दुष्काळग्रस्त भागातल्या शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीतसुद्धा मध्यान्ह भोजन शिजवून दिला जावा, असा आदेश शासनाने दिला होता. दुष्काळी भागातील लोकांच्या सोयीसाठी अनेक योजना राबविण्यात येत होत्या. जनावरांना मोफत चारा पुरवणं, पिण्याच्या पाण्याची टँकरने पुरवठा करणं यांसह अनेक योजना होत्या. शाळांमध्ये रोज देण्यात येणारा शालेय पोषण आहार आता सुट्टीतही दिला जाणार होता. जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग याची काटेकोर अंमलबजावणी करणार होती. निगराणीसाठी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या.
वास्तविक शाळांना सुट्ट्या पडल्या होत्या. पण शासनाचा आदेश असल्यानं शिक्षकांनी आपला सुट्टीचा बेत रद्द करून शाळांचा रस्ता धरला होता. तर काही शाळांनी शिक्षकांची रोज एकाची पाळी लावलेली होती. मध्यान्ह भोजन शिजवण्याची सक्ती पाहता सगळेच सतर्क होते. निरीक्षक मंडळी कधी फिल्डवर जाऊन तर कधी मोबाईलवरून रोजचा रिपोर्ट घेत होते. तो वरती पाठवला जात होता.
एक विस्तार अधिकारी धरपकडवाडीच्या प्राथमिक शिक्षकाला मोबाईल लावून परिस्थितीची माहिती घेत होते. आपल्या विस्तार अधिकार्याचा नंबर पाहून शिक्षकाने कॉल रिसीव केला.
शिक्षकः हाँ साहेब, नमस्कार!
विस्ताराधिकारी: नमस्कार. नमस्कार! कोठे आहात?
शिक्षकः सर, शाळेत.
विस्ताराधिकारी: काय करताय?
शिक्षकः साहेब, मुलांसाठी मध्यान्ह भोजन बनवतोय.
विस्ताराधिकारी: छान.. छान.. इतक्या कडक उन्हातसुद्धा आपण शासनाच्या उद्देशासाठी झटता आहात. मानलं पाहिजे तुम्हाला!
शिक्षक :(कौतुक ऐकून) साहेब, आपण तर पहिल्यापासूनच झटतो. कुणी आपल्याला नाव ठेवणार नाही, असं आपलं काम असतं साहेब! आपलं रेकॉर्ड चांगलं आहे साहेब. तुम्ही आता नवीन आला आहात. पण आपण आपला मोठेपणा सांगत नाही साहेब ! आपण करतो ते 'दिल से' साहेब!
विस्ताराधिकारी: छान.. छान..! मनाला खूप बरं वाटलं. आपल्यासारख्या मूठभर शिक्षकांमुळेच तर शिक्षण विभाग टिकून आहे. नाही तर....
शिक्षकः साहेब, माझ्याबाबतीत तर आपण निश्चिंत राहा.
विस्ताराधिकारी: बरं, मुलं आलीयत का नाहीत?
शिक्षकः काय बोलताय साहेब ! ४२ पैकी २७ विद्यार्थी हजर आहेत साहेब.
विस्ताराधिकारी: किती वेळ झाला, मुलं येऊन?
शिक्षकः झाले साहेब, पंधरा-वीस मिनिटं!
विस्ताराधिकारी: छान... छान.. बचत गटानंच शिजवलाय ना?
शिक्षकः होय साहेब, मटकीच्या मोडीची आमटी आणि भात बनवलाय. कोथींबीर-टोमॅटो सगळं सगळं टाकलंय, साहेब!
विस्ताराधिकारी: छान.. छान.. पण मला मुलांचा आवाज येत नाही?
शिक्षकः साहेब, भुकेचं टाईम आहे ना! गपगार खाताहेत साहेब. दोन मुलं वाढतायत साहेब. हा बघा भांड्याचा आवाज. हे बघा साहेब, आणखी दोन मुलं आली साहेब... साहेब, आकडा आता उपस्थितीचा आकडा २९ करा. ( मुलांना उद्देशून) चला रे, बसून घ्या पटकन... ये वाढ रे त्यांना ...!
विस्ताराधिकारी: गुरुजी, ही दोन मुलं आली कोठून?
शिक्षकः यांच्या घरातून! दोघे बहीण-भाऊ आहेत, साहेब.
विस्ताराधिकारी: होय, घरातून आले आहेत, पण शाळेत ही दोन मुलं आणि बाकीची सगळी मुलं आली कोठून?
शिक्षकः साहेब, दरवाज्यातूनच आली. आणखी कोठून येणार साहेब!
विस्ताराधिकारी: किती दरवाजे आहेत, तुमच्या शाळेत यायला?
शिक्षकः एकच तर चॅनल गेट आहे, साहेब. आपल्याला तर माहितच आहे सर!
विस्ताराधिकारी: पण गुरुजी, त्या गेटला तर बाहेरून कुलूप आहे आणि गेल्या अर्ध्या तासापासून तुमच्या शाळेसमोर उभा आहे.
pudhari, bahaar 20/5/2012
No comments:
Post a Comment