Saturday, April 21, 2012

बालकथा दस्तऐवज

     फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. लखनौचा एक नवाब शिकार खेळायला निघाला. एका हरणाचा पाठलाग करता करता तो खूप दूर जंगलात निघून गेला. त्याच्यासोबत आलेले साथीदार  मागेच राहिले.
     नवाब एक निर्जनस्थळी पोहचला. दुपार टळली होती. नवाबास जोराची तहान लागली, परंतु खूप शोधाशोध करूनही त्याला पाणी मिळाले नाही. थकलेल्या अवस्थेत घोड्यावरून जात असताना त्याने विचार केला,' अल्लाहतला, मला पाण्याशिवाय असेच तडफडून जीव सोडावा लागणार की काय?'
     इतक्यात त्याला आकाशात काही पक्षी उडताना दिसले. त्याच्यात आशा जागी झाली. कदाचित तिथे पाणी असावे, असे वाटून त्याने घोडा त्या दिशेने वळविला. लवकरच तो एका मंदिराजवळ पोहचला. मंदिर परिसरात डेरेदार वृक्ष होते. जवळ एक तळे होते. पाणी पाहिल्यावर त्याच्या जीवात जीव आला. तो लगेचच घोड्यावरून उतरला आणि तळ्याजवळ गेला. पोटभर थंडगार पाणी प्याला. घोड्यालाही पाणी पाजले. त्याला एका डेरेदार झाडाखाली बांधले आणि तिथेच झाडाखाली पहुडला. थकलेला असल्याने त्याला लागलीच गाढ झोप लागली.
     नवाब झोपेतून जागा झाला तेव्हा, सूर्य मावळलेला होता. पूर्वेकडून अंधार गडद होत चालला होता. त्याने उठून हात-पाय धुतले. नमाज अदा करता करता संध्याकाळ दाट रात्रीत विसावली. इथेच रात्र काढणं उचित आहे, असे   त्याला वाटले. तो मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन आडवा झाला. पण नवाबला जोराची भूक लागली होती. त्यामुळे त्याला झोप येत नव्हती. तो उठून बसला.
     इतक्यात त्याला काही अंतरावर एक प्रकाशाचा ठिपका दिसला. तो प्रकाश त्याच्याकडेच येत  होता. तो घाबरला. भीतीने त्याने अल्लाहचा धावा सुरू केला.
     थोड्या वेळात मंदिराचा पुजारी दिव्याच्या उजेडात तिथे पोहचला. त्याने एका कागदात गूळमिश्रीत सातू आणला होता. नवाबला भूक लागलीच होती. त्याने सातू खावून आपली भूक भागवली. पुजार्‍याचे मनापासून आभार मानून तो तिथेच झोपी गेला.
     दुसर्‍यादिवशी सकाळी नवाब जायला निघाला. त्याने पुजार्‍याला बोलावून घेऊन इनाम म्हणून थोडी जमीन लिहून दिली. आणि तो निघून गेला.
ही गोष्ट तिथल्या जमीनदारला समजली तेव्हा, तो चांगलाच भडकला. कारण त्या जमिनीवर त्याचा जमीनदारचा डोळा होता. त्याने पुजार्‍याला बोलावून घेतले व ती जमीन आपल्या नावावर करण्यासाठी दवाब टाकू लागला. पण पुजार्‍याने द्यायला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आणखी संतापलेल्या जमीनदारने त्याला झाडाला बांधायला सांगून फटके मारायला लावले. शेवटी फटके सहन न झाल्याने लाचार पुजार्‍याने दस्ताऐवज जमीनदारला देऊन टाकला.
     जमीनदारने त्याचे तुकडे तुकडे केले. आणि ते तुकडे पुजार्‍याला गिळायला लावले. त्याने लाचार हो ऊन ते तुकडे चावून चावून गिळून टाकले.
     काही दिवसांनी नवाब योगायोगाने त्याच परिसरात आला होता. त्याला पुजार्‍याची आठवण आली. तो पुजार्‍याच्या झोपडीजवळ गेला. बाहेर  पुजार्‍याची कृश मुले खेळत होती. कपडेसुद्धा फाटले होते.
     त्यांना पाहून नवाबला आश्चर्य वाटले. पुजार्‍याने आपण दिलेल्या जमिनीच्या तुकड्याचा उपयोग कदाचित योग्यप्रकारे करू शकला नाही, असे त्याला वाटले. इतक्यात पुजारी झोपडी बाहेर आला. नवाबला पाहून त्याने हात जोडून नमस्कार केला. अदबीने  त्याने नवाबला  झोपडीजवळच्या बाजल्यावर बसवले. गूळमिश्रीत सातू त्याला खायला दिला. पुजार्‍याची आपल्यावरची आत्मियता पाहून नवाबला गहिवरून आले. सातू खावून झाल्यावर नवाब म्हणाला," एक कागद घेऊन ये, मी तुला आणखी एक इनाम लिहून देतो."
     "मायबाप, आपल्याला माझी एक विनंती आहे. कागदावर लिहिलेलं इनाम मला नको आहे." पुजारी हात जोडून म्हणाला.
     " तर मग ताम्रपटावर लिहून देऊ?" नवाबने त्याला काहीसे आश्चर्याने विचारले.
     " नाही मालक, ते तर मग गिलायला फारच कठीण जाईल. तुम्हाला दस्तऐवज द्यायचाच असेल तर एखाद्या फळावर लिहून द्या. " पुजारी अगदी भोळेपणाने म्हणाला. 
     त्यावर नवाब मोठमोठ्याने हसला आणि म्हणाला, " अरे वेड्या, दस्तऐवज कुणी फळावर लिहून देत का? दस्ताऐवज काय खायची चीज आहे, असे वाटलं की काय तुला?"
     "जी मायबाप! खाण्यासाठीच असतो." पुजार्‍याने उत्तर दिले.   
      " ओ हो, याचा अर्थ तू तो दस्तऐवज खावून टाकला आहेस तर! अरे, तो दस्तऐवज घेऊन तहसीलदारांकडे जायचंस. दस्तऐवज दाखवून जमीन ताब्यात घ्यायचीस.  याचा अर्थ ती जमीन तुझ्या कब्जात आली नाही?" नवाबने विचारले.
     पुजार्‍याने घडला प्रकार सारा नवाबला सांगून टाकला. पुजार्‍यावर झालेला अन्याय ऐकून नवाब संतापला. त्याने त्याचवेळेला जमीनदारला बोलावून घेतले आणि त्याला खडे बोल सुनावत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला.
     दुसर्‍यादिवशी जमीनदार न्यायालायात हजर झाला, तेव्हा त्याला शंभर फटक्यांची शिक्षा ठोठावण्यात आली. शिवाय पुजार्‍याच्या घरी एक महिना नोकर बनून सेवा करण्याचा आदेशही दिला.
     नवाबने पुजार्‍याला जमीन लिहून दिली आणि सोबत धनही दिले. आता पुजारी आरामात आपले जीवन जगू लागला.                                                                                      

No comments:

Post a Comment