फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नेपाळमधल्या एका गावात रामधन नावाचा एक गरीब मजूर राहत होता. त्याच्याजवळ एक गाय होती. गरिबीमुळे वैतागून गेलेल्या रामधनला त्याची बायको नेहमी धीर द्यायची. म्हणायची, 'काळजी करू नका. एक ना एक दिवस, चांगले दिवस येतील.' एक दिवस त्याच्या गायीने एका वासराला जन्म दिला. आता रामधनने गाय विकण्याचा विचार केला. त्यानुसार एक दिवस तो गाय विकायला निघाला. वाटेत त्याला घोडेस्वार भेटला. रामधनने त्याला गाय विकत घेण्याची विनंती केली. " गाय घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत, पण घोड्याच्या बदल्यात गाय घ्यायला तयार आहे." घोडेस्वार म्हणाला. रामधनने विचार केला, ' घोडा रोज जंगलातून लाकडे आणण्याकामी उपयोगाला येईल. त्याच्याने थोडा का होईना पण भाकरीचा प्रश्न मिटेल.' त्याने गायीच्या मोबदल्यात घोडा विकत घेतला व घरी जायला निघाला.
वाटेत त्याला एक धनगर भेटला. रामधनला घोड्यापेक्षा बकरीत लाभ दिसला. त्याने धनगराशी सौदा केला आणि एक बकरी खरेदी करून पुढे निघाला. पुढे वाटेत त्याला कोंबड्या घेऊन चाललेला माणूस दिसला. त्याला बकरीपेक्षा कोंबड्यांमध्ये फायदा असल्याचे वाटू लागले. अंडी, कोंबड्याच्या पिलांमुळे आपले दिवस पालटतील, असे त्याला वाटले. त्याने बकरी देऊन कोंबड्या विकत घेतल्या. काही अंतर चालून गेल्यावर रामधनला भुकेची जाणीव झाली. आणखी चार पावले पुढे गेल्यावर त्याला एक ढाबा दिसला. तो ढाबेवाल्याला म्हणाला," मला जेवायला दे. त्या बदल्यात या कोंबड्या ठेव कारण, माझ्याजवळ पैसे नाहीत."
ढाबेवाला म्हणाला," अरे, तू रिकामा घरी गेलास तर तुझी बायको नाराज होईल. " यावर रामधन खात्रीपूर्वक म्हणाला," माझी बायको अडाणी असली तरी मोठी समजूतदार आहे. ती अजिबात नाराज होणार नाही." ढाबेवाला त्याला म्हणाला," मी तुला जेवायला देईन, पण माझी एक अट आहे. जर तुझी बायको नाराज झाली नाही तर मी तुला गाय, घोडा, बकरी आणि कोंबड्यांएवढी होणारी किंमत देईन. नाही तर तुला आयुष्यभर माझ्या ढाब्यावर काम करावं लागेल."
रामधनला प्रचंड भूक लागली होती. त्याने चटकन ढाबेवाल्याची अट मान्य केली. रात्री रामधन घरी परतला. ढाबेवाला दाराआड लपून दोघा नवरा- बायकोमधला संवाद ऐकत होता. रामधनने दिवसभराच्या सगळ्या घडामोडी आपल्या बायकोला सांगितल्या. त्यावर बायको म्हणाली," काही हरकत नाही. तुम्हाला पोटभरून जेवण मिळालं, यातच मला आनंद आहे. तुम्ही माघारी आलात हे काय कमी आहे? आपण खूप काबाडकष्ट करू. कोंबड्यासुद्धा पाळू, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका."
रामधनच्या बायकोची सहनशीलता पाहून ढाबेवाल्याला गदगदून आलं. दिलेल्या शब्दानुसार हार मानून त्याने रामधनला गाय, घोडा, बकरी व कोंबड्यांची होणारी सर्व किंमत त्याच्या हातात ठेवली. शिवाय त्याला ढाब्यावर रोज कामालाही यायला सांगितले. रामधन सकाळी उठून बाहेर आला, तेव्हा दारात त्याची गाय बांधलेली दिसली.
he katha kaalnirnay 2012 madhil katheshi samya aasnari aahe.
ReplyDelete