आज वातावरण खूप मस्त होतं. सलग तीन-चार दिवस बरसणारा पाऊस आज थांबला होता. चांगलं ऊन पडलं होतं. सुजय त्याचा मित्र आकाशबरोबर गप्पा मारत बाजारातून चालला होता. आजूबाजूला लोकांची जा-येची वर्दळ चालू होती. तेवढ्यात त्यांच्याजवळून एक महिला घाईगडबडीने पुढे गेली. तिच्या हातात एक छोटेखानी लाल रंगाची पर्स होती. अचानक तिच्या हातातली पर्स गळून खाली पडली.
सुजयने ते पाहिलं. त्याने धावत जाऊन ती पर्स उचलली आणि त्या महिलेच्या हातात सोपवली. महिला त्याच्याकडे पाहून हसली आणि धन्यवाद म्हणत पुढे निघून गेली. दोघेही मित्र तिच्याकडेच पाहात राहिले. त्यांनी बघितलं की, ती महिला टी स्टॉलच्या बाकड्यावर जाऊन बसली आहे.
तिने ती पर्स बाकड्यावरच तिच्या बाजूला ठेवली. चहावाल्याने तिला काही तरी विचारलं. तिने नकारार्थी मान हलवली. ती सारखं तिच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पाहात होती. आकाश म्हणाला,"चहावाल्यानं तिला चहा पिण्याविषयी विचारलं असेल आणि तिनं नको म्हणून सांगितलं असेल. पण का? ती जाऊन टी स्टॉलच्या बाकड्यावर बसली आहे, तर तिने चहा प्यायला हवा."
सुजय म्हणाला,"तू म्हणतोस ते बरोबर आहे. आणि ते बघ, तिने तिची पर्स किती लापरवाहिने बाकड्यावर टाकली आहे. जर समज, चोराला ती पर्स लांबवायची असेल तर तो ती सहज लांबवू शकतो." आकाश म्हणाला,"तुला काही अंदाज येतोय का, की ती तिथे बसून कुणाची वाट बघत असेल? कदाचित नवऱ्याची?"
"नाही, टी स्टॉलच्या बाकड्यावर अशाप्रकारे बसून नवऱ्याची वाट का पाहिल बरं ती? इथून ते दोघे एकत्र कुठे तरी जाणार असतील असं म्हटलं तरी तिच्या कपड्यावरून तरी तसं वाटत नाही. बघ ना, तिने साधेच कपडे घातले आहेत. जर तिला तिच्या नवऱ्यासोबत जायचं असतं तर तिने चांगले कपडे घातले असते आणि नटून-सजून आली असती. मला तर दुसरीच काहीतरी भानगड वाटते." सुजय म्हणाला.
दोघेही आपापल्या अंदाजात अडकले असतानाच एक व्यक्ती बाकड्यावर बसलेल्या त्या महिलेच्या जवळ जाऊन उभी राहिली. पण ती व्यक्ती महिलेशी काहीच बोलली नाही. अचानक त्याने ती लाल पर्स उचलली आणि ती घेऊन झपझप पुढे चालू लागला.
"अरे..रे..रे! तो बघ! तो माणूस त्या बिचाऱ्या बाईची पर्स घेऊन पळून चालला आहे. त्या पर्स चोरणाऱ्या माणसाला पकडायला हवं." आकाश गडबडलेल्या अवस्थेत म्हणाला.
सुजयनं पाहिलं,ती महिला अजूनही बाकड्यावर एकाद्या पुतळ्यासारखी तशीच बसून होती. तो म्हणाला,"किती विचित्र आहे. त्या बाईने पर्स घेऊन जाणाऱ्या माणसाचा पाठलागही केला नाही. कसलीच हालचाल नाही. मदतीसाठी आरडाओरडासुद्धा नाही. अरे, ही भानगड तरी काय आहे?"
