Saturday, October 12, 2013

बालकथा शिवण यंत्राचा अविष्कार



      एक मुलगा होता. ताे एका पायाने अपंग होता. पण  आईचा लाडका होता. सात वर्षाचा  हा मुलगा  एक दिवस आईला म्हणाला, “ आई, आपल्या शेजारची दोन मुलं आज शाळेला गेली. मला कधी शाळेत  पाठवणार? ”
 आई म्हणाली, “ बेटा, शाळा फार दूर आहे. तुला चालवणार नाही. आणखी थोडा मोठा झालास की, तुला पाठविन हो.”
 तो म्हणाला, “ नाही आई, मी आताच जाणार! मी पायाने लंगडा असलो तरी काय झालं? मी जाऊ शकतो. ”
      आई त्याला किती तरी वेळ समजावत राहिली, पण त्याने आपला हट्ट सोडला  नाही. कुठलाही वाईट हट्ट दु:ख देतो, तर  चांगला हट्ट  सुख! आपल्या मुलाचा हट्ट  चांगल्यासाठी, भल्यासाठी आहे. शिवाय आपला मुलगा अपंग आहे. त्याला कष्टाची कामे जमणार नाहीत. शिकला-सवरला  तर कसली तरी बैठी नोकरी मिळून जाईल. त्याचे आयुष्य सुखी झाले म्हणजे झाले, याचा विचार करून तिने त्याला शाळेला जायला परवानगी दिली. त्याला  घेऊन शाळेत गेली आणि नाव दाखल केले.
      शाळेतील त्याचे वर्गमित्र  त्याला लंगड्या लंगड्या म्हणून चिडवत. पण तो त्यांना काहीदेखील  म्हणत नसे. त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटून घेत नसे. सुरुवातीला त्याच्या वर्गातली मुलं फळ्यावर, भिंतीवर लंगड्या मुलाचे चित्र काढायचे, तर कधी त्याला पाहून लंगड्त चालायची. पण तो या सगळ्या गोष्टी हसून टाळत असे. एक दिवस तर मुलांनी तो बसताना त्याची खुर्ची मागे खेचली आणि तो खाली पडला. त्यालाप्रचंड  वेदना झाल्या. जखमदेखील  झाली. परंतु, तरीही त्याने खोड काढणार्या मुलांची नावे शिक्षकांना सांगितली नाहीत. सगळीच मुले अचंबीत  झाली. शेवटी त्यांना उपरती आलीत्याला चिडवणारे, त्रास देणारे सगळे  त्याचे मित्र बनले. आपल्या सहनशिलतेच्या आणि लाघवी बोलण्याच्या जोरावर त्याने सगळ्यांची मने जिंकली.
      एक दिवस तो घरात बसून अभ्यास करीत होता. बाजूलाच बसून आई कपडे शिवत होती. त्याने आईला विचारलं,“ तू शिंप्याचं काम  करते आहेस का? ”
      आई म्हणाली, “ नाही रे बाबा, तुझा फाटलेला  शर्ट शिवते आहे. ”
 त्यानं विचारलं,“ मग शिंप्याकडे टाकायचं नाही का? तो चांगल्या प्रकारे शिवून दिला असता. ”
 “बाळा, शिंप्याला पैसे द्यावे लागतील. तेवढे पैसे आपल्याकडे  नाहीत. ” आई म्हणाली.
      ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागली. आई किती कष्ट उपसते. तरीही पुरेसे  पैसे नाहीत. त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. कामाच्या शोधात घराबाहेर पडला. कामाचा शोध घेत घेत तो एका कारखान्यात पोहचला. तिथल्या मालकाला अगदी विनम्रपूर्वक म्हणाला, “ साहेब, मी पायाने अपंग आहे. पण मला कोणतेही काम द्या, ते मी मन लावून करेन. काम आवडले तर कामावर ठेवा अन्यथा नका ठेवू. ”
      त्याच्या विनम्र बोलण्याने मालक प्रभावित झाला. त्याला कामावर ठेवून घेतले. कष्ट, एकाग्रता आणि जिद्दीच्या जोरावर त्याने मालकाचा विश्वास संपादन केला. त्याला आता स्थायीस्वरुपाची नोकरी मिळाली.
 काही वर्षे लोटली. त्याचे मन कामात रमले. कामात साधी चूकसुद्धा  होऊ नये, याची तो खबरदारी घेत असे. एक दिवस मालक -कारखानदार कोणाशी तरी बोलत होता, “ हाताने जितके काम होते, त्याच्या दहापट काम यंत्राद्वारा करता येते. एक शिंपी दिवसभरात एखादेच  कापड शिवू शकतो, मात्र  एक शिवण यंत्र दिवसभरात दहा कपडे शिवू शकते. ”
      त्या अपंग युवकाला त्याची आई आठवली की, जी अजूनही आपल्या वृद्धापकाळात दुसर्यांची कपडे शिवते  आणि     आपले पोट भरते. त्या काळात  अद्याप शिवण यंत्राचा शोध लागलेला नव्हता. शिंपी लोक हातानेच कपडे शिवत.
 तो युवक आपल्या मालकाला विनम्रपणे म्हणाला, “ आपली आज्ञा असेल तर मी शिवणयंत्र बनवण्याचा प्रयत्न करू का? ” मालकाने एकवार त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, “ असे शिवणयंत्र बनवले जाऊ शकते, याची तुला खात्री आहे का? ”
 “हो, मला खात्री आहे, मला माझ्या मेहनतीवर आणि निष्ठेवर विश्वास आहे. ” युवक दृढतेने म्हणाला.
      मालकाने परवानगी तर दिलीच, पण  शिवाय त्याच्या मदतीला लोक आणि आर्थिक सहकार्यही दिले. त्याने काही चित्रे बनवली, ज्याच्या आधाराने  धातूचे सुटे भाग बनवण्यात आले. यंत्राचा त्याने साचा बनवला. त्याद्वारे काम चालले होते. शेवटी त्याच्या दिवस-रात्रीच्या कष्टाला, जिद्दीला यश आले आणि शिवणयंत्राचा अविष्कार झाला. त्यावर कपडे शिवले जाऊ शकत होते.
      लोकांपर्यंत शोधाची बातमी पसरली. शिंप्यांनाही कळले, पण त्यांचा या यंत्रावर  विश्वास बसला नाही. यंत्रावर कपडे कसे शिवले जाऊ शकतात? असा त्यांचा सवाल होता. परंतु, हळूहळू लोक ते यंत्र पाहायला येऊ लागले. त्यांचा विश्वास बसू लागला. शिंपी मोठ्या खुबीने आणि तितक्याच संयमाने कपडे शिवतात, पण यंत्रानेही हुबेहुब तशीच शिलाई केली जाऊ शकते आणि अल्पावधीत होऊ शकते, याची खात्रीदेखील  त्यांना पटली.


 1840 मधली ही घटना आहे. आपल्या जिद्द, एकाग्रता आणि मेहनतीच्या जोरावर शिवणयंत्राचा अविष्कार करणार्या अपंग अमेरिकन युवकाचे नाव आहे, इलियस होव. त्याच्यामुळेच शिवण कलेत मोठी क्रांति झाली.

No comments:

Post a Comment