Sunday, April 22, 2012

बालकथा शेरास सव्वाशेर


     एक वृद्ध रेल्वेतून प्रवास करीत होते. ते आरामात लवंडलेले होते. एका स्टेशनवर गाडी थांबली, तशी काही शाळकरी मुलं दंगा-मस्ती करत त्या डब्यात घुसली. त्यातला एकजण आपल्या साथीदाराला म्हणाला," आज साखळी ओढून पाहू. खूप मजा येईल."
     दुसरा म्हणाला," अरे पण, विनाकारण साखळी ओढली ना तर तीनशे रुपयांचा दंड भरावा लागेल. तो कोठून भरणार?"
     तिसरा म्हणाला," चला, सगळ्यांनी फटाफट खिशात हात घाला आणि लागतील तेवढे पैसे वर काढा आनि याच्याजवळ ठेवायला द्या." सगळ्यांनी पैसे गोळा केले आणि एका जोदीदाराच्या खिशात ठेवून दिले.
    थोड्या वेळाने त्यातला एकजण हळूच म्हणाला," हे फ्रेंडस, एक आयडिया आहे. आपले पैसेही वाचतील आणि चेन ओढण्याची मजाही लुटता येईल."
एकजण अतुरतेने म्हणाला," अरे यार, लवकर सांग ना मग! वेळ का दवडतोयस?''
     त्याने आपल्या जोडीदारांना जवळ बोलावले आणि हळूच कानात म्हणाला," तो बघा, तो बसलाय ना म्हातारा...त्याचे नाव सांगू टिशीला, चेन त्याने ओढलीय म्हणून..! खूप गंमत येईल. म्हातारा फसेल. तो कितीही रडला, ओरडला तरी आपण आहोत ना! सगळ्यांनी त्याचे नाव सांगू.! टिशी त्यालाच पकडून नेईल."
     त्यांनी आपला खोडकरपणा चालू केला आणि खेचली चेन! गाडी थांबली. टिशी आणि पोलिस संबंधित डब्याच्या दिशेने धावले. मुलेही डब्याच्या दारात येऊन जोरजोराने ओरडून हाका मारू लागले. टिशी आणि पोलिस त्यांच्याजवळ आले.
" या सर या, आम्ही सांगतो चेन कोणी खेचली ती?"
    टिशी आणि पोलिस ड्ब्यात शिरले. त्या खोडकर मुलांनी हाताच्या इशार्‍याने त्या वृद्ध माणसाला अपराधी ठरवले. टिशी संतापाने वृद्ध माणसावर उखडला. लाज नाही वाटत, चेन ओढायला. काय! गंमत वाटली की काय तुला. तीनशे रुपये दंड भरावा लागतो माहित आहे ना!.."
     वृद्ध म्हणाला," साहेब, ही मुलं म्हणतात ते खरं आहे. मीच चेन ओढली. पण काय करणार साहेब? या सगळ्यांनी मिळून लुटलं मला , साहेब! माझ्याजवळ तीनशेच रुपये होते साहेब. ते या सगळ्यांनी जबरदस्तीने लुटलं. त्यामुळे नाईलाजास्तव चेन खेचावी लागली. बघा साहेब, त्या निळ्या शर्टाच्या पोराच्या खिशात बघा, त्याने त्याच्या खिशात तीनशे रुपये ठेवले आहेत."
पोलिस हवालदाराने निळ्या शर्टाच्या मुलाचे खिसे तपासले. त्यात बरोबर तीनशे रुपये सापडले. वृद्ध माणसाला पैसे देऊन टिशीने त्यांची क्षमा मागितली आणि पोलिसाने मुलांना पकडून घेऊन गेला.
     वृद्ध आपल्या पांढर्‍या दाढीवरून हात फिरवत ओठातल्या ओठात हसत म्हणाला, लेकरानों, ही दाढी उगाच उन्हात पांढरी झाली नाही.
     आता त्या मुलांना पश्चाताप वाटू लागला. ते विचार करत होते,'आपण तर त्या म्हातार्‍याची गंमत करायला निघालो होतो, पण त्यानेच आम्हाला गाढव बनवले.म्हातारा मोठा उस्ताद निघाला, त्याने आमचीच विकेट घेतली.'      

No comments:

Post a Comment