Tuesday, October 8, 2013

बालकथा समजुतदारीचे फळ



      चंदनवनात खूप सारे पशू-पक्षी राहात. त्यात पिंकू हरीणदेखील होती. ती आपल्या कळपासोबत रोज तलावातले पाणी प्यायला जायची. तलावाजवळच एक आंब्याचं झाड होतं. त्या झाडाच्या एका डोलीत चिकर्या पोपट राहायचा. हळूहळू पिंकू आणि चिकर्यामध्ये मैत्री जमली. दोघे बराच वेळ गप्पा मारत बसायचे. एके दिवशी लांडगा भक्ष्याच्या शोधात तलावाकडे आला. तिथे त्याने हरणांचा कळप पाहिला. तो हळूच आंब्याच्या झाडामागे गेला आणि हरणांना न्याहाळू लागला.
      आता तो रोज तलावाकडे येऊ लागला आणि आंब्याच्या झाडामागे लपून हरणांना न्याहाळत राहिला. तो शिकारीसाठी योग्य संधीची वाट पाहू लागला. चिकर्या लांडग्याला रोज पाहात होता. त्याचे त्याला चलन-वलन काही चांगले वाटले नाही. त्याने ही गोष्ट पिंकू हरिणीच्या कानावर घातली. तिने ती आपल्या कळपातल्या बुजुर्ग मंडळींना सांगितली. मग सगळ्यांनी मिळून एक योजना आखली.
      दुसर्यादिवशी लांडगा आल्यावर आंब्याच्या झाडावर बसलेल्या चिकर्या पोपटाने टिर्रऽऽऽ...टिर्रऽऽऽ असा विचित्र आवाज काढून हरणांच्या कळपाला सावध केलं. पिंकू आणि तिचा कळप गप्पा मारत मारत आंब्याच्या झाडाजवळ आला. तिथे आल्यावर पिंकू कळपातल्या एका वडिलधारी हरणाला म्हणाली, “ आजोबा, आपल्या इथे फार वेळ थांबून चालणार नाही. इथे पाणी प्यायला कुणी हिंस्त्र श्वापद आलं तर आपली काही धडगत राहणार नाही. त्यापेक्षा आपण इथून पटकन निघून गेलेलं बरं.”
      तो बुजुर्ग हरीण म्हणाला, “  पिंकू, घाबरू नकोस. इथे आपली शिकार कोणतंही जनावर करणार नाही. ”
      पिंकूनं विचारलं,“ का बरं?”
      बुजुर्ग हरीण म्हणाले, “   खूप वर्षांपूर्वी वनराज सिंह आणि माझ्यात  एक सौदा झाला होतामी त्यांना सांगितलं होतं की, आम्ही पाणी प्यायला आलो की, तलावाजवळ काही वेळ आराम करू. वनराजांनी ते कबूल केलं होतं आणि यावेळी कोणी आमची  शिकार  करेल तर वनराज त्याची शिकार करतील. ”
      “ पण आजोबा, तुम्ही राजाला त्याची शिकार करायला कधी सांगता? ” पिंकू म्हणाली.
      “ या बाबतीत आपल्याला चिकर्या पोपट मदत करतो. सिंहदेखील इथेच कुठे तरी असेल. शिकारी प्राणी आला की, चिकर्या पोपट ओरडतो. मग सिंह धावत येऊन त्याची शिकार करतो. ”
      इतक्यात चिकर्या पोपटाने टिर्रऽऽऽ... टिर्रऽऽऽ असे ओरडायला सुरुवात केली. बुजुर्ग हरीण म्हणाले, “ चला, सगळे कळपात  या. शिकारी आपल्या आजूबाजूलाच आहे. ”

      हे  ऐकून लांडगा आपल्या जीव वाचवण्यासाठी हळूच मागच्या मागे सटकला आणि जंगलात धूम पळाला. त्यानंतर मात्र तो कधीच तिकडे फिरकला नाही.                                                          - मच्छिंद्र ऐनापुरे, जत (जि.सांगली)

No comments:

Post a Comment