Sunday, April 22, 2012

बालकथा चिंगीचा ऑक्टोपस

     चिंगी खूपच शांत आणि समजूतदार मुलगी होती. अभ्यासातही हुशार होती. तिचे वडील एका फॅक्टरीत चौकीदार म्हणून कामाला होते. त्यांना फॅक्टरीजवळच राहायला घर मिळाले होते.
     जवळच असलेल्या अपार्टमेंटमध्ये फॅक्टरीत काम करणारे अधिकारी राहत असत. चिंगी आपल्या लहानग्या भावाला घेऊन तिथे खेळायला जाई. तिथे खेळायला येणारी मुले छान छान आनि महागडी खेळणी खेळायला घेऊन येत. पण चिंगी आणि तिच्या भावाकडे मात्र अशी छान छान खेळणी नसायची.
     चिंगीला ठाऊक होतं, आपल्या बाबांचा पगार कमी आहे. त्यामुळे ते महागडी खेळणी घेऊ शकत नाहीत. चिंगीच्या लहानग्या भावाला मात्र या गोष्टी कळायच्या नाहीत. तो तशा छान छान खेळण्यांसाठी हट्ट करायचा, भोकांड पसरायचा. चिंगीला फार वाईट वाटायचं.  
     एक दिवस चिंगीने शेजार्‍यांच्या टिव्हीत पाहिलं की आपल्या आजूबाजूला पडलेल्या टाकाऊ वस्तूंपासून छान खेळणी बनवता येऊ शकतात. मग एक दिवस तिने एक जुना रुमाल घेतला. त्यात जुनाच एक रबरी चेंडू गुंडाळला आणि त्याला तिच्याकडेच्या खराब झालेल्या रंगीबेरंगी रेबिनी बांधल्या. आता तो काहीसा ऑक्टोपससारखा दिसू लागला.
     रुमालात गुंडाळलेला आणि रेबिनी बांधलेल्या चेंडूशी चिंगी आपल्या भावासोबत खेळू लागली. ती तो भावाकडे फेकायची. भाऊ तिच्याकडे फेकायचा. पहिल्या पहिल्यांदा त्याला हा खेळ आवडला नाही. पण नंतर रंगीबेरंगी रेबिनी हवेत उडताना त्याला मस्त वाटू लागले. त्यामुळे चेंडू झेलायलाही त्याला गंमत वाटू लागली.आता त्याला खेळ आवडू लागला.
     दोघा भावंडांना हा खेळताना पाहून आणखी काही मुले त्यात सहभागी झाली. काही दिवसांतच तिथली मुले दोन गट करून हा खेळ खेळू लागली. सगळ्यांनी या खेळाचे नाव चिंगीचा ऑक्टोपस' असे ठेवले.या खेळात मुलांना खूप मजा येऊ लागली. आता नेहमी दोन गट करून मुले खेळू लागली. सगळ्यांना त्यांच्याजवळच्या महागड्या खेळण्यांचा व दुसर्‍या खेळांचा  विसर पडला. चिंगीच्या भावानेही खेळण्यांचा हट्ट सोडून दिला.
     चिंगीला कळून चुकले की टाकाऊ वस्तूंपासूनही आनंद देणारी खेळणी बनवता येतात. आजूबाजूला अशा अनेक वस्तू पडलेल्या असतात. आनंदासाठी  महागडी खेळणीच घ्यावी लागतात, असे नाही. ज्या खेळात आपल्याला आनंद मिळतो, पुढे तोच खेळ प्रमुख खेळ म्हणून ओळखला जातो.

No comments:

Post a Comment