Sunday, April 10, 2022

ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील उत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी


कोरोनाच्या काळात संपूर्ण बंदीमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांसाठी एकप्रकारे वरदानाच ठरला. ओटीटीवर दाखवले जाणारे चित्रपट आणि वेब सिरीज हेच घरात कैद झालेल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे एकमेव साधन होते. ओटीटीची मागणी जसजशी वाढली, तसतशी त्याची गुणवत्ताही कमालीची सुधारली. एकेकाळी ओटीटीवर चित्रपट आणि वेब सिरीज फक्त प्रौढांसाठी आणि खास वर्गातील प्रेक्षकांसाठी बनवल्या जायच्या तिथे आता सर्वच विषयावरील चित्रपट बनवायला सुरुवात झाली आहे. ही प्रेक्षकांसाठी एकप्रकारे मेजवानीच आहे.

ओटीटीवर बाबी देओल, अभिषेक बच्चन, अर्शद वारसी यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली.  यानंतर माधुरी दीक्षित, अनुष्का शर्मा, सुष्मिता सेन आणि रवीना टंडन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींनी ओटीटीवर काम करायला सुरुवात केली, त्यानंतर ओटीटीची मागणी आणखी वाढली.  आता एकामागून एक सर्वोत्कृष्ट चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ लागले आहेत.  अभिषेक बच्चनचा नुकताच रिलीज झालेला 'दसवीं' असो किंवा ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ठरलेला 'शरमाजी नमकीन' असो.  हे दोन्ही सिनेमे बोधप्रद आहेत.  या दोन चित्रपटांशिवाय 2022 मध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत ज्यांचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. 2022 च्या सुरूवातीला दीपिका पादुकोण, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडे अभिनित 'गहराइयां' अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला. 'गहराइयां'ची कथा अनैतिक संबंधांवर केंद्रित आहे. दुसरीकडे, हिट अँड रन प्रकरणावर आधारित 'जलसा' हा थ्रिलर चित्रपट विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे चर्चेत आला. तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन अभिनीत 'लूप लपेटा' चित्रपटात एका मुलीची कथा आहे जी आपल्या प्रियकराला संकटातून वाचवण्याची योजना आखते आणि त्यात यशस्वी होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

अभिषेक बच्चन अभिनित 'दसवीं' चित्रपटात एका अशिक्षित व्यक्तीची कथा आहे, जो आपल्या परिसरात राजकारण आणि प्रसिद्धीचा झेंडा उंचावतो, परंतु जेव्हा तो इन्स्पेक्टर बनलेल्या यामी गौतमीच्या समोर येतो तेव्हा त्याला शिक्षणाचे महत्त्व समजते.  'दसवीं' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक त्याचे कौतुक करत आहेत.  विशेषत: या चित्रपटात अभिषेक बच्चनचे खूप कौतुक होत आहे.  यामी गौतमीचा आणखी एक चित्रपट 'ए थर्सडे' डिस्ने प्लस हॉट स्टारवर प्रदर्शित झाला आहे. हा  चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंदीस उतरला आहे. ही एका युवतीची कथा आहे जी लहान मुलांना शिकवत असते आणि पुढे एक विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी ती एकाच वेळी 16 मुलांना कैद करते. त्यानंतर ती सरकार आणि पोलिसांना तिची मागणी पूर्ण करण्यास भाग पाडते. झी 5 वर रिलीज झालेला 'लव्ह हॉस्टेल' ही हिंदू-मुस्लिम प्रेमावर आधारित प्रेमकथा आहे.  क्रिकेटप्रेमींसाठी श्रेयस तळपदे अभिनित 'कौन प्रवीण तांबे' हा डिस्ने प्लस हॉट स्टारवर प्रदर्शित झालेला चित्रपट क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या जीवनावर आधारित आहे.  या चित्रपटांव्यतिरिक्त, अल्लू अर्जुन अभिनित डब केलेला 'पुष्पा' चित्रपट केवळ थिएटरमध्येच नाही तर अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील  दाखल झाला आहे. इथेही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. याशिवाय रणवीर सिंगचा क्रिकेट आणि वर्ल्ड कपवर आधारित चित्रपट '83' आणि अमिताभ बच्चन अभिनित आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटानेदेखील प्रेक्षकांना भुरळ पाडले आहे. येत्या काही महिन्यांत आणखी अनेक उत्तम चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.  यामध्ये सांक्षी तन्वर हिने भूमिका साकारलेला 'माय' नेटफ्लिक्सवर, तब्बू आणि अली फजल अभिनित 'खुफिया' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहेत. अनुष्का शर्मा निर्मित आणि अभिनीत 'चकदा एक्स्प्रेस' माजी कर्णधार क्रिकेटपटू झुलन गोस्वामीवरचा चरित्रात्मक चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत.

2022 प्रमाणेच 2021 मध्येही अनेक उत्कृष्ट चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले.  दक्षिणेतील राजकारणी जयललिता यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारा कंगना राणौत अभिनीत 'थलाइवी', तसेच शेरशाह', 'सरदार उधम सिंग', 'धमाका' तसेच अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी अभिनीत 'चेहरे', इमरान हाश्मी आणि विद्या अभिनित 'डिब्बुक' त्याचबरोबर विद्या बालनचा 'शेरनी' आदी चित्रपटांनीदेखील प्रेक्षकांची वाहवा मिळवली.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment