Saturday, April 21, 2012

बालकथा गरिबीची खोटी बतावणी


     गोष्ट खूप जुनी आहे. रामनगरमध्ये राजा देवगिरी राज्य करीत होता. सार्‍या प्रजेची तो उत्तम प्रकारे काळजी व्हायचा. त्यातल्या त्यात गरिबांसाठी त्याने खास सवलतीच्या योजना राबविल्या होत्या. गरिबांना कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नव्हता. शिवाय त्यांना अन्न-धान्यही सवलतीच्या दरात उपलब्ध होते.
     काही काळ सर्व काही ठिकठाक चालले होते. परंतु, नंतर राज्याची  गंगाजळी कमी होत चालली होती. राज्याच्या उत्पन्नातही घट येऊ लागली होती. प्रत्येक नागरिक स्वतःला गरीब घोषित करून अन्न-धान्यात मिळणार्‍या सवलतीचा लाभ उठवत होता. करसुद्धा भरला जात नव्हता. कर भरणार्‍यांची संख्या मोजकीच राहिली होती. त्यामुळे प्रधानाला याची मोठी चिंता सतावत होती. त्याने दारिद्र्य रेषेखालील श्रीमंतांना शोधून काढण्याचे आदेश दिले, पण फारसे काही हाताला लागले नाही.
     प्रधानापुढे मोठी गंभीर समस्या निर्माण झाली. तो राजाला आपल्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना देऊ इच्छित नव्हता. कारण राजा दु:खी-कष्टी बनला असता. ही योजना बंद करण्याचा विचारही केला जाऊ शकत नव्हता. कारण त्यामुळे खरोखरच दारिद्र्यात जगणार्‍यांची मोठी पंचाईत झाली असती. त्यांच्या मनात राजाविषयी गैरसमज निर्मान झाला असता.
     खूप विचार केल्यावर प्रधानाला एक उपाय सुचला. त्याने तो उपाय  राबवण्याचे ठरवले. राजाला सार्‍या परिस्थितीची कल्पना देऊन योजनेच्या अंमलबजावणीसंबंधी परवानगी मिळवली. राज्यात दवंडी पिटवण्यात आली. 'राजाने आता श्रीमंतांनाही विशेष सवलत जाहीर केली असून यापुढे कोणावरही जबरदस्तीने कर आकारला जाणार नाही. यापुढे जे काही धनाढ्य लोक स्वच्छेने कर भरतील, त्यावरच राज्याचा आर्थिक कारभार चालवला जाईल. तरी ज्यांना कुणाला नव्या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी आपली नावे सरकारी कचेर्‍यांमध्ये  नोंदवावीत.'
     दवंडीचा असा अनुकूल परिणाम झाला की, खोटी गरिबी दाखवून लाभ उपटण्यापेक्षा श्रीमंत राहूनच सवलती उचलल्याचे चांगले! असा विचार करून झाडून सर्व श्रीमंत लोकांनी आपापली नावे सरकारी कचेर्‍यांमध्ये नोंदवली.
     अशा प्रकारे प्रधानांची योजना यशस्वी झाली. यातून त्यांना श्रीमंतांची यादी मिळाली. त्यांच्या सर्व सोयी-सवलती तात्काळ बंद करण्यात आल्या. शिवाय त्यांच्यावर जबरण कर बसविण्यात आला. काही दिवसांतच राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली.
     प्रधानाने राजाला सुचविले की, आता श्रीमंतांवरील कराचे ओझे काही प्रमाणात कमी केले तरी चालू शकते. त्यामुळे त्यांना कराचा भार वाटणार नाही. आणि नेमाने करही भरतील. राजाने श्रीमंतांवरील करातही कपात केली. गरिबांना रोजगार मिळू लागल्याने आणि अन्न-धान्यात सवलतही मिळत असल्याने गरिबांची आर्थिक परिस्थितीही सुदृढ होऊ लागली. श्रीमंत लोकांनाही कराचे ओझे वाटेनासे झाले. त्यामुळे आता कुणालाही गरिबीची खोटी बतावणी करण्याची गरज भासली नाही.

No comments:

Post a Comment