एका गावात दोघी मायलेकी राहत होत्या. त्यांची छोटीशीच झोपडी होती. त्यात दारिद्र्य नांदत होते. दोघी गावातल्या एका सावकाराच्या शेतात मजुरीला जात. त्यातून त्या आपला उदरनिर्वाह चालवित.
दिवस जात होते. एकदा आई आजारी पडली. तिची सारी जबाबदारी मुलीच्या शिरावर आली. मुलीचे नाव होते, किरण! ती फार हुशार होती. ती शेतात राबण्याबरोबरच जंगलात जाऊन लाकूडफाटाही गोळा करून आणायची. ती बाजारात विकून आपला घरप्रपंच चालवायची आणि आईच्या आजारावरही उपचार करायची.
किरण ज्या जंगलात लाकडे गोळा करायला जायची, त्या जंगलात दोन भुतं राहत होती. ती जंगलातल्या वास्तव्याला कंटाळली होती. त्यांना कोणतं तरी सत्कार्य करून पिशाच्च योनीतून मुक्तता मिळवायची होती. एक दिवस मोठं भूत धाकट्याला म्हणालं," या जंगलात एक मुलगी रोज लाकूडफाटा गोळा करायला येते. विचार करतोय, तिलाच मदत करावी आणि या जन्मातून मुक्ती मिळवावी."
"तू म्हणतोयस ते बरोब्बर आहे! तुला मुक्ती मिळाली की मीसुद्धा कुणाला तरी मदत करून सुटका करून घेईन. " लहान भूत म्हणाले.
मोठे भूत किरण येण्याची प्रतीक्षा करू लागले. ती येण्याअगोदरच त्याने पुष्कळशी लाकडे जमा करून ठेवली होती. किरण आली. लाकडाच्या मोळ्या बांधलेल्या पाहून ती दुसरीकडे लाकूडफाटा शोधायला गेली. कदचित कोणीतरी ही लाकडे गोळा केली असतील, असा तिने विचार केला. जंगलात खूप हिंडली, पण त्यादिवशी कुठेच लाकडे मिळाली नाहीत. ती हताश होऊन माघारी परतली.
विचार करत करत ती गावात आली. एका घरासमोर एक वृद्ध महिला घराच्या ओटीवर बसून फुलांचा हार बनवत असलेली तिला दिसली. शेजारी टोपलीत खूपशी फुलं होती. वृद्ध महिलेला हार बनवताना फारच कष्ट पडत होते. " आजी, तुला किती कष्ट पडतात? आण इकडे मी हार बनवून देते. तू जे काही देशील, ते मी समाधानाने घेईन." किरण वृद्धेला म्हणाली.
"काय करू, मुली? हाच माझा पिढीजात धंदा आहे. म्हातारपणामुळे शरीर साथ देत नाही. नजरसुद्धा बारीक झाली आहे. तू हार बनवून विकशील तर तुला त्यातला चौथा हिस्सा देत जाईन." वृद्धा किरणला म्हणाली. किरणने ते काम आनंदाने स्वीकारले. ती आता हार बनवून बाजारात जाऊन विकून येऊ लागली. मागे भुताने किरणला मदत करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला होता. त्याने पुन्हा तिला मदत करण्याचे ठरवले. किरण रोज जंगलाच्या शेजारी असलेल्या वृद्धेच्या बागेत फुले तोडायला जायची. एक दिवस ती फुले आणून हार बनवत होती. किरणने टोपलीतले एक फूल घेतले की, भूत लगेच त्यात दुसरे फूल टाकायचे.
काही वेळाने वृद्ध महिला घरी आली. टोपलीतली फुले पाहून म्हणाली," काय गं! हार बनवायला इतका उशीर? टोपलीत तर फुले जशीच्या तशी दिसताहेत."
" हे बघ आजी, हारांचा ढिग! " से म्हणून तिने हारांचा ढिग वृद्ध महिलेला दाखवला. वृद्धा आश्चर्यात पडली. "पण ही फुले जशीच्या तशी कशी? भुताटकी म्हणायची की काय? अगं बाई! तू चेटकीण आहेस की काय? चल, ऊठ, निघ येथून!" असे म्हणून तिने फुलांची टोपली दूर भिरकावून दिली.
मोठ्या भुताने मदत करण्याचा जो जो प्रयत्न केला, तो वाया गेला. किरण आता घरीच मातीची खेळणी बनवत होती. किरणचे वडील हयात होते, तेव्हा ते मातीची खेळणी बनवून विकत. किरण त्यांना मदत करत असे. त्यामुळे तिला खेळणी बनवण्याची कला येत होती. तो अनुभव आता तिला कामी आला. या खेपेला छोट्या भुताने तिला मदत करण्याचे ठरवले. तो पोपटाचे रूप घेऊन तिच्या घरी आला. आणि ओल्या मातीत एक हिरा टाकून निघून गेला. किरणचे त्याकडे लक्षच नव्हते. त्या मातीतून तिने एक हत्ती बनवला. काही दिवसांनी तो हत्ती घेऊन ती गावातल्या एका सावकाराकडे गेली.
सावकाराच्या मुलाला तो हत्ती फार आवडला. सावकाराने तो विकत घेतला. दरम्यान त्यांचा एक हिरा हरवला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता. यासाठी त्याने आपल्या नोकरांना कामाला लावले होते. वास्तविक छोट्या भुताने तो हिरा चोरून किरणच्या मातीच्या चिखलात टाकला होता.
सावकाराचा मुलगा तो हत्ती घेऊन खेळत होता. त्याला घेऊन इकडे-तिकडे धावत होता. आणि खेळता खेळता हत्ती जमिनीवर पडला व फुटला. विखुरलेल्या तुकड्यांमध्ये तो मौल्यवान हिरा मुलाला दिसला. तो घेऊन बाबांकडे गेला. सावकाराला अतिशय आनंद झाला. पण तो हिरा खेळण्याच्या मातीत कसा गेला, याचे त्याला आश्चर्य वाटले. त्याला किरणचा संशय आला, पण किरण कित्येक दिवस त्याच्याकडे आली नव्हती. त्याने फार विचार केला नाही. त्याचा हिरा त्याला मिळाला होता.
इकडे किरण मूर्ती बनवण्यात पारंगत झाली होती. कष्टाच्या जोरावर तिने आपले दिवस पालटवले होते. आता दोघी मायलेकी आपले दिवस आनंदात, समाधानात घालवू लाग्ल्या होत्या. पण जंगलात राहत असलेल्या त्या दोघा भुतांना मात्र मुक्ती मिळाली नाही.
No comments:
Post a Comment