शर्यत सुरू झाली. तिघेही नदीवर जायचे. पाणी भरायचे आणि जंगलावर नेऊन ओतायचे. किती तरी तास त्यांचा हा क्रम चालला होता. थंडीचे दिवस होते. अचानक सुरू झालेल्या आणि सतत पडणार्या पावसामुळे जंगलातल्या पशू-पक्षांमध्ये हाहाकार उडाला.
इतक्यात चकाकणार्या विजेची दृष्टी पावसाचा वर्षाव करणार्या ढगांवर पडली. बेमोसमी पावसामुळे ती बुचकाळ्यात पडली आणि चिडलीही! 'अरे, हे काय! या ढगांचा ना गडगडाट ना चमचमाट, तरीही पाऊस कोसळतो आहे आणि तेही न थांबता. जाऊन थोरल्या ढगाला सांगावं. हे तर परंपरेच्या पार विरुद्ध आहे.'
वीज चमकत-लचकत थोरल्या ढगच्या घराच्या दिशेने निघाली. तिकडे बर्फसुद्धा उठून जंगलावर आला. त्यानंही लागोपाठ कोसळणारा पाऊस पाहिला आणि चकित झाला. ' अरे या मोसमात जंगलावर बरसण्याची माझी बारी आहे. आणि हे ढग मधेच असं काय बरं करताहेत. हे नियमाविरुद्ध आहे. मला तातडीनं थोरल्या ढगाशी बोललं पाहिजे.' बर्फसुद्धा संतापाने थोरल्या ढगाच्या दिशेने निघाला.
इकडे ते तीनही ढग थांबायचे नाव घेत नव्हते. घेणार तरी कसे! सर्वात शक्तीमान कोण याचा फैसला जो करायचा होता. पण जंगलातल्या पशू-पक्षांचे मात्र हालहाल होत होते. ते पावसांना शिव्याशाप देत होते.
वीज आणि बर्फ थोरल्या ढगाच्या प्रदेशात पोहचले. त्यांनी सगळा प्रकार ढगाच्या कानावर घातला. तीन ढगांचा प्रताप त्यांनाही आश्चर्यात टाकून गेला. त्यांनाही काही उमजेना.
'पण मला याबाबतीत काहीच करता येणार नाही. तुमच्यासोबत येऊही शकत नाही. या मोसमात इथून हालता येणार नाही. तुम्ही असे करा, या वार्याला सोबत घेऊन जा. वार्याची ढगांमध्ये नेहमीच महत्त्वाची भूमिका असते.'
ढगाच्या म्हणण्यावर वार्याने सहमती दर्शवली. तो वीज आणि बर्फा यांच्यासोबत जंगलाच्या दिशेने जायला निघाला. ढग अजूनही जंगलावर पावसाचा वर्षाव करीतच होते.
'हे काय चालवलंय तुम्ही?' वारा दरडावण्याच्या स्वरात म्हणाला. ' आम्ही तिघांनी शर्यत लावली आहे. तिघांत शक्तीमान कोण...?' एका ढगानं सारा प्रकार कथन केला.
'आता तुम्हीच काय तो निर्णय द्या...' दुसरा म्हणाला.
'अरे मुर्खानों, मी कसा निर्णय देणार?' वारा उलट चकित हो ऊन म्हणाला. 'ठिक आहे, जो पर्यंत निर्णय लागत नाही, तोपर्यंत आमचा हा उद्योग सुरूच राहणार..' असे म्हणून तिघे पाणी भरायला पुन्हा नदीवर जाऊ लागले. ढगांचा इरादा ऐकून जंगलातले सगळे पशू-पक्षी घाबरून गेले. वीज म्हणाली,' आता पुरे!' बर्फ तर संतापून म्हणाला,' हा माझा मोसम आहे. इथून चालते व्हा!'
'आता निर्णय झाल्यावरच आम्ही इथून हटू' तिघे एकदम म्हणाले. वीज रागाने चमकत-लचकत निघून गेली. बर्फही संतापाने ओरडून म्हणाला,' ठीक आहे, ठीक आहे, मीसुद्धा बघून घेईन. उन्हाळ्यात मीसुद्धा येऊन जंगलावर कोसळत राहीन."
तरीसुद्धा ढगांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले. ढगांच्या उर्मटपणाचा वार्याला भारी संताप आला.त्याने लागलीच आपला वेग वाढवला आणि तिघा ढगांना आपल्या कवेत घेऊन दूर दूर निघून गेला. वारा खूप दूर वाळवंटात पोहचला. तिथे ढगांना सोडले. ' आता इथे करत बसा हार-जीतचा फैसला. हा मी चाललो..' इतके बोलून वारा माघारी फिरला.
त्या तीन छोट्या छोट्या, गोल गोल आणि छान छान ढगांनी आतापर्यंत वाळवंट कसले असते ते कधी पाहिले नव्हते. तप्त रेतीतून उष्णता बाहेर पडत होती. त्याच्याने त्यांना तिथे थांबणे असह्य झाले. सगळे पाणी तर त्यांनी जंगलात ओतले होते. पाण्याचा एक थेंबसुद्धा त्यांच्याजवळ नव्हता. त्यामुळे ते उष्णतेने भाजून निघत होते. तिघेही तेथून हालले. पण जायचे कुठे? घरचा रस्ता तर माहित नव्हता. किती तरी तास ते तिथेच घुटमळत राहिले. तहानेने त्यांचा जीव कासाविस झाला होता. उषणतेने तर त्यांच्या अंगाची कातडी सोलून निघायची पाळी आली. तिघांनाही घरच्यांची आठवण येत होती. तिघांनाही रडू आवरले नाही. ते मोठमोठ्याने रडू लागले.
त्यांना रडताना पाहून सूर्याला दया आली. त्याने वार्याला त्यांच्या घरी पोहचवायला सांगितले. वारा धावत तिथे आला. म्हणाला,' आता कळलं? पाणी किती मोलाचं आहे ते! पण माझी एक गोष्ट ऐकली तर तुम्हाला घरी नेणार आहे...'
'हो हो. आम्ही तुमचे सगळे ऐकायला तयार आहोत. पण आम्हाला येथून घेऊन चल.'
'घ्या शपथ! यापुढे कधीही बेमोसम बरसणार नाही. दुसर्याला त्रास होईल, अशी शर्यत लावणार नाही.' तिघा ढगांनी शपथ घेतली. वार्याने तिघांनाही उचलले आणि अलगद त्यांच्या घरी आणून सोडले. तिकडे ढग गेल्याचे पाहून बर्फ जंगलावर आला आणि बरसू लागला. सगळे पशू-पक्षी आपापल्या घरात निश्चिंतपणे पडून राहिले.
No comments:
Post a Comment