Monday, April 9, 2012

बालकथा

                                                           गोलूची मदत
     चंदनवन घनदाट हिरव्यागार झाडांनी नटलं होतं. तिथे सगळे प्राणी, त्यांची बाळे अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहात होती. मोठे तर शिकारीला जायचे. बाकी मागे बच्चे कंपनीच उरायची. ती एकत्र खेळायची, दंगामस्ती करायची.
     हत्तीचे पिलू गोलू, सशाचे पिलू मिंटू, हरिणीची सोनू, कोल्ह्याचा टप्पू, अस्वलाचा छोटू हा सगळा बालचमू एकत्र असायचा. खेळायचा, बागडायचा. सगळ्यांची वयं साधारण एकसारखीच होती. मात्र शरीराच्या बाबतीत गोलू सगळ्यांपेक्षा भला-थोरला दिसत होता. शिवाय कुठल्याही खेळात तो मागेच असायचा. लपंडावात तर गड्याला लपायला जागाच मिळायची नाही. कुठेही लपायला गेला तरी तो दिसायचाच. बाकीचा बालचमू सहज लपून जाई. त्यामुळे साहजिक लपंडावाच्या  खेळाचे राज्य हमखासवेळा त्याच्यावरच येई.
     गोलूविषयी कुणालाच सहानुभूती नव्हती. लपायला येत नसल्यानं आणि खेळात कायम मागे राहत असल्यानं सगळे त्याची टर उडवत. टवाळी करत. 'गोळ्या गोळ्या' म्हणून चिडवत. टप्पू म्हणायचा," गोळ्या, जरा कमी खात जा. नाही तर बारीक कसा होणार?"
     गोलू समजावणीच्या सुरात म्हणायचा," खाण्या न खाण्यानं काय होणार आहे? माझ्यासारख्या जातीच्या प्राण्यांचं शरीर असं मोठं असतं. माझ्या वडिलांना पाहिलंय ना? ते जंगलात सगळ्यांपेक्षा मोठे दिसतात. मग मला का विनाकारण चिडवता?"
     पण त्याच्या बोलण्याचा कुणावरही काही परिणाम होत नसे. त्यामुळे तो दु:खी व्हायचा. मनातल्या मनात बडबडायचा," यांना अक्कल कधी येणार कोण जाणे!"
     एक दिवस खूप जोराचा पाऊस झाला. सगळीकडे चिखल झाला. त्यामुळे बच्चे कंपनी एका वडाच्या झाडाखाली बैठा खेळ खेळत बसले. वड खूप जुन्या वर्षांचा होता. त्यामुळे त्याच्या फांद्या जर्जर झाल्या होत्या.
     वड आतून पोखरलेला होताच, त्यात वरून जोराचा पाऊस कोसळत होता. दुर्दैवाने एक भली मोठी फांदी सगळ्या बच्चे कंपनीच्या अंगावर पडली. कुणाचा हात, कुणाचा पाय त्याखाली सापडला. सगळे जोरजोराने ओरडू लागले, रडू लागले. गोलू मात्र या अपघातातून बचावला होता. त्याच्या अंगावर एकसुद्धा ओरखडला उठला नव्हता. तो झाडाजवळ आला. त्याने आपल्या सोंडेने ती भलीमोठी फांदी बाजूला केली. सगळी बाळे बाहेर आली. त्यांनी सगळ्यांनी गोलूचे आभार मानले. म्हणाले," धन्यवाद मित्रा, आज तू सगळ्यांचे प्राण वाचवलेस.''
     मिंटू  म्हणाला," आतापर्यंत आम्ही तुझ्या या अवाढव्य शरीराची नुसती टरच उडवत होतो. पण तेच आज आपल्या अडचणीच्यावेळी उपयोगाला सांगितले. ट्प्पू म्हणाला," गोलू, आता तुला आम्ही कधी अजिबात  चिडवणार नाही." गोलूचा मात्र आनंद गगनात मावेना.

No comments:

Post a Comment