Sunday, June 10, 2012

बालकथा मौल्यवान रत्न

                                                        विजयनगरचा राजा अमरसेन याला आपल्या धनदौलतीचा मोठा गर्व होता. एक दिवस त्याला भेटायला त्याचा बालमित्र रतनसेन आला. मित्र खूप वर्षांनी आल्याचे पाहून अमरसेनला फार आनंद झाला. मित्राचे मोठे जंगी स्वागत केले. गप्पागोष्टी झाल्यावर तो रतनसेनला आपला राजवाडा आणि राजेशाही थाट दाखवण्यास घेऊन गेला. तिथे ठेवलेल्या विविध रत्नांच्या आणि आभूषणांच्या किंमती मोठ्या ऐटीत सांगू लागला. नंतर त्याने मोठ्या गर्वाने सांगितले की, कोषागाराची राखण करण्यासाठी हजारो सैनिक चोवीस तास पहारा देत असतात. रतनसेनला राजाच्या या गोष्टीत रस नव्हता. राजाच्या बोलून झाल्यावर रतनसेन म्हणाला," मित्रा, तू तुझ्या धनसंपत्तीबद्दल इतकं सारं सांगितलंस, पण याचा दुसर्‍याला काय फायदा?"
     राजा म्हणाला," इतकी महागडी रत्नं आणि आभूषणं तर माझ्यासाठीच आहेत, त्याचा दुसर्‍याला काय उपयोग असणार आहे?"
     रतनसेनने राजाला एका झोपडीत नेले. तिथे एक म्हातारी जात्यावर धान्य दळत होती. रतनसेन राजाला म्हणाला," मित्रा, तुझ्या कोषागारात ठेवलेली रत्नेसुद्दा दगडच आहेत आणि इथे जे जाते आहे, तेसुद्धा एक दगडच आहे. त्या रत्नांच्या सुरक्षतेसाठी हजारो सैनिक तैनत केले आहेस. पण याच्या रक्षणासाठी कशाचीच आवश्यकता नाही.   मौल्यवान रत्नांचा तुझ्याशिवाय कुणालाच लाभ नाही. इथे मात्र सगळ्या गावासाठी पीठ पाडलं जातंय. त्यामुळे माझ्यादृष्टीने  हे जातेच तुझ्या रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे."
      अमरसेनला आपल्या मित्राच्या बोलण्यातला अर्थ लक्षात आला. ज्या वस्तूचा फायदा सर्वांना होतो, तीच वस्तू खरी मौल्यवान. आणि सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे जाते आणि ते या म्हातारीकडे आहे.

No comments:

Post a Comment