Monday, June 4, 2012

रहस्यकथा रहस्यमय संदेश

       बर्नर आणि हॅमर दोघे मित्र होते. दोघंही छोटी-मोठी कामं करायची, पण संधी मिळेल तेव्हा हेरगिरीत आपला हात आजमवायची. एकदा दोघांना एका पार्टीला जाण्याची संधी मिळाली. तिथे शहरातील मोठमोठी असामी उपस्थित होती. बर्नर आणि हॅमर सावध पण बारीक नजरेने सारा परिसर न्याहळत होते. अशाच ठिकाणी गुन्हे घडतात किंवा गुन्ह्याच्या योजना आखल्या जातात, अशी त्यांची धारणा होती.
     एक व्यक्ती काळा गॉगल लावून एका कोपर्‍यात बसली होती. हॅमर म्हणाला," मित्रा, मला तर एक अट्टल गुन्हेगार वाटतो. नाही तर रात्रीच्यावेळी कोण काळा गॉगल घालून बसला असता."
     सर्वजण खाण्यात मग्न होते. परंतु, बर्नर आणि हॅमरच्या नजरा मात्र त्या काळ्या गॉगलवाल्यावर खिळल्या होत्या, जो एका कोपर्‍यात खुर्चीवर गपचीप बसला होता. तेवढ्यात बर्नर हॅमरच्या कानाला लागून फुसफुसला," हॅमर, बुफेकडे बघ. तिथे काही तरी गडबड चाललीय."
     "काय गडबड चाललीय?" हॅमरने विचारलं आणि तिथे त्याला काही तरी विचित्र दिसलं.त्यानं पाहिलं की एक महिला आपल्या प्लेटमध्ये काही पदार्थ वाढून घेत होती. तेवढ्यात तिच्याजवळ एक इसम गेला आणि  महिलेच्या हातात एक कागद टेकवला. कागद वाचताच ती महिला रडू लागली आणि प्लेट टेबलवर आदळून वेगाने बाहेर निघून गेली.
     ज्या इसमानं कागद दिला होता, तो म्हणाला, " इवा, अगं, ऐक तरी जरा."
     पण ती महिला वेगाने तिथून बाहेर पडली. मग दोन शब्द ऐकायला आले- इवा आणि विलियम. दोघेही पती-पत्नी होते.विलियम इवाच्या मागे-मागे धावला, पण तेवढ्यात ट्रे घेऊन येणार्‍या वेटरला धडकला. ट्रे खाली पडला आणि धक्का लागून  विलियमसुद्धा बाजूला पडला.
     हॅमर म्हणाला," चल लवकर बाहेर, इवा कुठे जाते पाहू."
     बर्नरने चौकीदारला विचारले," एक महिला रडत बाहेर आली होती, ती कुठे गेली?"
     चौकीदारनं सांगितलं," हो हो, ती मिसेस इवा विलियम होती. ती बाहेर येऊन रस्त्यावर उभी राहिली होती. तेवढ्यात एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. इवा कारमध्ये बसलेल्या माणसाशी काही तरी बोलली आनि कारमध्ये बसून निघून गेली."
     " नक्कीच त्या कागदावर काही तरी रहस्यमय संदेश लिहिला असला पाहिजे, जो विलियमने तिच्या हातात टेकवला होता." असे म्हणत हॅमर रस्ता लक्षपूर्वक न्याहळू लागला. तेवढ्यात त्याला एका बाजूला कागदाचा एक तुकडा पडलेला दिसला. त्याने वाकून तो कागद उचलला. त्यावर के-७० लिहिले होते.
     बर्नर म्हणाला," अरे, हा तर कुठल्या तरी प्लॅट किंवा बंगल्याचा नंबर वाटतो. नक्कीच इवा तिकडे गेली असावी."
     ज्या बंगल्यात पार्टी चालली होती, त्याचा नंबर के-३० होता. बर्नर म्हणाला," के-७० नंबरचा बंगला फार लांब नसणार आहे. इवा तिथेच गेली असावी. चल, तिथे शोध घेऊ."
   तिथे गेल्यावर दोघांचाही मोठा भ्रमनिराश झाला. के-७० ची इमारत म्हणजे एक जुना वाडा होता. बंद दरवाज्याच्या बाहेर एक चौकीदार उभा होता. त्याला विचारल्यावर कळलं की हा वाडा बर्‍याच वर्षांपासून बंदावस्थेत आहे. हॅमरने विचारले," इथे एखादी महिला आली होती का?"
     चौकीदार म्हणाला," नाही, इथे तर कुणीच आले नाही." हॅमर बर्नरला म्हणाला," आपल्या वाड्याच्या पाठीमागे जाऊन बघायला हवं. कदचित तिकडून एखादा मार्ग असेल." यानंतर दोघांनीही गपचीप वाडा फिरून पाहिला. वाड्याच्या सगळ्या बाजूला अंधार होता. वाड्यात प्रकाश कुठेच दिसत नव्हता. वाड्याच्या मागच्या बाजूला एक दरवाजा होता, पण तो बंदावस्थेत होता.
     आता दोघेही वैतागून गेले. बर्नर म्हणाला," कदाचित के-७० नंबर दुसर्‍या एखाद्या इमारतीचा असावा किंवा मग एखादा गुप्त संदेश. आपल्याला माघारी परतायला हवं आणि काय भानगड आहे, ते विलियमकडूनच काढून घ्यावं."
     दोघे परतले, तेव्हा पार्टी संपली होती. विचारल्यावर कळलं की मि. विलियम त्याची पत्नी अचानक निघून गेल्याने अपसेट झाला होता. तोही मग तिच्या शोधासाठी निघून गेलाय.
     हॅमर म्हणाला," आपणच विलियमला इवाच्या हातावर कागद ठेवताना पाहिलं आहे. नक्कीच विलियमला या रहस्याबाबत ठाऊक असलं पाहिजे. आपल्याला लगेच त्याला भेटायला हवं." बर्नर म्हणाला,'' पहिल्यांदा आपल्याला पोलीस इन्स्पेक्टरला जाऊन सगळं सांगायला हवं."
     दुसर्‍यादिवशी सकाळी दोघे मित्र पोलिस ठाण्यात इन्स्पेक्टर थॉम्पसन यांना भेटायला पोहोचले. थॉम्पसनची भेट झाल्यावर बर्नरने त्याला रात्रीची ती सर्व हकिकात ऐकवली.
     इन्स्पेक्टर म्हणाला," याचा अर्थ, विलियमला ठाऊक आहे की त्याची पत्नी कुठे गेली ती! " आता ज्याची चर्चा चालली होती, तोच विलियम तिथे आला. तो थॉम्पसनला म्हणाला," इन्स्पेक्टर, माझी पत्नी रात्रीपासून बेपत्ता आहे."
     थॉम्पसन त्याच्यावर डोळे रोखत म्हणाला,  ''मि. विलियम, मला सगळा प्रकार माहित आहे. फक्त एवढं सांग की या के-७० चा अर्थ काय?"
     " के-७०!" विलियम आश्चर्यने म्हणाला.
     "हो, ही संख्या त्या कागदावर लिहिली होती, जो तुम्ही तुमच्या पत्नीच्या हातात दिला होता. तो कागद   आमच्याजवळ आहे." असे म्हणत हॅमरने तो कागद काढून दाखवला.
     कागद पाहताच विलियमचा चेहरा पार उतरला. पण तो पुढे म्हणाला," होय, हा कागद मीच इवाच्या हातात थांबवला होता. पण या कागदाचा तिच्या बेपत्ता होण्याशी काही संबंध नाही."
     "असं का? मग या के-७० चा मतलब काय?" इन्स्पेक्टरने विचारलं.
     " हा माझा आणि इवाचा आपसातला मामला आहे. मी आता यासंबंधी काहीही सांगू शकत नाही. पण इतका नक्की विश्वास देतो की, जेव्हा आम्ही दोघे समोरासमोर येऊ, तेव्हा सगळा प्रकार सांगू टाकू."
     काही क्षण खोलीत शांतता पसरली. मग विलियम सावकाश बाहेर निघून गेला. तिथून तो म्हणाला," म्हणजे तुम्ही मला माझ्या पत्नीला शोधण्यात मदत करणार नाही तर...! मला वाटत, इवा गैरसमजाच्या चक्रव्यूहात सापडली असावी. अरे देवा! आता तिला कुठे शोधू मी!"
