Tuesday, June 5, 2012

स्प्राइट प्या आणि त्यासोबत प्लॅस्टिकसुद्धा खा!

जत (ता. जत जि. सांगली) येथील एका विक्रेत्याकडे स्प्राइटच्या बाटलीत प्लॅस्टिक दिसून येत आहे.
          सांगणार्‍यांनी कितीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्याचं ऐकत नाही. एका कानाने ऐकतो आणि दुसर्‍या कानांनी सोडून देतो. आकर्षक बाटल्यांमधील कार्बनयुक्त शीतपेये पिऊ नका, असं सांगूनसुद्धा आपण काही त्यांचं ऐकत नाही आणि आपण विकतचा आजार घेऊन आपलं आर्थिक नुकसानही करून घेतो. पण ह्या कंपन्या निव्वळ कार्बनयुक्त पाणी प्यायला देतील तर खरे! आता ते यात गुटख्याच्या पुड्या, प्लॅस्टीकचे तुकडे आणखी काहीबाही खायला बाटलीत घालून देतात. वर थंडगार प्या आणि वर स्नॅकला असले काही तरी खा, असेच काही तरी शीतपेय कंपन्या सांगत असतात का कोण जाणे. विशेष म्हणजे या कंपन्यांना कसलीच लाजअब्रू नसते. त्यांनी खालच्या डीलर, विक्रेते मंडळींना सांगून टाकलेलं असतं. आमची शीतपेये बिनधास्त खपवा. आम्ही मोठमोठे वकील ठेवले आहेत. काही काळजी करू नका. बिनधास्त विका. त्यांनी पढवलेली भाषाच ही मंडळी वापरत असतात. त्यांना समाजाचं काही देणं-घेणं नसतं. त्यामुळे असे शीतपेय बाटल्यांमध्ये काही सापडू शकतं. आपण मात्र त्याकडे कानाडोळा करून बिनधास्त थंडगार पेये घशात घालत असतो.  वास्तविक ही थंडपेये तात्पुरते मनाला समाधान देत असतात. मिळतेशिवाय  नकळतपणे शरीरावर त्यांचा प्रतिकूल परिणामही करत असतात. जगभरातील संशोधकांनी यावर संशोधन केलेले आपण वृत्तपत्रांमध्ये आलेले वाचत असतो.  अलिकडेच  शीतपेयांच्या अतिसेवनामुळे आजारी पडणार्‍या लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे यात समोर आल्याचंही वाचलं आहे. त्यामुळे जर कोणी सातत्याने कार्बनयुक्त शीतपेयांचे सेवन करत असेल तर त्याला वेळीच रोखायला हवं की नाही. पण आपण तसल्या भानगडीत न पडता, उलट त्याकडे दुर्लक्ष करून आपण तहान त्याच्यानेच भागवत असतो.      अलिकडेच वाचलेली आणखी एक बातमीत फेसाळणारी कार्बनयुक्त कोलासारखी शीतपेये आरोग्यास हानीकारक आहेत असा दावा पाँडिचेरी विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी केला आहे. दिल्लीस्थित विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने केलेल्या चाचणीमध्ये लोकप्रिय कोला कंपन्यांच्या शीतपेयांमध्ये जास्त प्रमाणात हानीकारक घटक आढळून आले आहेत. या घटकांमुळे मनुष्याच्या शरीरावर एखाद्या स्लो पॉयझनसारखा परिणाम होतो असे स्पष्ट झाले आहे. या शीतपेयांचा सर्वाधिक धोका बालकांना होत असून जगभरातील प्रदीर्घ संशोधनानंतर कृत्रिम स्वाद, रसायने, रंग असणार्‍या पेयांपासून लहान मुलांना दूर ठेवावे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. संशोधनानुसार या पेयांच्या वारंवार सेवनाने मुलांची एकाग्रता कमी होते, शिवाय शरीरावरदेखील दुष्परिणाम होतो.

ही शीतपेये प्यायल्याने आपण विकतचे आजारांना निमंत्रण देत असतोच. पण ती बनवताना आणि बाटल्यांमध्ये भरताना किती निष्काळजीपणा केला जातो, हेही आपण पाहिले आहे. गुटख्या पुड्या, शेवाळ, प्लॅस्टिकचे तुकडे, काड्यापेटीतील जळक्या काड्या, विड्या असं काहीबाही बाटलीत आढळून येतं, तशा बातम्याही आपण वाचत असतो. आता परवा काही मित्र-मित्र स्प्राईट पित होते, त्यांनी विक्रेत्याकडून बाटल्या मागवल्या. तर त्यात त्यांनी चुरगाळलेला प्लॅस्टिक तुकडा सापडला. म्हणजे ' स्प्राइट प्या आणि वर प्लॅस्टिकही खा' म्हणजे अन्न खायची गरजच नाही. आहे की नाही गंमत! तरीही आम्हाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. होतं असं कधी कधी, असं म्हणून पुढं जातो. ही आपली मनोवृत्ती कधी संपणार?

No comments:

Post a Comment