Saturday, April 14, 2012

चिनी कथा उंच पहाडावरचे मंदिर

     एका छोट्याशा गावात राहात होता चाओ येन. लहानपणापासूनच तो खूप समजूतदार होता. गावातल्या  सगळ्यांचाच तो आवडता होता.
     गावाच्या दक्षिणेला एका उंच पहाडावर एक मंदिर होते. त्या मंदिरात एक पवित्र  ग्रंथ ठेवण्यात आला होता, ज्यात  लोकांच्या भविष्यातील जीवनाविषयी लिहिले होते. तिथला पुजारी ते वाचून दाखवत असे. चाओ येन अठरा वर्षांचा झाला, तेव्हा त्याच्या वडिलांनीही  त्याला  मंदिरात नेले. वडिलांनी पुजार्याला चाओचे भविष्य वाचून दाखवण्याविषयी विनंती केली. पुजार्याने पहिल्यांदा चाओच्या शिक्षणाबाबत सांगितले. त्यानंतर कामधंद्याविषयी सांगितले पण अचानक तो बोलायचा थांबला. चाओच्या वडिलांना काळजी वाटू लागली. त्यांनी विचारलं," काय झालं पुजारी,  असे अचानक  का बरं थांबलात?"
पुजारी दु:खी स्वरात म्हणाला," सांगताना मला फार दु: ख होतंय, पण..."
"काय झालं, पुजारी?" चाओचे वडिल काळ्जीच्या आर्तस्वरात विचारले.
" या ग्रंथानुसार तुमच्या मुलाचे आयुष्य अवघे एकोणवीस वर्षांचे आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू अटळ् आहे."
चाओ आणि त्याच्या वडिलांचा या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. चाओचे वडील पुन्हा म्हणाले," अनेकदा नीट पहा, नक्कीच कुठे तरी चूक झाली असली पाहिजे."
"नाही, कुठेच चूक  नाही. यात अगदी स्वच्छ दिसतं आहे." पुजारी म्हणाला आणि त्याने ग्रंथ बंद करून ठेवला.
     चिंतेत बुडालेले पिता-पुत्र घरी परत आले. त्यांनी मनाला समजावलं,' जे काही घडायचं आहे, ते चुकणार नाही.  आपण परमेश्वराची प्रार्थना करू'
         भविष्य ऐकल्यापासून  चाओ उदास राहू लागला. त्याचं मन कशातच लागेना. त्याला एकच चिंता सतावू लागली, ती म्हणजे आपल्या पश्चात आई-वडिलांचं कसं होणार? याच काळजीत असताना एक दिवस चाओ धनुष्य आणि बाणांनी  भरलेला भाता घेऊन शिकारीला गेला. चालत चालतच तो उंच पहाडावर गेला. त्याचे मन पार उन्मूळ पडले होते. आणि चिंतेने त्याला घेरून टाकले होते. आपल्या आई-वडिलांचा सांभाळ कोण करणार? या एकाच प्रश्नाने  तो अस्वस्थ होता. तो पहाड चढतच राहिला. चढता चढता तो अगदी उंच  एका छोट्या गवताळ प्रदेशात पोहोचला. तिथे चोहोबाजूंनी रंगीबेरंगी टवटवीत फुले उमलली होती. छान उन्ह पडले होते. थकलेला चाओ तिथल्या  एका ठिकाणी जाऊन बसला. बसल्या बसल्या त्याला झोप येऊ लागली. लवकरच  त्याला गाढ निद्रेने घेरून टाकले.
       डोळे उघडले, तेव्हा अंधारून आले होते. पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता, त्याचबरोबर कुणाच्या तरी बोलण्याचा आवाजही ऐकू  येत होता. तो पटकन उठला आणि आवाजाच्या दिशेने पुढे सरकला. तिथे त्याला  दोन माणसे  समोरासमोर एका दगडावर बसलेली दिसली.  कवड्यांच्या खेळासारखा काही तरी खेळ चालला होता. मधे मधे ते कुठले कुठले तरी अंक उच्चारायचे.
     तो झाडाआड उभा राहिला. दोघांमधला एकटा रुंद कपाळाचा आणि वयस्क दिसत होता. त्याने हिरव्या रंगाचा गाऊन घातला होता.  त्याची  चप्पलसुद्धा हिरव्या रंगाची होती. तर त्याच्या समोर बसलेल्या माणसाचे कपडे  आकाशी रंगाचे होते. त्यावरील चांदण्यांचे टिपके चमकत होते. त्याचे केस कुरळे आणि खांद्यापर्यंत लोंबणारे होते तो अंक उच्चारायचा, तेव्हा वृद्ध डोक्याला हात लावून विचार करत राहायचाअंक वाढायचे, कमी व्हायचे,  मग शेवटी दोघेही एका अंकावर येऊन थांबायचे.