आकाशने सुजयच्या बोलण्याला सहमती दर्शवली. म्हणाला," होय रे, तू म्हणतोयस ते बरोबरच आहे.नक्कीच यात काही तरी रहस्य दडलं आहे. असो, जे असेल ते असेल. पण आपण त्या बाईची पर्स ज्याने चोरली आहे,त्याला पाहिलं आहे. आपण त्याला पकडायला हवं. आणि नंतर त्या बाईचे विचित्र वागण्याचे रहस्यही आपल्याला कळेल." दोघेही वेगाने त्या पर्स चोराच्या दिशेने धावले. लाल पर्स चोरणारा चोर आता आरामात चालला होता.
तेवढ्यात एक विचित्र घटना घडली.समोरून येणाऱ्या एका माणसाने पर्स चोराच्या पर्सवर झडप मारली आणि त्याची पर्स हिसकावून घेऊन दोघांच्या दिशेने पळू लागला. आता बाकड्यावरून पर्स चोरणाराही त्यांच्याच दिशेने धावू लागला. आणि तो ओरडत होता,"चोर... चोर... पकडा पकडा...!"
त्याचे ओरडणे ऐकून सुजय आणि आकाश दोघांनाही हसू आलं.सुजय म्हणाला,"जरा, बघ तरी मजा. स्वतः चहाच्या स्टॉलच्या बाकड्यावरून पर्स चोरली आहे. आणि आता त्याची पर्स दुसऱ्याने मारली तर बघ कसा 'चोर चोर, पकडा पकडा' म्हणून ओरडतोय. ही दुनियाच न्यारी म्हणायची."
तोपर्यंत चोराच्या हातून पर्स लांबवणारा या दोघांजवळ आला. त्या दोघांनी त्याला करकचून पकडला. तो सुटण्यासाठी धडपडू लागला,तोच मागून तो पर्स- चोरदेखील धावत आलाच. तो सुजयला म्हणाला,"बरं झालं ,तुम्ही या बदमाशाला पकडलत ते! नाही तर मी मोठ्या संकटात सापडलो असतो."
"तू तुझं सांग. बाकड्यावर ठेवलेली पर्स तू घेऊन पळालास आणि आता तू याला चोर म्हणतो आहेस.खरं म्हणजे तुम्ही दोघेही चोर आहात." आकाश म्हणाला आणि त्याने त्या चोराचा हात पकडला.
तो माणूस ओरडू लागला,"मी चोर नाही, कोण म्हणतं मी चोरी केली म्हणून...?"
आतापर्यंत तिथे गर्दी जमा झाली होती. तेवढ्यात तिथे एक मध्यम वयाचा काळासावळा पोलीस आला. त्याने गर्दीला हकलत जरबेनं विचारलं,"काय रे! गर्दी का केली? काय भानगड आहे?" सुजय आणि आकाशने सगळा प्रकार पोलिसाला सांगितला.
पोलीस शिपायानं बाकड्यावरून पर्स लांबवणाऱ्या चोराला पाहिलं आणि म्हणाला,"बाळ्या तू? अरे, तीन दिवसांपूर्वी तर सुटला आहेस आणि लगेच भानगडी करायला सुरुवात केलीस? पुन्हा जेलमध्ये जायला उतावीळ झाला आहेस का?"
म्हणजे बाकड्यावरून पर्स लांबवणाऱ्या चोराचे नाव बाळ्या होते तर!ऐकून गर्दीतले लोक हसू लागले. पोलिसाने दुसऱ्या चोराकडे वळून विचारले,"आणि तू रे कोण? नाव काय तुझं?खरं सांग,काय भानगड आहे?"
दुसरा चोर म्हणाला,"माझं नाव जितेंद्र आहे,पण मी चोर नाही."
"ही पर्स माझी आहे." पहिला चोर ओरडून म्हणाला.
"तू काय सावकार लागून गेलास काय रे?" असं म्हणत शिपायाने ती लाल पर्स आपल्या हातात घेतली. ती आलटून पालटून पाहत त्यानं दुसऱ्या चोराला विचारलं,"ही पर्स तुझी आहे तर सांग यात किती पैसे आहेत?"
हे ऐकून जितेंद्र गोंधळला. म्हणाला,"मला आता आठवत नाही,पण ही पर्स माझी आहे."
"आता तू सांग,पर्समध्ये किती पैसे आहेत?'' शिपायाने बाळ्याला विचारलं.
