Monday, April 9, 2012

बालकथा

जिलेबीदादा
     जिलेबीदादा नाव कधी ऐकलंय? नाही ना! तो जिलेबी खायचा नाही, बनवायचा. जिलेबी काय टेस्टी बनवायचा. त्याच्या दुकानात इकडे जिलेबी  बनायचे तर तिकडे खल्लास! ग्राहक जिलेबीवर  अक्षरशः तुटून पडायचे. खूप कमावले, जिलेबीदादाने! मात्र एक वेळ अशी होती की,  त्याच्या पोराबाळांची पोटे भरायचेसुद्धा वांदे होते.
     जिलेबीदादा  याचे सारे श्रेय हरिहर महाराजांना देतो. हरिहर महाराज, जे  पंढरीच्या चंद्रभागेच्या तिरावरल्या एका छोट्याशा गावात राहत. एक दिवस एक जमीनदार आपल्या कुटुंबकाबिल्यासह पंढरपूरच्या यात्रेला आले होते. त्याच्यासोबत  तरुण सुधीरसुद्धा होता. जमीनदार हरिहर महाराजांच्या दर्शनाला नेहमी येत- जात असे. या खेपेला जमीनदार तर परतले, पण सुधीर मात्र तिथेच महाराजांजवळ राहिला. त्यांची सेवा करू लागला.
      एक दिवस हरिहर महाराजांना समजलं की सुधीर काही एकटा-दुकटा नाही. त्याला मुलं-बाळं आहेत. पत्नी आहे, आई आहे. महाराज त्याच्यावर नाराज होऊन म्हणाले, " तू आपली जबाबदारी नीट पार पाडत  नाहीस. पत्नी आणि पोरांना वार्‍यावर सोडून  इथे आला आहेस. आता तू माघारी जा नी  पुढच्या वेळेला येताना त्यांना घेऊन ये, अन्यथा इथे येऊ नकोस." 
     सुधीरने  त्यांचे पाय धरले आणि  म्हणाला," महाराज, रोजगार नाही. त्यांना कसे आणू?"
     महाराज म्हणाले," इथे मिठाईचे दुकान सुरू कर. रुपये माझ्याकडून घेऊन जा." मिठाईचे दुकान सुरू झाले. तर्‍हे-तर्‍हेची मिठाई बनवली जाऊ लागली, पण जिलेबी मात्र प्रसिद्ध झाली. सुधीरलाच मग लोक  जिलेबीदादा असे म्हणू लागले. तो रोज हरिहर महाराजांना मिठाई पाठवत असे.
     पण बाबा सगळ्यांपेक्षा वेगळे! मोठी अवलिया! ते ही सगळी मिठाई भक्तांमध्ये वाटून टाकत. त्यांच्या चमत्कारांचे किती तरी किस्से ऐकायला मिळत. भक्तांची कामे होत, पण महाराज कुणाकडून काही घेत नसत. फक्त म्हणायचे, दान करा. भुकेल्यांना भोजन द्या. गरजवंतांना कपडे द्या. गोरगरीब येत राहत. येताना रडत येत, मात्र जाताना त्यांच्या डोळ्यांत आनंद असे, खुशी असे. 
     एक दिवस गावात  मोठा गोंधळ उडाला. एक म्हातारा हत्ती पिसाळला.  लोकांना उपद्रव देऊ लागला. लोक घाबरले. सैरावैरा धावू लागले. हत्ती असा बेभान सुसाट वेगाने सुटला असता नदीच्या पाण्यात धाप्पकन  पडला. हत्ती पोहत पोहत काठावर आला. तिथे हरिहर महाराज ध्यानाला बसले होते. पाहणारे घाबरले, विचार करू लागले, आता काय करायचं? आता कसे होणार?  लोकांचा गलका वाढला, पण महाराज शांत होते. ध्यानमग्न होते.  अचल होते. तेवढ्यात लोकांनी पाहिले की, हत्ती शांत झाला आहे. त्याने तोंडात जल घेतले आणि त्याचा फवारा उडवला.  बाबांची समाधी भंगली.  तेव्हा त्यांनी आशीर्वादासाठी हात वर उचलले.
     हत्ती कसलीही गडबड न करता, निमूटपणे तेथून निघून गेला. लोकांनी भक्तीभावाने महाराजांना हात जोडले.

No comments:

Post a Comment