     विलियम गेल्यावर थॉम्पसन म्हणाला," या रहस्याची चावी विलियमच्या हातात असताना आम्हाला मात्र तो सांगायला तयार नाही."   
     बर्नर आणि हॅमर विलिअयमच्या घरावर नजर ठेवून होते. त्याचदिवशी संध्याकाळी विलियम एका अनोळखी इसमासोबत बाहेर आला. त्यावेली बर्नर आणि हॅमर यांनी आपला वेष बदलला होता.
     दोघे विलियम आणि अनोळखी यांच्या आजू-बाजूने चालू लागले. हॅमरने विलियम अनोळखी माणसाशी बोलत असताना ऐकलं," माफी? कसली माफी? ...त्याचा इथे काय संबंध! जाऊ दे मीच जाऊन भेटतो...  अरे देवा! माझा तर जीवच चालला होता..." 
     ते समुद्र किनारी पोहचले. तिथे उंचावर एक कॉटेज होते. विलियम अनोळखी इसमासोबत त्या कॉटेजमध्ये घुसला.
     हॅमर बर्नरला म्हणाला," पटकन थॉम्पसनला फोन लावून इथे बोलावून घे." लगेचच थॉम्पसन सिपायांसह तिथे पोहचला.
     त्याने कॉटेजचा दरवाजा ठोठावला. दरवाजा स्वतः विलियमने उघडला. आश्चर्याने म्हणाला," अरे, तुम्हीसुद्धा आलात. बरं झालं. आता सगळं तुम्हाला सांगतो." मग समोर बसलेल्या महिलेकडे बोट करून म्हणाला," मीट माय वाइफ, इवा."
     " म्हणजे तुम्हाला ठाऊक होतं की तुमची पत्नी इथे आहे ते?" थॉम्पसन रागाने म्हणाला.
     " मी तुम्हाला सगळा प्रकार सांगते. कृपया असे रागावू नका." इवा म्हणाली.
     हे के-७० चे प्रकरण काय आहे?" बर्नरने विचारले.
     विलियम म्हणाला," इन्स्पेक्टर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हा आम्हा दोघांचा आपसातला मामला आहे, जो मी हिच्यासमोर सांगणार होतो."
     " हो तर मग सांग." इन्स्पेक्टर म्हणाला.
     "अलिकडे काही दिवसांपासून इवाचे वजन खूप वाढले होते. यामुळे तिचे गुडघे दुखत होते. डॉक्टरांनी तिला औषधाबरोबरच वजनसुद्धा  कमी करण्याचा सल्ला दिला होता." त्या दिवशी पार्टीत पाहिलं की, इवाने आपल्या प्लेटमध्ये खूप से चमचमीत पदार्थ वाढून घेतले होते. मला ते योग्य वाटलं नाही. पण सगळ्यांच्या समोर कसे सांगणार? तेव्हा मी एका कागदावर के-७० लिहून तिच्या हातावर टेकवलं. याचा अर्थ असा होता की, तुझे वजन ७० किलो आहे, त्याकडे लक्ष दे."
     आता इवा पुढे म्हणाली," खरे तर यांच्या सततच्या  टोचून बोलण्याने मला भयंकर राग आला. मी रडतच बाहेर निघून गेले. तेवढ्यात मला माझ्या मैत्रिणीने तिच्यासोबत नेले. विलियम सगळीकडे माझी चौकशी करत राहिले. आज मी मैत्रिणीच्या नोकराकरवी निरोप पाठवला होता की त्यांनी येऊन माझी माफी मागावी, तरच मी त्यांच्यासोबत परत जाईन. यांनी येऊन माझी माफी मागितली आणि आता आमचे भांडण संपले." म्हनून इवा हसू लागली.
     हॅमर आणि बर्नर तिथून परत निघताना बोलत होते," यार, ही आपण कसली हेरगिरी केली."
     "पण काहीही म्हण, के-७० चा कागद तर आपणच शोधला होता." बर्नर म्हणाला.
     "हो, हे तर आहेच." यावर हॅमर म्हणाला. मग दोघेही खूश झाले. 
                                                                                            मूळ लेखक- जुलियस चॅम्बर्स  .. .                                                                                                  भाषांतर- मच्छिंद्र ऐनापुरे  


No comments:

Post a Comment