"मी तर मागितले होते दोन हजार,पण माहीत नाही यात किती पैसे आहेत? पण खरं सांगू का, ही पर्स माझी नाहीए." बाळ्या म्हणाला.
"हो,ही पर्स याची नाही. ती त्या तिकडे टी स्टॉलच्या बाकड्यावर बसलेल्या बाईची आहे." असे म्हणत आकाश त्या महिलेच्या दिशेने हात करत म्हणाला.ती महिला अजूनही पुतळ्यासारखी तशीच ढिम्म बसली होती.
शिपाई आणि ते दोघे जिथे ती महिला बसली होती,तिथे गेले. पोलीस शिपायाने विचारले,"ही पर्स तुमची आहे का?"
"हो ,माझीच आहे." ती महिला म्हणाली. त्या महिलेचं नाव सुजाता होतं.
"ही पर्स तुम्ही याला दिली होती का?" पोलिसाने बाळ्याच्या दिशेने निर्देश करत विचारलं.
सविताने बाळ्याकडे पाहिलं आणि खाली मान घालून म्हणाली,"मी पर्स याला दिली नाही, पण यानेही ती पर्स चोरली नाही."
सविताचे बोलणे ऐकून सुजय आणि आकाश थक्क झाले. किती विचित्र आहे हे! त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. या दोघांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की, बाळ्या बाकड्यावरची पर्स घेऊन पळाला होता. पण सविताने चोराला पकडण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. फक्त, पुतळ्यासारखी बसून राहिली होती. आणि आता म्हणतेय, पर्स बाळ्याने चोरली नाही. दोघांनी ही विचित्र घटना पोलीस शिपायाला सांगितली.
त्यांचे बोलणे ऐकून तोही दंग झाला. त्यानं सविताला विचारलं,"तुम्ही त्याला पर्स दिली नाही हे सांगता आणि दुसरीकडे त्याने पर्स चोरली नाही हेही सांगता. मुकाट्यानं काय खरं आहे ते सांगा नाही तर चला पोलीस स्टेशनला."
शिपायाने दम देताच सविता घाबरली. ती म्हणाली, "आता मी काहीच लपवणार नाही. सगळं खरं खरं ते सांगते. खरं तर बाळ्या हा माझा भाऊ आहे. चोऱ्या करण्याच्या नादाला लागून याने आपलं आयुष्य बरबाद करून घेतलं आहे. मी याला कितीदा तरी सांगितलं पण यानं काहीच ऐकलं नाही. काही दिवसांपूर्वी यानं मला फोन करून पैसे मागितले होते. मी त्याला घरी बोलावून पैसे देऊ शकले नव्हते. कारण माझा नवरा याला पसंद करत नाही. याच्याशी कुठे भेटून बोलले तरी त्याला सहन होत नाही. म्हणून मीच त्याला सांगितलं होतं की,मी टी स्टॉलजवळ येऊन बसते. त्यानं यावं आणि गपचूप पर्स घेऊन जावं."
सगळे शांतपणे तिचे बोलणे ऐकत होते. सविता पुढे म्हणाली,"लोकांच्या दृष्टीने हा चोर असला तरी शेवटी हा माझा भाऊ आहे. आता त्याची वाट चुकली आहे,पण उद्या कदाचित तो मार्गावर येईल. चोरी करणं सोडेल आणि चांगलं आयुष्य जगेल. पण आता मी माझ्या भावाला वाऱ्यावर कसं सोडू?" असं म्हणत त्याने बाळ्याचा हात आपल्या हातात घेतला.
सुजय आणि आकाश काही वेळ शांत उभे राहिले. सुजय म्हणाला,"आकाश, आपल्याला आशा करायला हरकत नाही की, एक दिवस बाळू नक्कीच उजळ माथ्याने आपल्या बहिणीच्या घरी जाईल."
आकाश म्हणाला,"मित्रा, मलाही हीच अपेक्षा आहे. सविताच्या अश्रूंचे मोल नक्कीच तिच्या या वाईट मार्गाला लागलेल्या भावाला कळतील."
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012
No comments:
Post a Comment