञानिक होती. विषकन्या म्हणून निवडलेल्या मुलींना लहानपणापासून विषाची थोडी थोडी मात्रा दिली जायची. जसजसे वय वाढत जाईल, तसतसे तिच्यावरची विषाची मात्राही  वाढवली जायची. दुसर्या बाजूला तिला लागलीच विषाचा विपरित परिणाम होऊ नये म्हणून  त्यावर उताराही दिला जायचा. धोतरा, अफू,सोमल आदींची योग्य अशी मात्रा उतारा म्हणून वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आधारावर दिला जायचा.
      आपल्या काळात राजे लोक या कामासाठी खास कन्यांची निवड करत असत. ही कामगिरी काही जणांवर सोपवली जायची. ही मंडळी सुंदर अशा नवजात मुलींची निवड करून त्यांच्यावर जन्माच्या सहा महिन्यापासूनच ही विषाची मात्रा देण्याची व्यवस्था करायचे. बारा वर्षांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ वाढत्या वेगाने अशा विषकन्यांवर विषाची मात्रा तीव्र  स्वरुपात वाढवत दिली जायची. काही काळानंतर मग ती त्याच्या इतकी अधिन व्हायची की, तिच्यावर विषारी सापाच्या दंशाचा किंवा विषारी घटकाचा  काही परिणाम व्हायचा नाही. या विष प्रयोगामुळे पुढे तिचे संपूर्ण शरीर, घाम, केस विषाक्त हो ऊन जात असे. इतकेच नव्हे तर तिच्या डोक्यात घातलेले फूलदेखील कोमेजून जायचे. तिच्या शरीराचा स्पर्श झालेली सोन्या-चांदीची, रत्नांची आभूषणे किंवा अन्य किंमती जवाहारात काळवंडून जात. ते आपली चमक गमावून बसत. पूर्वी  शत्रूचा नाश करण्यासाठी विषात बुडवलेली दागदागिने, काचेचे तुकडे, नखे, किल्ल्या किंवा छोटी छोटी शस्त्रे आदी साहित्यांचाही  वापर केला जात असल्याचे आपल्या ऐकण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर विषयुक्त वस्त्रांचाही वापर त्या काळात केला जात असे.
      सिंध प्रांतचा बादशहा अहमद शहा हा आहोरचा राजा पर्वतसिंह याची कन्या लालबाई हिच्या सौंदर्यावर मुग्ध हो ऊन तिच्याशी जबरदस्तीने विवाह करण्याचा घाट घातला होता. तिच्या वडिलाने, पर्वतसिंहने विवाहाला नकार दिल्यावर त्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता. परिणाम राजा पर्वतसिंह आणि त्याचे साथीदार मारले गेले. आपल्या राज्याला नेस्तनाबूतहोण्यापासून वाचवण्यासाठी लालबाई विवाहाला तयार झाली. विवाहाची तारीख निश्चित झाली. या विवाहाआधी परंपरेनुसार वधूपक्षाकडून वरासाठी नवीन  विधीवस्त्र पाठवण्यात आले. विवाहाप्रसंगी हे वस्त्र बादशहाने घालताच  त्याच्या अंगाला धरधरून घाम फुटला. अंगाची लाही लाही झाली. आगीत लपटल्यासारखा ओरडून ,तडफडून त्याने प्राण सोडला. लालबाईनेदेखील जवळच्याच चांदी सरोवरात उडी मारून आपल्या प्राणाची आहुती दिली.  


     प्रसिद्ध लेखक अबुल फजलने आपल्याआईने अकबरीपुस्तकात विषकन्यांच्या कार्याचे वर्णन अगदी विस्ताराने केले आहे.इतिहासकार आणि अलबरूनी नावाच्या लेखकानेदेखीलतहकीकाते हिंदया आपल्या पुस्तकात रजपूत राजांद्वारा जासुसी करण्यासाठी शत्रू राजाला ठार मारण्यासाठी किंवा आपल्या शत्रूला नामोहरम करण्यासाठी व गुप्त माहिती मिळवण्यासाठी अशा विषकन्यांचा उपयोग केला जात असल्याचा उल्लेख केला आहे. विषकन्यांना नृत्य, संगीत आणि ललित कलांमध्येही निपुण केले जात असे. जेणे करून  राजा वैगेरे या कलांमुळे त्यांच्याकडे आकर्षित होतील. विषकन्यांच्या वापराचा इतिहास फार प्राचीन आहे. “ अटांग संग्रहआणिकथा सरित सागरआदी प्राचीन ग्रंथांमध्ये यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या विषकन्या इतक्या खतरनाक असायच्या की, त्यांच्या श्वासाने, स्पर्शाने, चुंबनाने किंवा संभोगाने माणूस निर्जीव हो ऊन जायचा. पण यांचा वापर विशिष्ट वेळीच किंवा खूप चतुर किंवा बुद्धिमान शत्रूला मारण्यासाठीच केला जात असे. चंद्रगुप्त राजाचा प्रमुख सल्लागार  असलेले चाणक्य महान कुटनीतीज्ञ  आणि कुशल वैज्ञानिक होते. त्यांनी शत्रू राजा संपवण्यासाठी अनेक उपाय सुचवलेले आहेत. त्यात विषकन्यांच्या सेवा आणि त्यांचा उपयोग यांचा उल्लेख केला आहे. संस्कृतमधले प्रसिद्ध नाटकमुद्राराक्षसमध्ये नंदाचा कुटतीतीज्ञ अमात्य राक्षसद्वारा चंद्रगुप्तची हत्या करण्यासाठी विषकन्येला पाठवल्याचा उल्लेख आहे. बालकृष्णाला मारण्यासाठी आलेली पुतणामावशी ही कंसाच्या दरबारातील विषकन्याच होती. आधिनिक काळात प्रसिद्ध हेर माताहारी आणि तिची मुलगी बांडा यांच्या धाडसी कार्यांचा उल्लेख काहीजण विषकन्यांच्या श्रेणीमध्येच करतात.

No comments:

Post a Comment