Saturday, October 12, 2013

बालकथा बकरी मिळाली परत



      ताश्कंद नगरीत मीर जाफर नावाचा एक फिरस्ता व्यापारी राहत होतादिवसभर उंटासारखा राबायचा. तरी त्याची बरकत काही होत नव्हतीउलट व्यापारात घाटाच व्हायचा. शेवटी त्याने व्यापार टाकला. आता तो मस्त खाई-पिई आणि कुठे तरी बाहेर जाऊन चकाट्या पिटत राही. बिच्चारी त्याची बायको चार घरची धुणी-भांडी करी आणि घरगाडा  कसा तरी टिच्चून टिच्चून चालवी.
      एक दिवस मीर जाफर एक मरतुकडी बकरी अगदी स्वस्तात घेऊन घरी आला. मीर जाफर तर दिवसभर घराबाहेरच असे. त्यामुळे बकरीचे सगळे काही जमिराला करावे लागे. बकरी  दिवसभर ओरडून दंगा घालायची. खुशाल चारा खायची आणि घरभर घाण करायची. बकरीची उसाभर करून करून जमिरा  पार मेटाकुटीला आली.
      एक दिवस मीर जाफर घरी आल्यावर जमिरा डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, “ ही बकरी काय माझा जीव घ्यायला आणला आहात? आत्ताच्या आत्ता तिला विकून या नाही तर मला माहेरी सोडून या. इथे आपल्यालाच खायचे वांदे असताना हिला काय घालू, माझी वाळलेली हाडं?”
      “जमिरा, तू अजिबात काळजी करू नकोस. आत्ताच्या आत्ता हिचा बंदोबस्त करतो.”  मीर जाफर तिचे सांत्वन करीत म्हणाला.
      त्या दिवशी मीर जाफरचं मन फार उदास होतं. काय करावं त्याला सुचत नव्हतं. त्याला तिच्या अम्मीची याद आली. तो अम्मीची कबर असलेल्या कब्रस्तानात गेला. तिथं भरपूर गवत उगवलं होतं. गवत हिरवंगार, कोवळं लुसलुशीत होतं.
      मीर जाफर काही वेळ कबरीजवळ बसला. चोहोबाजूची हिरवळ पाहून त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. त्याच्या बकरीसाठी याच्यापेक्षा  चांगलं ठिकाण आणखी  कुठे असणार?    तो उठला आणि तडक कब्रस्तानच्या रखवालदाराकडे गेला. म्हणाला, “  मी तर आता फार थककून गेलोय. मला काही मूल-बाळ नाही. तेव्हा मी मेल्यावर माझं दफन तूच करायचंस. तुला ही बकरी आत्ताच देऊन टाकतो.”
      हैदरनं अगदी आनंदानं बकरीचा स्वीकार केला.
      दोन महिन्यांनी मीर जाफर पुन्हा अम्मीच्या कबरीकडे गेला. काही वेळ बसला.
 जाताना सहज त्याची नजर तिथे चरणार्या बकरीवर पडली. पहिल्यांदा तर तो ओळखूच शकला नाही. ती त्याचीच बकरी होती. हिरवंगार गवत खाऊन अगदी धष्टपुष्ट झाली होती.
      “इतकी वजनदार बकरी दान करायची म्हणजे खुळ्याचा बाजारच की!”  तो स्वत: शीच विचार करू लागला. विचार करता करता त्याने पक्का निश्चय केला. काय वाट्टेल ते झाले तरी बकरी सोडायची नाही. तो तडक रखवालदाराच्या घराकडे गेला. त्याचा दरवाजा खटकावला. दरवाजा  उघडताच म्हणाला, “ हैदर, चल आटप लवकर. मी शहर सोडून चाललोय. तूदेखील माझ्यासोबत निघायला तयार हो.”
      “कुठे जायला  तयार होऊ म्हणतोस?” हैदरने  हैराण होऊन विचारले.
      “कुठं काय, विचारतोयस. अरे, तू मला वचन दिलयसं , माझ्या मृत्यूनंतर माझा दफनविधी तू करणार म्हणूनम्हणून तर तुला मी बकरी दिली. आता मी जिथं कुठं राहीन, तिथं तुला यावं लागेल. माझा दफन विधी करायला तू हवास ना!”
      ऐकून हैदर चक्रावलाच! तो जाम भडकला. “ तुला जिथं कुठं जाऊन मरायचं आहे, तिथं जाऊन मर जा. आणि ही तुझी मनहूस बकरीदेखील सोबत घेऊन जा. दोघे जाऊन नदीत जीव द्या नाही तर आणखी काय करायचं ते करा. वेडपट कुठला!”  असे म्हणतच हैदरने पटकन दरवाजा लावून घेतला.


     मीर जाफर बकरी घेऊन अगदी आनंदाने घरी आला. आता तो आपल्या हुशारीवर   स्वत: ची पाठ थोपटून घेत होता.  

No comments:

Post a Comment