Wednesday, July 22, 2020

अनवट वाटा

पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणाचे उद्दिष्ट नीट समजावून सांगायला हवे. शिक्षणाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात,औपचारिक शिक्षण हे ज्ञानप्राप्तीचं एक साधन आहे. त्यामुळे मुलांना ज्या विषयात गोडी आहे,ते विषय शिकण्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहित करायला हवे. मुलांना काय आवडतं, त्याची क्षमता किती,याचा विचार पालकांच्या मनात यायला हवा. काही पालक मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगतात. त्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण तो मुलगा मधेच शिक्षण सोडून घरी येतो किंवा भरकटला जातो,तेव्हा पालकांचे डोळे उघडतात. आपण त्याच्यावर लादलं याची जाणीव होते. काहींना तर तीही होत नाही,कारण त्यांनी मुलाला समाजावूनच घेतलेलं नसतं. सगळे खापर मुलावर टाकून मोकळे होतात. इथे मुलं सुधारत नाहीत, बिघडतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या बाबतीत सगळं डोळसपणे पाहायला हवं.

दहावी-बारावीच्या मुलांना परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊनही पुढे काय करावं, हेच कळत नसल्यानं गोंधळून जातात. जवळपास 90 टक्के मुलांना पुढे काय करावं, हेच मुळी माहीत नसतं. आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेण्याइतकी प्रगल्भता प्रत्येक मुलामध्ये या वयात असेलच असे नाही. त्यामुळे साहजिकच डॉक्टर, इंजिनिअरच्या शाखेकडे मुलांचा लोंढा लागतो. पण मुळात त्यांना या शाखेची आवड आहे का हे कुणी पाहत नाही. मुलाला काय हवंय, हे पाहिलं जात नाही. गलेलठ्ठ पगार, बंगला,गाडी यांचीच स्वप्न पाहिली आणि दाखवली जातात. पण खरोखरच मुलं या क्षेत्रात खूश असतात का? पैशांपेक्षा आवडीतल्या क्षेत्रात आनंद पैशांपेक्षा श्रेष्ठ असतो,याची जाणीव करून दिली जाते का? नाहीच. कारण आपली मते मुलांवर लढताना आपल्या समाजातील प्रतिष्ठेचाही विचार केला जातो. मग मुलाला अभ्यासक्रम झेपत नाही ,त्यामुळे पालक सगळंच गमावून बसतो.
वास्तविक, पालकांनी मुलांचे संवेदनशील संगोपन करणे महत्त्वाचे असते. बहुतांश पालक शिक्षणाचे महत्त्व, परीक्षेतील यश वगैरे गोष्टींबद्दल जागरूक करीत असतात. पण मुलांच्या जाणिवा, संवेदना जागृत करण्याचे काम हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच पालक करीत असतात. लहानपणापासून मुलांना अवांतर वाचनाची सवय, भाषा शिकण्याची वृत्ती, आपले विचार निर्भीडपणे आणि सुस्पष्टपणे मांडण्याची कला या गोष्टींकडे बरेच पालक दुर्लक्ष करतात.त्यामुळे आजच्या परिस्थितीत फक्त बेरोजगार तयार करण्याचे काम पालक करीत असतात.
मुलांना शालेय वयापासूनच काही गोष्टींबाबत दक्ष राहिल्यास मुले त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रमतील. एकादी वेगळी वाट शोधतील. त्यांना पालकांचा पाठींबा मिळाल्यास ही मुलं त्या क्षेत्रात उजळून निघतील. अशी मुलं तयार होत आहेत,पण याचे प्रमाण खूपच कमी आहे. करिअरच्या अनवट वाटा पुष्कळ आहेत, त्यामुळे त्याची इथे चर्चा करायची आहे. मुलांच्या आवडीच्या क्षेत्राला प्राधान्य देणं, इथं महत्त्वाचं आहे. मुलांना यासाठी अगोदरच तयार करावं लागणार आहे. त्यामुळेच मुलेसुद्धा मग स्पष्टपणे आपल्याला काय करायचं आहे,हे पालकांपुढे मांडतील.
आपली वाट स्वतः निवडलेल्या किंवा वेगळा रस्ता धरलेल्या मुलांच्या पालकांशी बोलल्यानंतर काही गोष्टी आढळल्या. महत्त्वाचं म्हणजे या पालकांनी आपल्या मुलाला-मुलीला लहानपणापासून वाचनाची गोडी लावली. पाठ्यपुस्तकांखेरीज इतर अनेक विषयांवरील पुस्तके वाचायला उत्तेजन दिले. त्याचे कारण असे की, कुठलेही शिक्षण घेतले तरी शिक्षण घेताना आणि देताना गरज असते विचारांच्या सुस्पष्टतेची. त्यासाठी भाषा हेच माध्यम असते. मुलाची भाषा समृद्ध असायला हवी. डोळसपणे केलेल्या अवांतर वाचनाने ते साध्य होते. निरनिराळ्या कला, संगीत, चित्रकला अगदी ओरिगामी यांची ओळख मुलांना करून दिली. त्यातल्या औपचारिक शिक्षणाच्या मागे न लागता त्यात रुची निर्माण होऊन मुलांची दृष्टी व्यापक कशी होईल तसेच मुलांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध कसे होईल-यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मुलांना काय आवडते,त्यांची आंतरिक उर्मी काय आहे याकडे लक्ष दिले. स्वतंत्रपणे विचार करायला आणि निर्णय घ्यायला तसेच निर्णयाची जबाबदारी स्वीकारायला सक्षम बनवले. आणि प्रत्यक्ष जेव्हा या मुलांना जरा हटके अशा करिअर चॉईसचा निर्णय घेतला, तेव्हा हे पालक मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

No comments:

Post a Comment