Thursday, July 2, 2020

महिलांबाबत चिंताजनक वस्तुस्थिती


संयुक्त राष्ट्र संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या 2020 च्या जागतिक लोकसंख्येच्या परिस्थितीच्या आढाव्यातील महिलांचे जे चित्रण केले आहे ते फारच धक्कादायक आणि चिंताजनक आहे. गेल्या 50 पन्नास वर्षात महिलांचे गायब होण्याचे प्रमाण जवळजवळ दुप्पट झाले आहे. दुसरी मोठी चिंताजनक बाब म्हणजे महिलांच्या गायब होण्याच्या प्रमाणात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. काही प्रकरणात घरगुती हिंसा, प्रेमप्रकरण आणि नैराश्य या गोष्टी असल्या तरी बहुतांश महिलांचा अपहरणाचा शेवट देह शोषणाच्या घाणेरड्या व्यवसायातच होतो. एका मोठ्या अंदाजानुसार सुमारे 20 लाखांपेक्षा अधिक महिला आणि तरुण मुली या देहविक्रय क्षेत्रात असल्याचे सांगण्यात येते.
महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या आपल्या देशासाठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे गेल्या पन्नास वर्षात जगभरात  गायब झालेल्या 14 कोटी 26 लाख महिलांपैकी 4 कोटी 58 लाख महिला या भारतातल्या आहेत. महिलांच्या गायब होण्याची प्रकरणे आपल्याकडे गांभीर्याने घेतली जात नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे. गायब झालेल्या महिलेबाबत पहिल्यांदा तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. यातूनही काही पालक, नातेवाईक यांच्याकडून गायब महिलेच्या तपासाबाबत पोलिसांवर दबाव टाकला जातो,तेव्हा त्यांच्याकडून 'तपास चालू असल्याचेच' सांगण्यात येते. तपासात फारशी प्रगती दिसून येत नाही आणि हळूहळू ती केस फाईलबंद होते. यामुळे गुन्हेगारांचे मात्र फावते. त्यांचे धाडस वाढत राहते. त्यांच्यावर कायद्याचे कसलेच वचक नसल्याने महिलांच्या अपहरणाच्या घटना घडत राहतात. कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात घरगुती हिंसेत वाढ झाल्याच्या घटना आपल्या देशासह जगभरात आढळून आल्या आहेत. आणखी एक कटूसत्य म्हणजे अजूनही आपल्या देशात भ्रूणहत्येच्या घटना कमी झालेल्या नाहीत. लोकांच्या डोक्यातून हे भूत अजून उतरले नाही, हे मोठे चिंताजनक आहे. 'वंशाचा दिवा' हवा म्हणून अजूनही मुलींची त्या जन्माला येण्याअगोदरच हत्या केल्या जातात. यामुळे लैंगिक समतोल ढासळला असून पुढे 2055 पर्यंत लग्नाच्या मुलांना मुली मिळणं कठीण होऊन जाईल, असा अभ्यास सांगतो. लोकसांख्यिकी आणि सामाजिक घटनांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञाच्या मतानुसार 2050 पर्यंत 10 टक्के पुरुषांना वयाच्या 50 वर्षापर्यंत अविवाहितच राहावे लागण्याची शक्यता आहे. दह्या-तुपाची भाषा करणाऱ्या हरियाणासारख्या राज्यातल्या घरांमध्ये या अगोदरपासूनच परप्रांतीय व्यंजनांचा गंध दरवळत असल्याचे सांगण्यात येते. कारण या राज्यात स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण चिंताजनक आहे, त्यामुळे इथल्या मुलांना मुलीच मिळत नसल्याने त्यांना परप्रांतात जाऊन बापांच्या हातापाया पडून तिथल्या मुलींचा सून म्हणून स्वीकार करावा लागला आहे. अनेक राज्यात अशा घटना घडू लागल्या आहेत. यातही आता मुलींची अक्षरशः विक्री केली जात असल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळ खूपच बिकट आहे.
इतके होऊनही आपल्या देशात अजूनही महिलांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्याबरोबरीने काम करीत असून खेळ किंवा नोकरीच्या क्षेत्रात महिला पुरुषांच्या पुढे आहेत. मात्र पुरुषी अहंकारामुळे या महिलांना अजून चांगली वागणूक मिळत नाही. नोकरीच्या ठिकाणी अजूनही महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाही. मात्र महिला या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत किंवा मात करत आपलं एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करत आहेत, हे दिलासादायक आहे. वाढत्या स्पर्धा, सुखासीन जीवन आणि रोजगाराच्या घटत्या प्रमाणांमुळे महिलांनाही घराबाहेर पडणे क्रमप्राप्त झाले आहे. दोघा नवरा-बायकोने काम करून जगण्याचे हे दिवस असल्याने महिला आता घरात बसून राहत नाहीत. संसाराला हातभार लावण्याचा त्यांचा अट्टाहास योग्यच आहे,पण समाजातील पुरुष संस्कृती संपायला हवी, तरच खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान मिळणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment