Saturday, April 2, 2022

जगाला चिंता अण्वस्त्रांची!


 मानवी सभ्यतेचा आतापर्यंतचा लेखाजोखा तपासून पाहिल्यावर आपल्या असे लक्षात येते, की प्रत्येक मोठा संघर्ष केवळ इतिहासच बदलत नाही तर विनाश आणि निर्मितीसह अनेक सामाजिक-राजकीय समीकरणे देखील बदलतात. विशेषत: जेव्हा शस्त्रास्त्रांचा प्रश्न येतो तेव्हा युद्धांमध्ये त्यांच्या वापरण्यासह, भविष्यातील युद्धांमध्ये ही शस्त्रे कशी वापरली जातील हेदेखील ठरून जाते.  हा धोका रशिया-युक्रेन युद्धाच्या काळातच वाढला आहे.  यातही सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो अण्वस्त्रांची गरज.  रशियाकडून वारंवार अणुयुद्धाची धमकी दिली जात असताना, युक्रेनला मात्र आता त्यांनी एका झटक्यात आपली सगळी अण्वस्त्रे रशियाकडे सोपवण्याच्या घेतलेल्या  निर्णयाचा पश्चाताप होत आहे.  त्यामुळेच जपानसारख्या देशात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे की, एखाद्या देशाने हल्ला केला तर जपानने अण्वस्त्रे बाळगणे आणि वापरणे या धोरणाचा विचार का करू नये? त्यामुळे जागतिक पातळीवर अण्वस्त्रांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जपान हा जगातील एक असा एकमेव देश आहे ज्याच्यावर दोनदा अणुबॉम्ब हल्ला झाला आहे. अण्वस्त्रे मानवाला आणि पृथ्वीला कशा भयानक जखमा करतात हे जपानपेक्षा अधिक कोण चांगल्या प्रकारे सांगू शकेल.  अणुबॉम्बस्फोटांच्या भयानक आठवणींना अणु पर्यायाचा विचार करण्यापासून दूर ठेवणारे अजूनही जपानमध्ये कमी नाहीत.  पण रशिया-युक्रेनच्या युद्धात झेलेन्स्कीच्या देशाला जे दुर्दैव सोसावे लागले, त्यामुळे झेलन्सकींना आता पश्चाताप होत आहे. आणि अन्य देशांनाही विचार करायला भाग पाडत आहे.

एकतीस वर्षांपूर्वी, 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर युक्रेनने आपली सर्व अण्वस्त्रे रशियाला समर्पित केली.  सुरक्षेची हमी म्हणूनही काही अण्वस्त्रे न ठेवण्याची ही चूक त्याला इतकी महागात पडेल आणि एके दिवशी रशिया आपल्यावर एवढा मोठा हल्ला करेल, याची किंचितशी कल्पना त्याच्या मनात नव्हती.युद्धाच्या प्रारंभी नाटोकडून कोणतेही संरक्षण न मिळाल्याने युक्रेनने असे मत व्यक्त केले आहे की आज जर त्याच्याकडे अणुबॉम्ब असते तर आज ते त्यांच्या वापराचा इशारा देऊन रशियन हल्ला थांबवू शकले असते. या बदललेल्या परिस्थितीमुळे जपानमध्येही आतापासूनच अण्वस्त्रांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, अशी चर्चा  होऊ लागली आहे. अर्थात, अण्वस्त्रांच्या गरजेची चर्चा होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे रशियाने अण्वस्त्रविहिन देशावर केलेला हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेला अण्वस्त्रांचा धोका.  हा नुसता धोका नसून यादरम्यान रशियाने आपले अण्वस्त्र हल्ला करणारे युनिटही सक्रिय केले आहे. रशियाने युक्रेनवर अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.  अण्वस्त्र नसलेल्या देशांवर आण्विक हल्ल्याची चिन्हे दिसत असल्याने जगभरातील धोरणकर्ते आणि नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, आक्रमक आणि आण्विक-सशस्त्र शेजाऱ्याकडून हल्ल्याची शक्यता झाल्यास सर्वोत्तम प्रतिकार कसा करायचा? यासाठी चर्चा सुरू झाली आहेत. जपानमध्ये ही चर्चा सुरू झाली आहे. जपानला खरं तर अमेरिकेकडून सुरक्षा-हमी कराराच्या अंतर्गत सुरक्षेचे कवच आहे, ज्यामध्ये अमेरिकेतून कुठूनही जपानवर पारंपारिक आणि आण्विक हल्ला झाल्यास अमेरिका त्याचे उत्तर देण्यास बांधील आहे. पण ज्या देशांना नाटो किंवा अमेरिकेसह इतर कोणत्याही अणुऊर्जा देशाकडून अशी सुरक्षेची हमी नाही, त्यांनी काय करावे? असा आता प्रश्न निर्माण झाला आहे.

जर दक्षिण आशियाई प्रदेशावर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की, भारताच्या शेजारी असलेला पाकिस्तानसारखा छोटासा देशदेखील अण्वस्त्रसमृद्ध आहेच, शिवाय तो अणुबॉम्ब वापरण्याच्या धमक्या देत आहे.  याउलट चीनसारखा आपल्या शेजारचा देश तर आता लष्करी ताकदीच्या बाबतीत अमेरिकेशी स्पर्धा करताना दिसत आहे.  इतकंच नाही तर चीनचा भारतासोबतचा सीमावादही जुना आहे.  अशा स्थितीत चीन आपल्या साम्राज्यवादी योजनांखाली भारतावर हल्ला करण्याचे टाळत असेल, तर त्याचे एक मोठे कारण भारताची अणुशक्ती आहे, असे आकलन करणे वावगे ठरणार नाही. पण तरीही अणुऊर्जेबाबत भारताची दोन भूमिका अतिशय स्पष्ट आहेत. यामुळे भारत अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापरासाठी (उदाहरणार्थ, वीज निर्मितीसाठी) वचनबद्ध आहे.  आणि दुसरे म्हणजे तो ही शस्त्रे फक्त प्रतिहल्ला म्हणून वापरेल म्हणजेच तो पहिला हल्ला करणार नाही. मात्र, आधी मारा न करण्याच्या धोरणाचा भारतातही विचार होत आला आहे.पण मुद्दा भारत-पाकिस्तान-चीनच्या पलीकडचा आहे.  उत्तर कोरियासारखा छोटा देश एक दशकाहून अधिक काळ लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्र चाचण्या करत आहे.  उत्तर कोरियाचे हुकूमशहा किंग जोंग उन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संघर्षामुळे या देशांनी खरेच अणुयुद्ध सुरू केल्यास काय, अशी शंका संपूर्ण जगाला पडली आहे. उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातले संबंध आजही ताणलेलेच आहेत.

वास्तविक तसं पाहिलं तर आज संपूर्ण जगात सर्वाधिक अण्वस्त्रे  ही अमेरिका आणि रशियाकडे आहेत.  संख्यात्मक प्रमाणानुसार, रशिया आणि अमेरिकेकडे जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी ब्याण्णव टक्के अण्वस्त्रे आहेत.  या गुणोत्तरामुळे परमाणू परिक्षणांना प्रतिबंध करणारा सीटीबीटी (कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रीटी)  कायदा अणुचाचण्यांमध्ये भेदभाव करणारा आहे, असे भारत म्हणत आहे. विकसित देशांनी आपली आण्विक मक्तेदारी (न्यूक्लियर मोनोपोली) कायम ठेवण्यासाठी हा करार केल्याचे भारताचे म्हणणे आहे.  यामुळेच भारताने सीटीबीटी  व्यतिरिक्त अण्वस्त्र प्रसारबंदी करारावरही (एनपीटी) स्वाक्षरी केली नाही. खरे तर अण्वस्त्रांच्या साठ्याच्या बाबतीत अमेरिका फक्त काही अंशी रशियाच्या मागे आहे.  तरीही आज त्याचा अण्वस्त्रांचा साठा ब्रिटनच्या एकतीसपट आणि चीनच्या सव्वीसपट आहे.  त्याच्याकडे अनेक दशकांपासून ही अण्वस्त्रे आहेत.  अशा स्थितीत अमेरिका हवे तेव्हा अनेक वेळा पृथ्वीचा नाश करू शकतो.  वॉशिंग्टनस्थित आर्म्स कंट्रोल असोसिएशनच्या अहवालानुसार रशियाकडे पाच हजार नऊशे सत्तर आणि अमेरिकेकडे पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस अण्वस्त्रे आहेत. या यादीत फ्रान्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु आता यापुढे अमेरिका-रशिया या शस्त्रांची संख्या वाढवू शकत नाहीत. कारण हे दोन्ही देश 2010 मध्ये प्रागमध्ये झालेल्या स्ट्रेटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रिटी  कराराने बांधील आहेत. परंतु युक्रेनवरील हल्ल्यावरून असे सूचित होते की हे देश त्यांची अण्वस्त्रे वाढवू शकतात आणि त्यांचा कधीही वापर करू शकतात.

अण्वस्त्रांची एक बाजू अशीही आहे की शीतयुद्धाचा कालखंड संपल्यानंतर या शस्त्रांचा मोठा उद्देश एकमेकांवर कुरघोडी करणे हा झाला आहे.  भारत आपली अण्वस्त्रसामग्री दाखवून आपल्या शेजारील राष्ट्रांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे, तर पाकिस्तान आपला अहंगंड दाखवत आहे. भारताने आम्हीही अण्वस्त्रधारी देश आहे हे विसरू नये,अशी धमकी देत आहे. पण ही शस्त्रे स्वतःमध्ये एक भयंकर सत्यदेखील दडवून ठेवत आहेत. म्हणजेच, जर कधी अशी परिस्थिती उद्भवली आणि एखाद्या देशाने त्यांचा कुठेतरी वापर केला  तर आजची शस्त्रे इतकी विध्वंसक आहेत की, एका अणुबॉम्बमुळे लाखो जीव काही क्षणातच नष्ट होऊ शकतील. तसेच पर्यावरणावरही मोठा परिणाम होईल. अण्वस्त्रांचा वापर आज केला केला गेला नाही तरी पूर्वीच्या तुलनेत अण्वस्त्रे अधिक विनाशकारी बनली आहेत हे विसरून चालणार नाही आणि त्यांच्या वापराचा धोकाही पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment