Sunday, April 22, 2012

बालकथा मैत्री

     एका जंगलात माकडांची एक झुंड झाडांवर राहत होती. त्यांना झाडांवर खेळून कंटाळा यायचा, तेव्हा ते जमिनीवर येत आणि खेळत. अशा वेळेला दबा धरून बसलेले चित्ते, वाघ त्यांच्यावर झडप घालून त्यांची शिकार करत. जवळच एक हरणांचा कळप होता. कधी कधी दाट झाडीमुळे त्यांना शत्रू जवळ आला आहे, याची कल्पना यायची नाही. त्यामुळे अनायसे ते त्यांची शिकार बनायचे.
    मा़कडे झाडांवर असत तेव्हा, लांबून येणारे हिंस्त्र प्राणी त्यांना दिसायचे, तेव्हा ते गोंधळ घालायचे. मा़अडे आपण खाल्लेली फळे खाली टाकायचे. हरणांचा कळप त्यांच्यावर तुटून पडे.
     एक दिवस माकडांच्या नेत्याने हरणांपुढे एक प्रस्ताव ठेवला. ते ज्या ज्यावेळी खेळायला खाली येतील, त्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या  हुंगण्याच्या शक्तीमुळे मिळणारी हिंस्त्रपदांची चाहूल माकडांना इशाराद्वारा द्यायची. त्याबदल्यात माकडांनीही झाडांवरून धोक्याचा इशारा द्यायचा. खायला फळेही खाली टाकायची.
     हरणांना प्रस्ताव नावडायचा प्रश्नच नव्हता. त्यांनी तो विनाविलंब स्वीकारला. दोघांमध्ये दाट मैत्री झाली. आता हिंस्त्र प्राण्यांपासून दोघांनाही सुरक्षितता मिळू लागली. सगळे मजेत राहू लागले.
     एक दिवस माकड आणि हरणांमध्ये एका छोट्याशा कारणावरून कुरबूर झाली. तेव्हापासून माकडांनी हरणांना धोक्याची सूचना देण्याचे बंद केले. फळेही टाकण्याचे टाळले. एक दिवस एक अजगर जंगलात आला. माकडांनी कल्पना असूनही हरणांना सूचना दिली नाही. अजगराने पहिल्यांदा काही हरणांना फस्त केले. नंतर तो झाडांवरच्या माकडांची शिकार करण्यासाठी झाडावर चढला. तेव्हा माकडांनी मोठ्या मुश्किलीने कसा तरी आपला जीव  वाचवला.
     आता दोघांना समजून चुकले की, त्यांचे मैत्रीतच भले आहे. एकमेकांच्या मदतीशिवाय ते सुरक्षित राहू शकत नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा मैत्रीचा हात घट्ट धरला. आजही त्यांची मैत्री टिकून आहे. धोका दिसला की माकडे ओरडतात तर हरणांचासुद्धा माकडांना संकटकाळी उपयोग होतो. 

No comments:

Post a Comment