     आता चाओला राहवलं नाही. तो तडक त्यांच्याजवळ गेला. ते दोघेही अजूनही कुठल्या तरी अंकावर विचार करत होते.  इतक्या आकाशी निळ्या कापडातला मनुष्य म्हणाला," व्वा, खूपच छान! काय नशीब मिळवलंय या माणसाने!"
     इतक्यात  त्या दोघांचे लक्ष चाओकडे गेले. " तू कोण आणि इथे का व कसा आलास?" निळ्या गाऊनवाल्याने विचारले.
     चाओ म्हणाला," मी तर इथेच झोपलो होतो. आता जाग आली, तेव्हा तुम्हाला पाहिलं. आप कोण आहात?"
" कोणी नाही. तू इथून जा."
"मला ठाऊक आहे, तुम्ही सामान्य माणसे नाही आहात.पण खरेच, कृपा करून  मला सांगा की आपण कोण आहात ?" चाओ आदराने  पुढे झुकत  म्हणाला.
निळा गाऊनवाला म्हणाला," आकाशात ती तार्यांची झुंड दिसते का, ज्यांचा आकार अस्वलासारखा आहे?"
"हो, आजीने दाखवली होती. आजसुद्धा मी ओळखतो." चाओ अगदी उत्साहित होऊन म्हणाला.
"मी त्या तार्यांचा राजा आहे. आणि हे दिर्घायुष्य देणारे देवता आहेत. समजलं? आता  घरी जा."
     चाओ लगेच जमिनीवर गुडघे टेकले आणि दिर्घायुष्य देणार्या देवतेचे पाय धरले," मला तुम्हीच आवश्यकता होती. आता  तुम्हीच फक्त माझी मदत करू शकाल."
"मदत? कसली मदत?" वृद्ध.
     " भाग्यग्रंथात माझे आयुष्य फक्त एकोणवीस वर्षांचे आहे आणि मला  एकोणवीस वर्षे  व्हायला केवळ  काही दिवसच उरले आहेत. माझ्या पश्चात माझ्या आई-वडिलांचे कसे होणार, याची  मला चिंता लागून राहिली  आहे. मला इतक्या लवकर मरायचं नाही. मला मदत करा" चाओ अत्यंत कळवळून म्हणाला.
निळा पायघोळ अंगरखा घातलेला इसम त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला," हे बघ, नशीब एकदाच लिहिलं जातं.  ते पुन्हा बदलता येत नाही. ग्रंथात लिहिलेलं पुसता येत नाही. आता जे काही आयुष्य उरलं आहे, ते तू आई-वडिलांच्या सेवेसाठी घालव.  जा, घरी जा उशीर करू नकोस."
पण चाओ तेथून हलला नाही, तो वृद्ध व्यक्तीचे पाय धरून रडत राहिला.
     दोघांनीही एकमेकांकडे पाहिलेत्यांनाही काय करावं सुचत नव्हतं? काही वेळ विचार केल्यावर हिरव्या गाऊनमधला वृद्ध म्हणाला," आम्ही भाग्यग्रंथातले शब्द बदलू शकत नाही, पण केलेली चूक दुरुस्त करू शकतो." असे म्हणून ती वृद्ध देवता हसली. त्याचबरोबर निळा गाऊनवालाही हसला.
     त्याच्या बोलण्याचा अर्थ उमजल्याने  चाओने आपली मान वर केली. पण तिथे कोणीच नव्हते. त्याला रडू कोसळले. आपल्या मदतीला आता कोणीच येणार नाही, याची त्याला खात्री वाटू लागली. आपला भाता आणि धनुष्य खांद्यावर घेऊन तो जड अंतः करणाने पहा उतरू लागला.
     चाओने या घटनेची कुठेच वाच्यता केली नाही. आता तो फक्त एकच करायचा, दर आठवड्याला पहाडावर जायचा णि त्या दगडावर मेणबत्ती लावून यायचा. त्याचा हा क्रम तो एक्यान्नव ( ९१) वर्षांचा होईपर्यंत चालत राहिला. शेवटी त्याचवेळेला त्याच्या लक्षात आले की ती देवता कोणत्या चुकीविषयी बोलत होती. दिर्घायुष्य देणार्‍या देवता त्यांनी एकोणवीसमधला एक अंक काढून नऊनंतर लिहिला होता.
आजसुद्धा दक्षिण पहाडावर एक मंदिर आहे, तिथे लोक दिर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थनेला जातात


No comments:

Post a Comment