Wednesday, June 6, 2012

बालकथा हुशार हरीण

     श्रीरंगपूरजवळच्या जंगलात एक हरीण राहत असे. त्याला एका झाडावरची फळं फार आवडायची जवळच्या गावात एक शिकारीही राहत होता. त्याला हरणाची आवड माहिती होती. एक दिवस शिकारी लवकर उठून जंगलाच्या दिशेने निघाला. त्याच झाडावर त्याने लाकडी माचण बांधले. आणि त्यावर बसून हरणाची वाट पाहू लागला.
     हरीण नेहमीप्रमाणे फिरत फिरत त्या झाडाजवळ आले. झाडावर लगडलेली रसरशीत फळं पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तेवढ्यात त्याची दृष्टी माणसाच्या पाऊलखुणांवर पडली. त्याने तेथेच थांबून विचार केला, 'नक्कीच इथे कुठे तरी शिकारी लपला असावा, जो माझी शिकार करायला टपला आहे. '
     इकडे हरीण थबकल्याने शिकारी विचारात पडला. मग त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. तो झाडाची फळे तोडून हरणाच्या पुढ्यात टाकू लागला. फळाचा लालसेने हरीण पुढे येईल, आणि मग त्याला पकडता येईल, असे त्याने विचार केला. परंतु, हरणाने शिकार्‍याची चलाखी ओळखली. त्याला झाडावर बांधलेली माचण दिसली. हरणाला एक युक्ती सुचली. त्याने झाडाशीच बोलायला सुरूवात केली." अरे वृक्षदादा, आज तुला झालंय तरी काय? रोज तर तू फळे खाली टाकत होतास आणि आज मात्र माझ्या दिशेने फेकतो आहेस. काय झालंय तरी काय तुला?"
     पण तिकडून काहीही आवाज आला नाही.
     "वृक्षदादा, तू काहीच बोलेनास, आज तू विचित्र वागतो आहेस. नियम सोडून चाललंय तुझं. आता मीसुद्धा तसाच वागतो, नियम तोडतो. आता मी दुसर्‍या झाडाची फळं खायला जातो."
     शिकार्‍याने विचार केला, आता शिकार तावडीतून सुटणार... त्याने लागलीच हरणाच्या दिशेने भाला फेकला. पण हरीण आधीच सावध होते. त्याने झटक्यात उडी घेतली आणि लांब जाऊन उभा राहिला. हरीण ओरडून म्हणाले," शिकार्‍या, मी तुझी चाल कधीच ओळखली होती. पण आता चान्स गेला गेला. पुन्हा कधी तरी नशीब आजमाव." असे म्हनून त्याने धूम ठोकली.  तात्पर्यः नेहमीच्या कामात थोडा जरी बदल आढळला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.  ( पंचतंत्रावर आधारित)                                                                                 

No comments:

Post a Comment