Thursday, June 7, 2012

बालकथा मैत्री कोणाशी करावी?

       एका गारुड्याने जंगलात जाऊन एक साप पकडला व टोपलीत बंद करून टाकला. गारुडी शहरात जाऊन सापाचा खेळ करून दाखवणार होता. शहर खूप दूर होते. साप उपाशी राहू नये म्हणून त्याने एक उंदीर पकडून टोपलीत टाकले.
     उंदराला पाहून सापाला आनम्द झाला. तो जिभ बाहेर काधून त्याच्याजवळ सरकू लागला. उंदीर घाबरला, थरथर कापू लागला. हात जोडून विणवणी स्वरात म्हणाला," मित्रा! तू माझा जीव घेऊ नकोस. मी तुला गारुड्याच्या कैदेतून मुक्त करीन."
     साप हसला आणि म्हणाला," एवढा एवढासा उंदीर तू, माझी काय काय सुटका करणार? माझ्या इतकी शक्ती आहे, तरी मी टोपलीचे झाकण उघडू शकलो नाही. मग तू कसा काय मला मदत करणार? औगाच काही बाता मारू नकोस. मला जोराची भूक लागली आहे. तुला खाल्ल्यावर माझे समाधान होईल."
     "सापदादा, जरा विचार कर! तू इतका भुकेला आहेस तर माझ्या एवढ्याशा शरीराने तुझे पोट कसे भरणार? उलट तुझी भूक आणि वाढेल. त्यापेक्षा मला स्वातंत्र्य दे. तू मुक्त झाल्यावर जंगलात जाऊन भरपेट खाऊ शकतोस. गारुड्याच्या कैदेत राहिलास तर  त्याच्या पुंगीच्या इशार्‍यावर नाचून घायाळ होऊन जाशील. त्यापेक्षा..."
     सापाला उंदराचे म्हणणे पटले. त्याने आपल्या दृष्ट स्वभावानुसार विचार केला, ' बघू तरी! हा मला मुक्त कसा करतो ते! आणि एकदा का मुक्त झालो की यालाही खावून टाकीन.' मग तो उंदराला म्हणाला," चल, ठीक आहे. तुला खात नाही. आता सांग, तू मला कसा मुक्त करणार ते?"
     " मी तुझ्या डोक्यावर बसून मंत्र म्हणेन. मंत्र संपला की मी तुला सांगेन, तोपर्यंत तू डोळे बंद ठेवायचे." उंदीर म्हणाला. सापाने फणा काढला. उंदीर त्यावर चढून बसला. अशा प्रकारे तो टोपलीच्या झाकणापर्यंत पोहचला. तो भरभर झाकण कुरतडू लागला.
     थोड्याच वेळात त्याने झाकणाला एक छिद्र पाडले. छिद्रातून बाहेर जायला रस्ता मिळाल्यावर तो पटकन बाहेर आला. जमिनीवर उडी मारून जंगलात पसार झाला. डोके हलके झालेले पाहून सापाने डोळे उघडले. त्याला उंदीर कुठेच दिसला नाही. मात्र त्याला झाकणाला एक छिद्र दिसले. संधी साधून तोही हळूहळू बाहेर आला. त्याला मुक्त झाल्याचा आनंद होताच, पण तेवढेच उंदीर हातून निसटल्याचे दु:ख होते. सापाने चोहीकडे उंदराचा शोध घेतला, पण उंदीर काही सापडला नाही.
     या घटनेला बरेच दिवस उलटले.  साप ही घटना  जवळ जवळ विसरून गेला  होता. पण अचानक एक दिवस उंदीर सापाच्या दृष्टीस पडला. साप लाम्बूनच हाक मारत त्याच्याकडे धावू लागला. " अरे मित्रा, तू त्यादिवशी पळून का गेलास? मला तुझे आभार मानायचे होते. मित्रा, इकडे ये, तुझ्याशी मला गप्पा मारायच्या आहेत."
       खरे तर साप उंदराला खाऊ इच्छित होता. पण उंदीर पटकन  बिळात जाऊन बसला. साप त्याच्या बिळासमोर आला आणि म्हणाला," मित्रा, बाहेर ये! तुला मित्राची कसली भीती?"
     उंदीर हातूनच म्हणाले," मित्र! कसला मित्र? तू माझा मित्र-भित्र कोणी नाहीस, शत्रू आहेस. त्यावेळेला माझा नाईलाज होता. मला माझा जीव वाचवायचा होता. म्हणून तुझ्याशी तात्पुरती दोस्ती केली. त्याचा दोघांनाही फायदा झाला..."
     साप गपचिप ऐकत होता. उंदीर पुढे म्हणाला," मित्रा! मैत्री कधीही बरोबरीच्या लोकांशी करावी, तरच ती निभावली जाते. तू माझ्या बरोबरीचा नाहीस. या जन्मात कधीच आपली मैत्री होणार नाही. आता तू निघ इथून." साप एवढेसे तोंड करून माघारी फिरला. तो समजून चुकला की, उंदराला व्यावहारिक ज्ञान आपल्यापेक्षा अधिक आहे.    

1 comment:

  1. ह्या रूपक कथेद्वारे फार सुंदर संदेश दिला आहे.

    लंडन मध्ये सुरवातीच्या काळात माझ्या पाकिस्तानी सहकार्यासोबत गोर्यांशी डील
    करतांना हेच धोरण स्वीकारले होते. पुढे माझी कागदपत्र झाल्यावर त्या पाकड्यांना वाटण्याच्या अक्षता लावल्या.

    ReplyDelete