Wednesday, June 6, 2012

बालकथा प्रामाणिकपणाचे रोप

     एक राजा होता. तो म्हातारा झाला होता, तेव्हा त्याने आपल वारसदार निवडण्याचा निर्णय घेतला. त्याला आपल्या आप्तेष्ट किंवा मित्र परिवार यांच्यातून वारस निवडायचा नव्हता. एखाद्या योग्य युवकाने राज्याची जबाबदारी सांभाळावी, अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने एक दिवस राज्यातल्या सर्व महत्त्वाकांक्षी युवकांना दरबारात बोलावले. राजा त्यांना म्हणाला," मी म्हातारा झालोय, आता राज्यकारभार सांभाळणं कठीण होत चाललं आहे. माझी इच्छा आहे की, आपल्यापैकीच कुणी तरी ही जबाबदारी सांभाळावी."
     राजा पुढे म्हणाला," आज मी  तुम्हां सगळ्यांना फळ झाडाचं एकेक बीज देतोय. ते तुम्ही घरी जाऊन एखाद्या कुंडीत रुजवा. त्याला खत-पाणी घाला. आणि बरोबर एक वर्षांनी मला दाखवायल घेऊन या. त्यावेळी मी तुमच्यातून एक माझा वारसदार निवडीन."
     चंद्रमणी नावाचा युवकसुद्धा राजाच्या दरबारात उपस्थित होता. त्यालाही एक बीज मिळाले. त्याने ते मोठ्या उत्साहाने घरी आणले. आईला राजाची इच्छा सांगितली. तिने त्याला एक कुंडी दिली. खतमिश्रित चांगली उपजाऊ माती आणून दिली. त्यात त्याने बीज रुजवले. तो त्याला वेळोवेळी पाणी घालू लागला. सूर्य प्रकाशही देऊ लागला. पण तीन आठवडे झाले तरी कुंडीतून काहीच उगवून बाहेर आले नाही. मात्र त्याच्या सोबतचे युवक आपापल्या कुंडीत उगवणार्‍या रोपांविषयी चर्चा करत होते.
     असेच चार-पाच आठवडे उलटले. पण तरीही चंद्रमणीच्या कुंडीतून काहीच उगवले नाही. तो वेळोवेळी पाणी देत होता. प्रकाश देत होता. बघता- बघता सहा महिने उलटले, पण चंद्रमणीच्या कुंडीत साधा अंकुरसुद्धा उगवला नाही. इतर युवकांच्या कुंडीतल्या रोपांना आता फुलंही येऊ लागली होती. चंद्रमणीची परिस्थिती मोठी विचित्र झाली. त्याला अनेक प्रश्नांनी घेरले. काय करावे, समजेना. पण तरीही तो वेळोवेळी कुंडीला पाणी देत होता. शेवटी एक वर्ष पूर्ण झाले. ठरल्यानुसार एक दिवस सगळे युवक कुंड्या घेऊन दरबारात हजर झाले. राजा ते दृश्य पाहून मोठा आश्चर्यचकीत झाला. समोर उभ्या असलेल्या युवकांच्या कुंड्यांमधली रोपं मोठी दिसत होती. अनेकांच्या रोपांना सुंदर सुंदर फुले लागली होती. राजाचे शेवटच्या ओळीत मागे रिकामी कुंडी घेऊन उभा राहिलेल्या एका युवकाकडे लक्ष गेले. तो दरबारी रक्षकाला म्हणाला," त्या युवकाला समोर आण." त्याची रिकामी कुंडी पाहून सर्व युवक हसू लागले. सर्वांच्या हसण्याकडे दुर्लक्ष करीत चंद्रमणी मोठ्या आत्मविश्वासाने व धैर्याने राजासमोर उभा राहिला. म्हणाला," महाराज! योग्य देखभाल आणि पाणी देऊनही मी या कुंडीत काहीही उगवू शकलो नाही."
     राजा सिंहासनावरून उठला व त्याची पाठ थोपटत म्हणाला," तसं नाही माझ्या तरुण मित्रा, मी या रिकाम्या कुंडीत तुझ्या प्रामाणिकपणाचे रोप पाहतो आहे. तुला ठाऊक नाहीमी एक वर्षांपूर्वी तुम्हा सर्वांना शिजवलेल्या पण वाळवलेल्या बिया दिल्या होत्या.ज्या कधीच उगवू शकणार्‍या नव्हत्या. तू सोडून सर्वांनी आपापल्या कुंड्यांमधले बी बदलले आहेत. तुझा प्रामाणिकपणा आणि धैर्य पाहून माझा असा दृढविश्वास झालाय की तूच माझा वारसदार होण्यास लायक आहेस." राजाने लगेच घोषणा केली," आजपासून या राज्याचा वारसदार हा चंद्रमणी असेल."
    मोठ्या जयजयकारात दरबार्‍यांनी आपल्या नव्या राजाचे स्वागत केले. वृद्ध राजाने आपला मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला.                                                                                

No comments:

Post a Comment